उष्ण लाटांनी महाराष्ट्र होरपळला
By admin | Published: April 16, 2017 03:00 AM2017-04-16T03:00:10+5:302017-04-16T03:00:10+5:30
मार्च ते मे हे महिने सर्वसाधारणपणे उन्हाळ्याचे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत महाराष्ट्रात खूपच उष्ण असतात. महाराष्ट्रातील सगळ्याच भागांत कोकण,
- शुभांगी भुते
मार्च ते मे हे महिने सर्वसाधारणपणे उन्हाळ्याचे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत महाराष्ट्रात खूपच उष्ण असतात. महाराष्ट्रातील सगळ्याच भागांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दिवसा सरासरी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असतो. मुळात उष्णता वाढण्यामागचे कारण असे की, गुजरात राज्यावर एक प्रतिचक्रिवादळ तयार होत असते आणि यातून महाराष्ट्रात येणारे वारे सहसा शुष्क आणि उष्ण असतात. त्यामुळे आर्द्रतेतसुद्धा कमालीचे चढउतार पाहाण्यास मिळतात.
सद्यस्थितीमध्ये म्हणजे या वर्षी आपण जे तापमान पाहतो, हा त्याचाच भाग आहे. सध्या प्रतिचक्रिवादळ गुजरात राज्यावर असल्यामुळे, आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिउष्ण लहरी येतात. दिवसाचे कमाल तापमान सरासरी तापमानात तफावत वाढते आणि सध्याचे तापमान संपूर्ण ४० अंशाच्या जवळपास पोहोचले आहे. विदर्भात तर ४३-४४ अंशापर्यंत कमाल तापमान पोहोचले आहे. काही संशोधनात हे सत्य समोर आले आहे की, अतितीव्र ‘अल निनो’ चा प्रभाव म्हणून येणारे वर्ष हे अतिउष्ण पाहिले गेले आहे. या वर्षी आपल्याला त्याचाच प्रत्यय येत आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे तर उष्ण वातावरणाचे मुख्य प्रदेश आहेत.
जसजसा उन्हाळा सरकत जाईल, तसतसे तापमान अधिकाधिक वाढल्याचे पाहाण्यास मिळेल. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वअनुमानानुसार सरासरी तापमान १ अंशाने जास्त राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच उष्ण लहरींची पण तीव्रता जास्त राहाण्याची शक्यता आहे आणि सध्या आपण त्याचाच अनुभव घेत आहोत. भिरा, चंद्रपूर, सांगली, सातारा, महाबळेश्वर आणि डहाणूसह इतरत्र पारा ४० अंशावर आहे आणि उन्हाळ्याचा कहर पाहता, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ऊन्हाचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहाण्यास मिळणार आहे.
दरम्यान, सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटी तापमान वाढल्याचे आपणास निदर्शनास आले आहे. मध्यंतरी गुजरातमध्ये निर्माण झालेले चक्रिवादळ उष्ण लाटा निर्माण करत आहे आणि याच उष्ण लाटा महाराष्ट्राला होरपळून टाकत आहेत. उष्णतेच्या लाटेचे प्रमाण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक आहे. परिणामी, येथील कमाल तापमान ४० अंशावर पोहोचले आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच दिलेल्या पूर्वानुमानानुसार, मागील तीनएक दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे आणि पुढील ४८ तासांसाठी येथे उष्णतेची लाट राहील, असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे. एकंदर गुजरातवरील प्रतिचक्रिवादळ उष्णतेच्या लाटांना कारणीभूत असून, महाराष्ट्रात येणारे शुष्क आणि उष्ण वारे, शिवाय आर्द्रतेतील कमालीचे चढउतार तापमानवाढीस कारणीभूत असल्याने, चैत्रातल्या उष्ण लाटांनी महाराष्ट्र होरपळून निघाला आहे.
(लेखिका मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या संचालिका आहेत.)