Maharashtra Political Crisis : आता माईंड गेम आणि ब्लाईंड गेमचा पंधरवडा! आमदार पुढचे १५ दिवस काय करतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 09:58 AM2022-06-28T09:58:48+5:302022-06-28T09:58:48+5:30

पवार मैदानात उतरल्याने ठाकरे यांना बळ आले असले तरी फडणवीस अजून पडद्यामागेच आहेत! खरा प्रश्न बंडखोर आमदार पुढचे १५ दिवस काय करतील?

Maharashtra Political Crisis: Now a fortnight of mind games and blind games What will the MLAs do in the next 15 days | Maharashtra Political Crisis : आता माईंड गेम आणि ब्लाईंड गेमचा पंधरवडा! आमदार पुढचे १५ दिवस काय करतील?

Maharashtra Political Crisis : आता माईंड गेम आणि ब्लाईंड गेमचा पंधरवडा! आमदार पुढचे १५ दिवस काय करतील?

Next

श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक लोकमत, नागपूर -

महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीचे वादळ तूर्त शमणारे नाही, थांबणारे नाही, हे सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत स्पष्ट झाले. आहे ती स्थिती १२ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह सर्व संबंधितांनी त्यांचे म्हणणे पाच दिवसांत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे वैशिष्ट्य म्हणजे महाविकास आघाडी सरकार आणि एकनाथ शिंदे यांचा बंडखोर गट या दोघांनाही पंधरा दिवसांसाठी का होईना आपल्याला दिलासा मिळाल्याचा दावा करता येईल. सोबतच झिरवाळ यांनी शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवर ११ जुलैपर्यंत कारवाई करू नका, असे म्हटले आहे. हा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. जवळपास ५० आमदारांच्या आपल्या गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याने सरकार अल्पमतात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी आणखी पंधरा दिवस तरी या सरकारला धोका नाही, हे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करतील. 


हे सारे स्पष्ट असले तरी पंधरा दिवस एका बाजूला माईंड गेम, तर दुसऱ्या बाजुला ब्लाईंड गेम खेळला जाईल. शिवसेनेकडून माईंड गेमला सुरुवात करण्यात आली आहेच. आम्ही आमचे काही ट्रोजन हॉर्स गुवाहाटीच्या बंडखोरांच्या तंबूत पाठवले आहेत. बंडखोरांपैकी विसेक जण पक्षाच्या संपर्कात आहेत. बंडखाेर आमदार मुंबईत परत आल्यानंतर त्यापैकी अनेकजण पुन्हा पक्षात येतील, ही वक्तव्ये याच माईंड गेमचा भाग आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत हे या माईंड गेममधील मुख्य खेळाडू आहेत आणि नेमके त्यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीने पत्राचाळप्रकरणी समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालना जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाईदेखील नेमकी या सत्तासंघर्षावेळीच झाली आहे. या खेळीत शिंदेगटही मागे नाही. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा अथवा यामिनी जाधव यांच्यापासून ते सुभाष साबणे, शंभुराज देसाई असे आजी-माजी आमदारांचे पक्षाला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारणारे व्हिडिओज हा त्याच खेळीचा भाग आहे. 


आता गुवाहाटीत पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठाेकलेले बंडखोर आमदार पुढचे पंधरा दिवस काय करतील, याकडे सगळ्यांचे लक्ष असणे स्वाभाविक आहे. इतके दिवस आपल्या मतदारसंघापासून, कुटुंब व कार्यकर्त्यांपासून अडीच - पावणेतीन हजार किलोमीटर अंतरावर एकाकी मुक्काम करणारे आमदार तिथल्या पंचतारांकित सोयीसुविधा आणखी किती दिवस उपभोगू शकतील किंवा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भाषेत झाडी, डोंगार, हाटील अशा नयनरम्य निसर्गात किती रममाण होतील? 


इकडे महाराष्ट्रात, मुंबईतही महाविकास आघाडी सरकारसाठी सारे काही सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे, असे अजिबात नाही. नरहरी झिरवाळ यांनी नोटिसा पाठविलेले सोळा आमदार पात्र - अपात्र ठरले काय किंवा त्यांच्यासह सगळ्या आमदारांनी त्यांचा गट अन्य कोणत्या पक्षात विलीन केला किंवा नाही केला तरी आघाडी सरकार संख्याबळाबाबत नक्की मागे पडले आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून सरकारला विश्वासमत प्रस्ताव पारित करण्याचा आदेश दिला तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश लागू होतील की नाही, यावर तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांच्या गोटातील नऊ मंत्र्यांच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपविली असली तरी सरकार म्हणून त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. 


आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेते, मंत्री या पंधरा दिवसांत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. गेला आठवडाभर दोन्हींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हे सांगितले गेले. शिवसेनेतील बंडाळी जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसा या भूमिकेचाही राजकीय कस लागेल. दोन्ही काँग्रेसबाबतही एखादी योजना नसेल किंवा डाव भाजपकडून टाकला जाणार नाही, असे नाही. 


महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या सत्तासंघर्षातील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. मुळात ही लढाई भाजप विरुद्ध शरद पवार यांचे अपत्य असलेली महाविकास आघाडी अशी आहे. पवार मैदानात उतरले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अंगात बळ आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अजून पडद्यामागेच आहेत. ठाकरे सरकार अस्थिर होणे, ही भाजपसाठी मोठीच जमेची बाजू आहे; परंतु लढाई अर्ध्यावर थांबली आहे. प्रत्यक्ष आघाडीतून बाहेर पडणाऱ्या आमदारांचा गट प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष भाजपसोबत येऊन दोहोंचे सरकार स्थापन होईल, तेव्हाच ही लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असेल. त्या अर्थानेही हा ब्लाईंड गेम आहे. 
shrimant.mane@lokmat.com

Web Title: Maharashtra Political Crisis: Now a fortnight of mind games and blind games What will the MLAs do in the next 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.