मराठी मुलखी कधी कमलदलाचा गळा, कधी धनुष्य बाणाचा कळवळा

By सुधीर महाजन | Published: September 7, 2019 07:08 PM2019-09-07T19:08:57+5:302019-09-07T19:14:00+5:30

ही मंडळी वातकुक्कुटापेक्षाही हुशार म्हणावी. ज्यांनी रातोरात आपली दुकाने बदलली आणि तेवढ्याच हुशारीने नव्या धंद्यात जम बसवला याचे.

In Maharashtra some politicians like BJP some favors Shiv sena | मराठी मुलखी कधी कमलदलाचा गळा, कधी धनुष्य बाणाचा कळवळा

मराठी मुलखी कधी कमलदलाचा गळा, कधी धनुष्य बाणाचा कळवळा

googlenewsNext

- सुधीर महाजन 

महाराष्ट्र देशी सांप्रत केवळ आर्थिक मंदीचेच आगमन झाले नसोन आणखी एका मंदीने गोंधळ उडवून दिला आहे. या मंदीने भल्या भल्यांच्या नाका-तोंडात पाणी शिरले. प्रजेची बोबडीच वळत आहे. उचापती आणि उलथापालथी वाढल्याने प्रजाजन गोंधळून गेले आहेत. या मंदीमुळे अनेकांना आपले पिढीजाद व्यवसाय बदलावे लागत आहेत. वाडवडिलांपासून घराण्याचा चालत आलेला चांगला जम बसलेला कुटुंबासह नातेवाईक सोईऱ्याधाईऱ्यांचे कोट कल्याण करणारा व्यवसाय जो की, ऐन भरभराटीत होता, त्याला घरघर लागली जसे की, एखाद्या वृक्षास खोडकिडा लागला की, हिरवागार दिसणारा त्याचा पर्णसंभार वाळायला लागतो. तसे या पिढीजाद व्यवसायाचे झाले. जणू जीवनरसच आटला. आता काय, असा प्रश्न पोटात गोळा आणणारा होता. धायमोकलून रडताही येत नव्हते. करावे तर काय? व्यवसाय बंद पडला तर पोरंसोरं, नातवंडांचे भवितव्य काय, अशी चिंता मन पोखरू लागली. सारा मऱ्हाठी मुलखाला या भयाने ग्रासले. कोणी म्हणे ग्रहण लागले, कोणी म्हणे ही तर काळ्या जादूसारखी जादू. जी काळ्यापेक्षा जबरी या नव्या करणीचा शोध सुरू झाला. जारण मारण केले; पण फरक पडत नव्हता. व्यवसाय लयाला जायचे काही थांबत नव्हते. आपले गिºहाईक दुसरीकडे कसे जाणार नाही, याची चिंता लागून राहिली होती.

अशा परिस्थितीमुळे धापवळ वाढली. पूर्वी अशावेळी बारामती, (बारामती होस्टेल) रॉयलस्टोनच्या रस्त्यांवर गर्दी व्हायची; पण यावेळीही ही गर्दी खान्देशात जामनेरच्या रस्त्यावर होती. तिकडे कोल्हापुराकडे होती. व्यवसाय टिकविण्यासाठी चालणाऱ्या धावपळीने गर्दी झाली. रातोरात व्यवसाय बदलण्याची शक्कल शोधली आणि प्रजाही चकित झाली. गांधी बाबांच्या तसबिरी, सुताचे हार, माझे सत्याचे प्रयोग, अशा वाणसामानाच्या दुकानांवर अचानक या वस्तू मिळेनाशा झाल्या. सगळे सामान रस्त्यावर आणून ठेविले. कोणीही घेऊन जा, फुकट न्या, असे सांगो लागले. लोकांस वाटले दिवाळी तोंडावर आली म्हणोन जुन्या-पुराण्या फुटकळ वस्तू टाकून देऊन रंगरंगोटी करण्याचा विचार दिसतो; पण रातोरात रंगरंगोटी झाली. सफेद रंगाऐवजी भगवा रंग पोतारण्यात आला. दुकानातील सामानही बदलले. टेबल, खुर्च्यांऐवजी, तक्के, लोड, गाद्या. समोर बसके लकडी डेस्क आले. घरातील, दुकानातील सगळ्यांनी आपला वेश पालटला सफेद, कांजीच्या कपड्यांऐवजी सुरवार, अंगरखा, पागोटे, पगडी. अगदी भगव्या टोप्या आल्या. गळ्यात उपरणे आणि कोठे ते लढ-हिरे, तर कोठे फक्त भगवे. असा वेश बदलला. दुकानातील वाणसामान बदलले. गांधी बाबा, चरखा, सूत याऐवजी तेथे धनुष्यबाण आले. कोणी कमळाची शेती सुरू केली आणि कमळफुलाचा व्यवसाय मांडला. कमळ हे लक्ष्मीचे फूल. ज्यावर ती विराजमान झाली आहे. तिचे वास्तव्य असेल तर कोणताही व्यवसाय भरभराटीला येतो, हे मर्म काही पिढीजाद व्यावसायिकांनी जाणले होते. किंबहुना त्यांच्या घराण्याचा कानमंत्र होता की, व्यवसाय कोणताही करा; पण लक्ष्मी स्थिरोभव कशी राहील, याची काळजी घ्या, म्हणून काहींनी अंगणात कमळबाग फुलविली आणि भाऊ, भार्या, पुत्र यांच्या हाती धनुष्यबाण दिले. काहींनी हाती धनुष्यबाण घेतला, तर भार्येच्या हाती कमलपुष्प दिले म्हणजे दोन्ही दुकाने चालविण्याची तजवीज केली.

या पडझडीत घड्याळाचा धंदा पार बुडाला. ज्याने त्याने मनगटावरचे घड्याळ काढून खुंटीला टांगून ठेवले. असे का करता, असा जाहीर सवाल करता हल्ली हाती मोबाईलनामक जादुई मंत्र आल्याने घड्याळ निरुपयोगी ठरते, असे कारण पुढे करीत वेळ मारून नेली. त्यामुळे घड्याळाचा कारखानाच बंद पडतो काय, असे भय उत्पन्न झाले. कारण आम्हास घड्याळाची टिकटिक ऐकिल्याविना चैन पडत नसे. घड्याळ बंद पडले, तर आम्ही स्वत:चीच नाडी तपासून पाहत असू. नंतर हाताला चिमटा घेऊन जिवंत असण्याची खात्री करून घेत असू; पण आता ते भय ओसरले आहे. घड्याळ न घालता आम्ही जिवंत आहोत. असाच अनुभव अनेकांच्या गाठी आहे.

या बदलत्या व्यवसायाची वार्ता आमच्या कानी आली त्यासमयी आम्ही घरातून बाहेर पडलो आणि नगरात फेरफटका मारला, तर अवचित घडल्यासारखे नजरेत पडले. जसे की, गाडगीळ सराफाने आपला पिढीजाद सराफी व्यवसाय बंद करोन फ्याब्रिकेशनचे दुकान थाटावे, असा प्रकार झाला. ज्याठिकाणी गांधी बाबाच्या तसबिरी होत्या तेथे गोडसे दिसले आणि भोवळच आली. काहींनी तर जुने वाया घालू नये, असे म्हणत घड्याळाचे काटे काढून त्याचा बाणासारखा उपयोग केला. कोणी नुसते घड्याळ समोरच्या भिंतीवर टाकून त्याचा लक्ष्य म्हणून उपयोग करत काट्याच्या बाणाने वेध घेण्याचा प्रयत्न करत होते. या मंडळीचे आम्हास आश्चर्य वाटले. ही मंडळी वातकुक्कुटापेक्षाही हुशार म्हणावी. ज्यांनी रातोरात आपली दुकाने बदलली आणि तेवढ्याच हुशारीने नव्या धंद्यात जम बसवला याचे.

मराठी मुलखा नाना कळा , कलागतखोरांचा गलबला 
कधी कमलदलाचा गळा, कधी धनुष्य बाणाचा कळवळा

 

Web Title: In Maharashtra some politicians like BJP some favors Shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.