प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चालेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 07:03 PM2018-09-25T19:03:31+5:302018-09-25T19:10:32+5:30
उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्यानंतरही मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये डीजेचा आवाज घुमला. मुंबईत २०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले.
- धर्मराज हल्लाळे
उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्यानंतरही मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये डीजेचा आवाज घुमला. मुंबईत २०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. उत्सवादरम्यान लातूरसारख्या ठिकाणीही एक गुन्हा दाखल झाला. एकीकडे ध्वनी प्रदूषण तर काही ठिकाणी जल प्रदूषणही होत राहीले़ या सर्व प्रकारांवर कायदा काम करत राहील. परंतू, त्याहीपेक्षा एक गंभीर गोष्ट आणि श्रद्धावानांच्या श्रद्धेला ठेच पोहोचविणारी नित्याने घडत असते़. विसर्जनादिवशी अनेक शहरांमध्ये उत्तम सुविधा केल्या जातात. जलाशयांमध्ये पाणी सोडले जाते. विहीर व कुंड स्थळी कार्यकर्ते आपली सेवा बजावतात. मात्र अनेक ठिकाणी ज्या विहिरींवर विशेष सुविधा नसतात. तिथे गणेशमूर्तींचे विसर्जन विधिवत होत असले तरी त्या विहिरींमध्ये पाणी किती आहे. तेथील अवस्था कशी आहे हे सुद्धा काही वेळा पाहिले जात नाही.
लातूर शहराच्या पश्चिम भागातील अशाच एका विहिरीवरील विसर्जन पाहिले असता पर्यावरणाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. त्याबरोबर ज्या श्रद्धेने लोक उत्सव साजरा करतात तिथे त्याच भावनेचेही विसर्जन केले जाते, असे म्हणावे लागेल. ही स्थिती सर्व शहरांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून येते़ विहिरीच्या पाण्याचे प्रदूषण हा विषय तर कोणाच्याही पटलावर नसतो. शिवाय मूर्ती ज्या पद्धतीने विसर्जीत केल्या जातात. त्यामुळे तिथे विटंबना होत नाही का हा प्रश्न पडतो. विहिरी व नदीपात्रात दुसऱ्या दिवशी काही ठिकाणचे बघायला मिळणारे चित्र हे धर्मभावना दुखावणारे असत नाही का, हाही सवाल विचारावासा वाटतो. सर्वजण विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीचे दृश्य पाहून खासगीमध्ये चुकीचे झाले असे म्हणतात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे, असेही सांगतात. परंतु, त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणीही विशेष प्रयत्न करीत नाही.
गणेश विसर्जनादरम्यान जालना व नांदेड जिल्ह्यात चौघेजण बुडाले. प्रत्येक वर्षी या दुर्घटना घडत राहतात. विसर्जन स्थळाची पाहणी स्थानिक पोलिस प्रशासन करत असते. महापालिकेकडून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी उचलली जाते़ निर्माल्य नदीपात्रात, विहिरीत टाकू नका हेही सांगितले जाते. परंतु, नित्याने हे चालत राहते. गणेश विसर्जन करताना कोणाचाही जीव धोक्यात जाऊ नये यासाठी विसर्जन स्थळी कार्यकर्ते, सुरक्षा जवान तैनात असतात. त्यानंतरही राज्यामध्ये २० पेक्षा अधिक भक्तांचा मृत्यू झाला. या घटना घडलेल्या शहरात तरी पुढच्या वर्षी धोक्याची पातळी ओळखून नियोजन होईल का हा प्रश्न आहे.
अगदीच सर्व ठिकाणी, सर्वांनीच पर्यावरणाला हानी पोहोचविली असे नाही. अनेक गणेश मंडळांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. त्याचे देखावे केले़ प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचेही काम केले़ परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विशेषत: प्रदूषण मंडळ नियंत्रणाच्या डोळेझाक करण्यामुळे ध्वनी व जल प्रदूषण बिनदिक्कतपणे केले जाते़ महानगरांमध्ये शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्याचा पुढे पाठपुरावा केला जात नाही. पुरावे गोळा करून शिक्षा होईल, असे फारसे घडत नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासन गुन्हे दाखल करून मोकळे होते. त्यामुळे तुम्हाला जे करायचे ते करा आम्ही कायद्याचा भंग करत राहणार ही प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. परिणामी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही चालेना असेच म्हणावे लागेल. यापूर्वीच्या निकालांचा संदर्भ देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक नियमावली जारी केल्या आहेत. शेवटी त्या कागदावरच राहतात. त्यासाठीही न्यायालयाच्याच एखाद्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.