आशा-अपेक्षांचे नवे नाव आहे ‘देवाभाऊ’!

By विजय दर्डा | Published: December 2, 2024 04:48 AM2024-12-02T04:48:29+5:302024-12-02T04:51:12+5:30

आदर, सन्मान व्यक्त करणारे देवाभाऊ हे संबोधन मिळत नाही, ‘मिळवावे’ लागते! मुख्यमंत्रीपदाचा नवा कार्यकाळ अपूर्ण कामे, अधुरी स्वप्ने पूर्ण करणारा असेल!

Maharashtra Vidhan Sabha Election Special editorial Article on Devendra Fadnavis | आशा-अपेक्षांचे नवे नाव आहे ‘देवाभाऊ’!

आशा-अपेक्षांचे नवे नाव आहे ‘देवाभाऊ’!

डाॅ. विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,  लोकमत समूह

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील, यावर आता मोहोर लागली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येईल अशी अपेक्षा लोकांना नक्कीच होती; परंतु महायुती इतका प्रचंड विजय मिळवून सत्तेत परत येईल, असा अंदाज राजकारणाच्या प्रकांड पंडितांनाही नव्हता. भाजपला १३२ जागा मिळतील, असे अजिबातच वाटले नव्हते. भाजपच्या विजय गाथेचे मुख्य लेखक देवेंद्र फडणवीसच आहेत. साध्या-सरळ स्वभावाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचे ब्रह्मास्त्र महायुतीने फेकले. विजय तर मिळालाच, पण  देवेंद्र फडणवीस यांना एक नवे नाव मिळाले ‘देवाभाऊ’. देवाभाऊ या शब्दाची व्याख्या आपण ‘देवेंद्र नावाचा भाऊ’ अशीच करू. परंतु काही महिला ‘देवासारखा मोठा भाऊ’ असे म्हणताना मी ऐकले तेव्हा थक्क झालो. एखाद्या माणसाला असा आदर किंवा सन्मान उगीचच मिळत नाही, तो मिळवावा लागतो.

देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनाची प्रारंभीची वाटचाल मला ठाऊक आहे. नगरसेवक, महापौर या पदांपासून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचताना मी त्यांना पाहिले आहे. काम करायचे असेल तर कसे करायचे हे त्यांनी उपमुख्यमंत्री असताना बारकाईने समजून घेतले आहे. मी पत्रकार आहे, दीर्घकाळ संसदीय राजकारणात भाग घेत आलो आहे. मी खात्रीपूर्वक असे म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सहज, सच्चा स्वभावाचे आणि सामान्य माणसाला समर्पित असे राजकीय नेते कमीच आहेत.. सामान्य माणसाच्या गरजा काय आणि त्या कशा पूर्ण करावयाच्या?- हे ते उत्तम जाणतात.

आता लोकांनी त्यांना देवाभाऊ म्हटले आहे आणि राजकीय रूपात पूजा करून सफलतेचा प्रसादही अर्पण केला आहे; त्यामुळे देवाभाऊ निश्चितच खूप संतुष्ट झालेले आहेत. आता  देवेंद्रना लोकांनी खुश केले आहे, तेव्हा त्यांनाही लोकांवर मेहरबान व्हावे लागेल. लोकांसाठी ते देव आहेत, आणि भाऊही आहेत; तर त्याच्यासाठी अशक्य असे काय आहे? विदर्भ आणि इतर मागासलेल्या भागाचा  विकास घडविणे त्यांच्यासाठी अजिबातच अशक्य नाही.

देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय उदय विदर्भातून झाला असल्याने विदर्भाचे उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे. २०१४ नंतर विकासाचा अनुशेष कमी झाला खरा, परंतु तो पूर्णपणे संपलेला नाही. वीज, पाणी, उद्योग, घरबांधणी, शाळा आणि रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा अजूनही सर्वत्र पोचलेल्या नाहीत. देवाभाऊंनी प्रयत्न नक्कीच केले. महायुती सरकारने हज़ारो सुकलेले तलाव जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केले. काही कमतरता राहिलीच असेल तर ती नक्कीच प्रशासकीय स्वरूपाची! समृद्धी महामार्गासारखी योजना साकार करून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाची प्रचिती दिली, हे मी याआधीही लिहिले आहे.   महाराष्ट्राचा गौरव वाढेल अशा आणखी काही योजना ते आणतील अशी अपेक्षा लोक बाळगून आहेत.

समृद्धीसारखा रस्ता प्रत्येक गावात तयार करणे कोणालाही शक्य नाही हे सर्व जाणतात. परंतु शेतकरी किमान वेळेत बाजारपेठेपर्यंत आपला शेतमाल पोहोचवू शकेल असा रस्ता गावागावात तयार करता येईल. स्थानिक मंडईपासून मोठ्या मंडया आणि शहरांपर्यंत शेतमाल पोहोचला तर त्याला योग्य भाव मिळेल. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ‘व्हिजन २०२०’ या पुस्तकात हीच कल्पना समोर मांडली होती. आज आपण २०२४ च्या शेवटच्या महिन्यात पोहोचलो आहोत. कलाम साहेबांची कल्पना किमानपक्षी महाराष्ट्रात तरी  प्रत्यक्षात आणली जावी, ही अपेक्षा देवाभाऊंकडून असेल. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीक घेतले तर त्याला योग्य तो भाव मिळत नाही. शेतमाल फेकून द्यावा लागतो. देवाभाऊ, ही परिस्थिती बदला. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उपलब्ध झाले, तर शेतकरी खुश होऊन जाईल. देवाभाऊंसाठी अशक्य असे काय आहे?

विकासाचा नवा अध्याय लिहिताना हा विकास राज्याच्या सर्व भागात समग्रपणे होईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणत्या एका प्रदेशाचा विकास अतिरेकाकडे झुकतो. भुकेपेक्षा जास्त अन्न खाल्ले, तर ते उलटून पडण्याची शक्यता असते. विकासाच्या बाबतीतही तसेच आहे. एखाद्या विशेष अशा भागात भारंभार विकास योजना राबवल्या जातात तेव्हा पर्यावरणालाही धोका संभवतो.  विकासाची फळे  प्रत्येक विभागात वाटून देत योजना तयार केल्या जातात, तेव्हा समतोल राहतो. देवाभाऊ, याकडे न विसरता लक्ष द्या. शहरांचे समाधान गावात दडलेले आहे. त्यामुळे विकासाचा प्रवाह गावांपर्यंत पोहोचला पाहिजे. गावात छोटे कुटिरोद्योग असले तर तरुणवर्ग शहराकडे का जाईल? चीनचे उदाहरण आपल्यासमोर आहे. या देशाने गावागावांना उत्पादनांचे केंद्र केले. आपल्याकडेही अशी अपार क्षमता आहे, देवाभाऊ. गरज आहे ती व्यापक दृष्टीबरोबर संकल्प आणि दृढ निश्चयाची; आणि हो, या प्रदेशातील लाडक्या बहिणींना आर्थिक समृद्धी देण्याबरोबर त्यांचे संरक्षण करणेही आवश्यक आहे, देवाभाऊ! आणखी एक, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही तर हा स्तंभ अपूर्ण राहील. ‘सामान्य माणसाचे मुख्यमंत्री’ म्हणून ते कायम ओळखले जातील. विकासासाठी त्यांनी पैशाची गंगा वाहती केली. काही अधिकारी त्यांच्या शैलीबद्दल नाराज होते ही गोष्ट वेगळी. परंतु शिंदे यांनी रांगेत सर्वात शेवटाला उभ्या असलेल्या व्यक्तीचा विचार केला. विशेषत: गरीब लोकांवर वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी त्यांनी अद्वितीय काम केले. सरकार असेच पाहिजे. ‘सामान्य माणसाचे सरकार’ अशीच सरकारची ओळख असली पाहिजे!

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election Special editorial Article on Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.