‘एबी’ नव्हे, ‘ए’ व ‘बी’ फॉर्म! नेमके कसे व कशासाठी असतात हे फॉर्म?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:14 AM2019-10-01T05:14:12+5:302019-10-01T05:28:21+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात.
- अजित गोगटे
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात. एवढेच नव्हे तर सर्वच पक्षांचे नेते व उमेदवारही सराईतपणे ‘एबी फॉर्म’ असेच म्हणताना दिसते. निवडणुकीत वापरले जाणारे हे फॉर्म नेमके काय आणि कशासाठी आहेत. याविषयीचे अज्ञान किंवा अर्धवट माहितीमुळे असे होते.
‘एबी’ असा कोणताही फॉर्म नाही. ‘ए’ व ‘बी’ असे दोन स्वतंत्र फॉर्म असून निवडणूक आयोगाने १९६८ मध्ये दिलेल्या निवडणूक चिन्हांचे आरक्षण आणि वाटप याविषयी दिलेल्या आदेशान्वये या फॉर्मचे ठराविक नमूने ठरवून देण्यात आले आहेत. तंतोतंत त्याच नमुन्यात हे फॉर्म भरून द्यावे लागतात. या फॉर्ममधील चुका किंवा त्रुटी यामुळेही उमेदवारी अर्ज फेटाळला जाऊ शकतो. हे फॉर्म मान्यताप्राप्त पक्षांतर्फे निवडणूक लढविणाºया उमेदवारांनाच फक्त लागू आहेत.
अपक्ष उमेदवारांना हे फॉर्म द्यावे लागत नाहीत. राजकीय पक्षांनी कोणत्या मतदारसंघांतून कोणते उमेदवार उभे केले आहेत याची माहिती निवडणूक आयोगाला अधिकृतपणे देण्याची हे दोन फॉर्म माध्यम आहेत. प्रत्येक उमेदवारी अर्जासोबत हे दोन्ही फॉर्म जोडावे लागतात. या फॉर्ममध्ये दिलेली माहिती अंतिम मानली जाते व त्याच आधारे मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे, पक्षाचे नाव व चिन्ह छापले जाते.
‘ए’ फॉर्म संबंधित पक्षाचा अध्यक्ष/सरचिटणीस यांनी स्वाक्षरी व पक्षाच्या शिक्क्यासह भरून द्यायचा असतो. पक्षातर्फे अधिकृत उमेदवारांची नावे कळविण्याचे अधिकार ज्यांना दिलेले असतील अशा पदाधिकाऱ्यांची नावे व त्यांच्या स्वाक्ष-यांचे प्रत्येकी तीन नमुने या फॉर्ममध्ये दिलेले असतात. या प्राधिकृत पदाधिका-यांच्या स्वाक्षरीने ‘बी’ फॉर्म दिला जातो व त्यात कोणत्या मतदारसंघात पक्षाने कोणाला उमेदवारी दिली आहे व त्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला किंवा काही कारणाने त्याने उमेदवारी मागे घेतली तर पर्यायी उमेदवार कोण याची संपूर्ण माहिती या फॉर्ममध्ये दिलेली असते. ‘बी’ फॉर्म प्रत्येक उमेदवारास स्वतंत्रपणे दिला जातो. ‘ए’ फॉर्म सर्व उमेदवारांसाठी दिला जाणारा सामुदायिक फॉर्म असतो.