Maharashtra Politics: घसरलेल्या जिभा आणि थोबाडं फोडण्याची लगबग
By सचिन जवळकोटे | Published: August 5, 2021 05:44 AM2021-08-05T05:44:29+5:302021-08-05T05:46:27+5:30
Maharashtra Politics: नारद तळकोकणात गेले, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर बोर्डच लावलेला- ‘चोवीस तास नेत्यांच्या सेवेत! बारा तास मुंबईचे मंत्री, बारा तास दिल्लीचे मंत्री’
- सचिन जवळकोटे
(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)
इंद्र दरबारात भलतंच आक्रित घडलं. दरबाराचं मनोरंजन करणाऱ्या अप्सरा अलीकडे विचित्र वागू लागल्या होत्या. ज्यांच्या पावलांमधून नृत्यकला फुलायची, त्यांच्या वाणीतून अचानक स्फोटक शब्दांचे अंगार फुलू लागले.
नेहमीची शालीन परंपरा विसरून एकमेकींना ‘अस्वर्गीय’ भाषेत हिणविणाऱ्या या अप्सरांमुळे अवघा दरबार बुचकळ्यात पडला. इंद्र महाराजांनी राजवैद्यांना पाचारण केलं. त्यांनी अस्वस्थ होत भर दरबारात असमर्थता दर्शवली, ‘महाराज.. आपल्या अप्सरा तशा खूप चांगल्या, मात्र भूतलावरून आलेला एक भयंकर विषाणू अनेकींच्या जिभेवर रेंगाळतोय. त्यामुळे यांचीही भाषा अशी असभ्य बनत चाललीय.’
मग काय.. इंद्राच्या आदेशानुसार नारद मुनी तत्काळ भूतलावर पोहोचले. या नव्या विषाणूचा शोध घेण्यासाठी त्यांनी एका डॉक्टरांची भेट घेतली.
“डॉक्टर.. भल्याभल्यांची जीभ अनियंत्रित करणारा हा विषाणू तुम्हाला माहितीय का?”
डोकं खाजवत डॉक्टर उत्तरले, “हो. मी अलीकडे ऐकतोय त्याच्याबद्दल. विशेष करून राजकीय नेत्यांना खूप ग्रासलंय म्हणे त्यानं. तुमची इच्छा असेल तर भेटू या नेतेमंडळींना. चला.”
नारद अन् डॉक्टर सर्वप्रथम गेले तळकोकणात. तिथं भेटले जिल्ह्याचे अधिकारी. त्यांच्या केबिनसमोर भलामोठा बोर्ड लावलेला. ‘चोवीस तास नेत्यांच्या सेवेत. बारा तास मुंबईच्या मंत्र्यांसाठी. बारा तास दिल्लीच्या मंत्र्यांसाठी.’
वाचून आश्चर्यानं सवयीप्रमाणं नारद मुनी पुटपुटले, “नारायण.. नारायण..” हे वाक्य कानावर पडताच आतले अधिकारी गडबडीत केबिनबाहेर आले, “कुठाहेत साहेब?” गालातल्या गालात हसत मुनी पुढे सरकले. तिथल्या विमानतळाबाहेर नवा बोर्ड लटकला होता : राणे एअरपोर्ट. मुनींनी गोंधळून सिक्युरिटी टीमला विचारलं, “मुंबई एअरपोर्टवरचा बोर्ड बदलल्याचं माहीत होतं. पण, हा काय प्रकार.. तुमचे नेतेही विमान उडवू लागलेत की काय?”
यावर एक जण शांतपणे म्हणाला, “ते विमान नाही, सीएम-बीएम उडवतात.”
मुनींनी प्रश्नार्थक नजरेनं बघताच डॉक्टर कानात पुटपुटले, “या विषाणूचं प्रस्थ बहुधा इथंच जास्त असावं. खूप वर्षांपूर्वीच पिता-पुत्रांना लागण झालीय ना याची.”
मजल-दरमजल करत दोघे मुंबईत पोहोचले. एका मंदिरासमोर प्रसाद वाटप सुरू होतं. डॉक्टरांनी एक लाडू नारदांना दिला. मात्र तो काही फुटता फुटेना, “हा प्रसाद कसा फोडायचा हो?” मुनींनी जोरात विचारताच आजूबाजूला कालवा झाला. हलकल्लोळ माजला. ‘भगवं उपरणं’वाले तावातावात पळत आले, “कुठे आहे प्रसाद.. बघतोच आम्ही आता.. कसा फोडतोय ते.”
भांबावलेल्या डॉक्टरांनी विचारलं, “तुमचा काय संबंध.. तुम्ही कोण?” तेव्हा एक जण मोबाइलमधला ‘रौतां’चा मेसेज दाखवत अंगावर धावून आला, “आम्ही शाखाप्रमुख. तुम्हाला उत्तर आता आम्हीच देणार..” तेव्हा तिकडून दुसऱ्या शाखेचे शिक्षक हातात ‘दंड’ वगैरे घेऊन धावून आले, “अंगावर आलेल्यांना सोडू नका. आपल्या नागपूरच्या नेत्यांनी जाहीरच केलंय तसं..” - तेही घोषणा देऊ लागले.
दोन्हीकडचा विचित्र रागरंग पाहून दोघेही तिथून पटकन निसटले. ‘वर्षा’ बंगल्याकडे जाताना वाटेत एका दुकानाबाहेर बोर्ड दिसला, ‘या परिसरात थपडा स्वस्तात मिळतात. एक वर एक फ्री. सोबत पायावर उभं राहण्यासाठी कुबड्याही दिल्या जातील.’
“डॉक्टर.. विषाणूचा फैलाव भलताच पसरलाय वाटतं. त्याचा असर आपल्यावर होण्यापूर्वीच निघू या,”- नारदांनी भीती व्यक्त करताच दोघेही परत फिरले.
कपाळावरचा घाम पुसत मुनी घाईघाईनं इंद्र दरबारात पोहोचले. त्यांनी महाराजांना रिपोर्ट सादर केला, “भूतलावर जीभ भ्रष्ट करणारे विषाणू-बिषाणू काही नाहीत. मुंबईत थोरले काका अन् उद्बोधन एकमेकांना भेटले की कोकणातली जीभ घसरते. दिल्लीत नमो अन् उद्धो चर्चा करताच रौतांचीही भाषा बदलते. नंतर कोल्हापुरात देवेंद्र अन् उद्धो एकमेकांना नमस्कार करताच प्रसादांची जीभ लाडावते. बाकी काही नाही.” हे ऐकून दचकलेल्या इंद्र महाराजांनी हळूच विचारलं, “मग आता अमित भाई अन् थोरले काकांच्या भेटीनंतर कुणाकुणाची जीभ सळसळणार?” - नारायण.. नारायण..