भाजपमध्ये कुणाकुणाची दुकाने बंद होणार? प्रस्थापितांची तिकिटे कापून गुजरात पॅटर्न राबविला तर...

By यदू जोशी | Published: December 16, 2022 08:20 AM2022-12-16T08:20:07+5:302022-12-16T08:24:41+5:30

प्रस्थापितांची तिकिटे कापून भाजपने गुजरातेत भरघोस यश मिळवले. हाच पॅटर्न महाराष्ट्रात लावायचे ठरले तर भल्याभल्यांना घरी बसावे लागेल!

Maharashtra Politics: Whose shops will be closed in BJP? If the Gujarat pattern is implemented by cutting the tickets of the leaders | भाजपमध्ये कुणाकुणाची दुकाने बंद होणार? प्रस्थापितांची तिकिटे कापून गुजरात पॅटर्न राबविला तर...

भाजपमध्ये कुणाकुणाची दुकाने बंद होणार? प्रस्थापितांची तिकिटे कापून गुजरात पॅटर्न राबविला तर...

googlenewsNext

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

गुजरातमध्ये भाजपने ५९ विद्यमान आमदारांची तिकिटे कापली, नवीन चेहरे दिले आणि भरघोस यश मिळविले. त्याच्या काही महिने आधी तिथे मुख्यमंत्र्यांसह सगळेच नवे मंत्री भाजपने दिले. अच्छाअच्छांना घरी बसविले. मोदी-शहांचे हे राज्य. नवीन चेहरे देण्याची खेळी तिथे यशस्वी झाल्याने आता भाजप ही खेळी विविध राज्यांमध्येही खेळणार का? - महाराष्ट्रात तसेच झाले तर भल्याभल्यांना घरी बसावे लागेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्येही तेच केले गेले तर अनेकांची दुकाने बंद पडतील. गुजरात भाजपमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाला दोनदा किंवा खूप मुश्किलीने आणि अपवाद म्हणून तिसऱ्यांदा  तिकीट दिले जाते.  आपल्याकडे पाच-पाच टर्मचे नगरसेवक आहेत. गुजरात पॅटर्न आला तर आपले कसे होईल अशी भीती दाटणे स्वाभाविक आहे. प्रस्थापितांना घरी बसविण्याची नामी संधी म्हणूनही हा पॅटर्न आणला जाऊ शकतो. 

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांचे डिपॉझिटही वाचले नाही. त्यामुळे तिकिटांच्या कापाकापीने काही फरक पडत नाही, याबाबत भाजपचा विश्वास वाढला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही असाच प्रयोग झाला तर काही विद्यमान मंत्र्यांनाही घरी बसावे लागेल. शिंदे-फडणवीस सरकार आले तेव्हा भाजपच्या  काही दिग्गजांचे मंत्रिपद जवळपास गेलेच होते, पण त्यातील तिघांनी दिल्लीवारी केली, आधीच्या चुका करणार नाही म्हणून सांगितले, देवेंद्र फडणवीस यांनीही मग त्यांच्यासाठी शिष्टाई केली आणि तिघांची मंत्रिपदे वाचली, ही बाब लपून राहिलेली नव्हती. 

चंदूभाऊ आणि ५० पानांचे पुस्तक
 चंद्रशेखर बावनकुळे गेल्या आठवड्यात भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दिल्लीत होते. वाचनाशी फारसा संबंध नसलेल्या चंदूभाऊंच्या हाती पक्षाने  ५० पानांचे एक पुस्तक दिले. आगामी काळात कुठले कार्यक्रम राबवायचे आहेत हे त्या पुस्तकात दिले आहे. पक्षसंघटनेच्या माध्यमातून ते राबवायचे असल्याने टीम बावनकुळेंची कसोटी लागणार आहे. ही मोदी-शहा-नड्डांची शाळा आहे. तिथे पासच व्हावे लागते; नापास झाला तरी ढकला पुढच्या वर्गात असे चालत नाही. एक भारत जोडो केली की संपले असेही तिथे चालत नाही. बावनकुळे पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरतात; दरवेळी सोबत सरचिटणीस विक्रांत पाटीलच असतात. त्यामुळे बाकीच्या सरचिटणीसांना फारसे काम उरलेले नाही. शिवाय पाटील सोबत असल्याने बावनकुळेंशी कोणाला एकट्यात बोलता येत नाही, अशीही तक्रार हल्ली लोक खासगीत करतात. 

विस्तार का अडला आहे? 
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही. अधिवेशनापूर्वी करू असे फडणवीस म्हणत होते. आता जे होईल ते अधिवेशनानंतरच. अडचण काय ते समजत नाही. काही जण म्हणतात की, शिंदे गटाला आणखी फार तर पाच-सात मंत्रिपदे मिळतील. विस्तार केला तर त्यांच्याकडे किमान ३३ जण मंत्रिपदापासून वंचित राहतील, मग पुन्हा खदखद सुरू होईल. त्यापेक्षा विस्तारच नको अशी भूमिका घेतली जात आहे. शिंदेंचे काम ‘अशर’दार आहे. विस्तार झाला नाही तरी फरक नाही पडत. मात्र त्यामुळे  भाजपमधील इच्छुकांना फटका बसत आहे. तिथे तर असे आहे की सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही. बोलना मना है. असेही म्हटले जाते की, शिंदे गटाचे  निवडणूक चिन्ह मिळणे वगैरे मुद्द्यांचा फैसला झाला की नंतरच विस्तार आणि महामंडळांचे वाटप करायचे.  

एक तर्क असाही दिला जात आहे की, एका मोठ्या पक्षातील काही आमदार स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देतील आणि त्या गटातील काही जण मंत्री होतील. त्यासाठीची बोलणी सध्या सुरू आहेत आणि तेवढ्यासाठीच विस्तार अडला आहे. आता खरे-खोटे फडणवीसांनाच माहिती अन् त्यांच्या पोटातील पाणी कधी हलत नसते. विधानसभा निवडणूक हा नंतरचा विषय आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून भाजपची कॅलक्युलेशन्स सुरू आहेत. दिल्लीश्वरांसमोर महाराष्ट्रातील  ४५ जागांचे टार्गेट आहे, त्यासाठी ‘दादा’लोक सोबत लागतीलच ना! संपत्ती अशीच मोकळी होत नसते. त्यामागे बरेच संदर्भ असतात भौ! 

नागपूर अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक झाली अन् भाजपला ते पद मिळाले तर समजायचे की लवकरच आणखी काहीतरी घडणार आहे. राज्यसभा, विधान परिषद निवडणूक जिंकून दाखविली तर फडणवीसांच्या बंगल्याचा पत्ता बदलेल, असे भाकीत मागे वर्तविले होते. सभापतिपदाची निवडणूक झाली तर चमत्कार घडेल! महाविकास आघाडीला सुरुंग याच अधिवेशनात लावायचा की नाही हे अद्याप फायनल झालेले नाही. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठे धक्के बघायला मिळतील. महाविकास आघाडीची भक्कम एकजूट भाजपला नक्कीच अस्वस्थ करीत असेल. हे तिन्ही पक्ष एकत्र राहिले तर काही खरे नाही, याचाही अंदाज आला असणारच. फक्त शिंदेसेनेला सोबत घेऊन ४५ जागा मिळवता येतील असे भाजप श्रेष्ठींनाही वाटत नसेलच, त्यामुळे आणखी काही जणांवर जाळे टाकले जाईल. ड्रॅगनचा विळखा अधिक घट्ट होईल. तो बारामती, सांगलीपासून नांदेड, चंद्रपूरभोवतीही पडू शकतो.

Web Title: Maharashtra Politics: Whose shops will be closed in BJP? If the Gujarat pattern is implemented by cutting the tickets of the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.