एकमेकांचे पाय खेचणाऱ्यांची गत आज उभा महाराष्ट्र पाहतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:46 AM2019-09-20T05:46:19+5:302019-09-20T05:46:45+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या निवडणुकीनंतर फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला.

Maharashtra is watching the past of those who pulled each other's feet | एकमेकांचे पाय खेचणाऱ्यांची गत आज उभा महाराष्ट्र पाहतोय

एकमेकांचे पाय खेचणाऱ्यांची गत आज उभा महाराष्ट्र पाहतोय

Next

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या निवडणुकीनंतर फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाची ही पावतीच म्हणावी लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी नाशिकमध्ये झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणूक फडणवीस यांच्याच नेतृत्वात भाजप लढविणार असल्याचे जाहीर करतानाच महाराष्ट्रात आमच्या सरकारला बहुमत द्या, असे आवाहन केले. ‘गेल्या वेळी पूर्ण बहुमत न मिळूनदेखील फडणवीस यांनी राज्याला स्थिर आणि प्रगतीशील आणि पारदर्शक सरकार दिले. अखंड, अविरत साधनेतून त्यांनी महाराष्ट्राची सेवा केली आणि राज्याला नवी दिशा देण्याचे काम केले, जलयुक्त शिवार योजनेद्वारे शेकडो गावे दुष्काळमुक्त केली’, असे गौरवोद्गारही मोदी यांनी काढले. पंतप्रधानांनी दिलेली ही शाबासकी म्हणजे फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाची पावतीच आहे. नेहमीच्या नम्रभावाने ती स्वीकारत हा तरुण नेता आता विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे. याच सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांची मुक्तकंठाने केलेली प्रशंसा हे पक्षसंघटन आणि सरकारमधील उत्तम समन्वयाचे आणि सौहार्दाचे लक्षण आहे. आघाडी सरकारमध्ये अशा प्रशंसेचे प्रसंग येत नसत. एकमेकांचे पाय खेचण्यात धन्यता मानणाऱ्यांची गत काय होते हे आज महाराष्ट्र पाहत आहे.


आता सत्तेची हिरवळ पाहणा-या भाजपमध्ये उद्या तसेच झाले तर त्यांचीही गत तीच होईल. ‘माझ्या हातून महाराष्ट्राचे कसे आणि किती कल्याण होईल हा विचार करूनच मी रोज उठतो आणि त्यानुसार विचारांची दिशा ठेवतो. सगळेच प्रश्न मी सोडवू शकलो असा माझा दावा नाही, पण हेच सरकार प्रश्न सोडवू शकते हा विश्वास जनतेच्या मनात आम्ही निर्माण केला आहे,’ असे फडणवीस नेहमीच आत्मविश्वासाने सांगतात. हा आत्मविश्वास आणि लोकाभिमुख निर्णयांची पुंजी सोबत घेऊन त्यांनी तीन टप्प्यांमध्ये महाजनादेश यात्रा काढली. पाच वर्षे राज्य केल्यावर अँटीइन्कम्बसीची भीती असते; पण ‘हार्ट टू हार्ट’ जनसंपर्क हा फडणवीस यांच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि त्यातूनच ते त्यांच्या सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’ घेऊन जनतेत गेले. जवळपास चार हजार किलोमीटर प्रवास केला. २२ दिवसांमध्ये लहानमोठ्या १६० सभा घेतल्या. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच या यात्रेच्या निमित्ताने १४० मतदारसंघांमध्ये ते पोहोचले. काँग्रेस, राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्ते आज भाजपमध्ये जात आहेत यामागे राजकीय सोयीचा विचार आहेच, पण ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ या सूत्रात वाटत असलेली आश्वासकता हेही महत्त्वाचे कारण आहे. एक राजकीय विश्वासार्हता फडणवीस यांनी सर्वच पक्षीयांमध्ये निर्माण केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून सामाजिक आरक्षणापर्यंतचे संवेदनशील विषय हाताळण्याचे कौशल्य त्यांनी दाखविले.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापासून पायाभूत सुविधांबाबत मोठी स्वप्नेच त्यांनी पाहिली नाहीत तर त्यास मूर्त स्वरूप देण्यासंदर्भात प्रारंभही करून दाखविला. महाराष्ट्रासारख्या वित्त आणि साधनसंपन्न राज्याचे नेतृत्व करताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप फडणवीस यांच्यावर होऊ शकला नाही. राजकारण हे कोळशाच्या खाणीसारखे असते, त्यात कितीही जपले तरी हात काळे होण्याची भीती असतेच, पण फडणवीस यांनी तसे अजिबात होऊ दिले नाही. राजकारणात चारित्र्याचा संस्कार त्यांनी जपला हे त्यांचे वेगळेपण. ‘सोशल इंजिनीअरिंगमध्ये माझ्यासारख्या न बसणाºया माणसाला मोदींनी मुख्यमंत्री केले’ अशी कृतज्ञता फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत व्यक्त केली. विशिष्ट लोकांनी त्यांच्या जातीच्या अंगाने त्यांच्यावर आरोप, टीका करून बघितली, पण ती ‘जाणता राजा‘ म्हणविणाºयांवरच उलटली. जातीपातीपलीकडे जाऊन समाजाकडे बघण्याच्या फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर राज्याने विश्वास व्यक्त केला. ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांत भाजपच्या यशाच्या निमित्ताने त्याचा अनुभव आला. आगामी निवडणूक भाजप सर्वार्थाने त्यांच्या नेतृत्वात लढणार आहे. अशा वेळी पक्षाला पुन्हा सत्तेत आणत स्वत:चे नेतृत्वगुण सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

Web Title: Maharashtra is watching the past of those who pulled each other's feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.