महाराष्ट्राचे निर्णायकी वळण!
By admin | Published: December 31, 2014 02:15 AM2014-12-31T02:15:51+5:302014-12-31T02:15:51+5:30
महाराष्ट्राची जडणघडण ही सामाजिक न्याय, बेरजेचे राजकारण आणि आर्थिक स्थैर्य आदी पायांवर झाली आहे.
महाराष्ट्राची जडणघडण ही सामाजिक न्याय, बेरजेचे राजकारण आणि आर्थिक स्थैर्य आदी पायांवर झाली आहे. त्यावर आधारितच राजकीय वाटचाल झाल्याने सर्व समाज घटकांना सामावून घेणारा तसेच सर्वांना समान विकसित होण्याची संधी देणारा पक्ष म्हणून कॉँग्रेस पक्ष सत्तेवर राहिला होता. त्यात अनेक बदल झाले. त्यानुसार प्राधान्यक्रमाचे विषय घेऊन महाराष्ट्राची वाटचाल करण्यासाठी जे निर्णय घेणे आवश्यक होते, ते न केल्याने कॉँग्रेसकडून सत्ता सुटली.
हा बदल कोणता होता? वाढते नागरीकरण, शिक्षणाची गरज, रोजगाराची संधी आणि ग्रामीण विकासाची कुंठित अवस्था आदी कारणाने महाराष्ट्राचे राजकारण बदलले आहे. याचे आव्हान स्वीकारण्याचे धैर्य दाखविले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाने निर्णायकी वळण घेतले आहे. त्यामुळे बदललेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातून वेगळाच महाराष्ट्र उभा राहण्याची शक्यता आहे.
कृषी-औद्योगिक धोरणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने विकासाची वाढ रोखली गेली आहे. त्यातून असंतोष वाढत राहिला होता. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटले आहे. शिवाय गेल्या काही वर्षांतील आघाडी सरकारमधील पक्षांचा राजकीय संघर्षही कारणीभूत ठरला. सलग तीनवेळा आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यापैकी पहिल्या दोन कालखंडांत कॉँग्रेस-राष्ट्रवादीमधील समन्वय अधिक चांगला होता. स्पर्धा होती, पण मैत्रीवर परिणाम होऊ दिला जात नव्हता. त्यामुळे आघाडीचे सरकार टिकले होते. तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर मात्र या मैत्रीचे रूपांतर संघर्षात झाले. त्यातून जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार समाजातील प्रत्येक घटकातून होऊ लागली. त्यामुळे सत्तांतर झाले. एका बाजूला महाराष्ट्र बदलला असताना आपले राजकीय धोरण बदलण्याची गरज न ओळखल्याने भाजपा सत्तेवर आला. या परिस्थितीत महाराष्ट्राचे राजकारण कोणाच्या हाती द्यावे, याचा निर्णयही जनतेने अगतिकतेतून घेतला म्हणायला हवे. देशातील बदललेल्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम पूर्वी होत नव्हता. मात्र, २०१४ हे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एखाद्या यू टर्नसारखा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. विरोधी पक्षांना लोकसभेत अशा प्रकारे अभूतपूर्व विजय पहिल्यांदाच मिळाला. तसाच तो विधानसभा निवडणुकीतही मिळाला. या सर्व परिस्थितीचा लाभ भारतीय जनता पार्टीने योग्य पद्धतीने घेतला. एवढेच नव्हेतर शिवसेना या
२५ वर्षांच्या मित्रपक्षाशी असलेली युतीही तोडली. त्यांचा अंदाज बरोबर होता, पण यश थोडे कमी मिळाले, अन्यथा भाजपा स्वबळावर सत्तेवर आला असता. या सत्तांतरातून महाराष्ट्राची वाटचाल कशी होईल, यावर उलटसुलट चर्चा होऊ शकते, पण पारंपरिक पद्धतीनेच राज्यकारभार केला, तर २०१४चा निर्णय पुढे जाणारा नव्हता, हे सिद्ध होईल. पण हे राजकीय वळण अत्यंत निर्णायकी आहे. महाराष्ट्राची ही राजकीय धारणाच नव्हती. ती बदललेल्या महाराष्ट्रातून निर्माण झाली आहे, असे म्हणावे लागले. त्यादृष्टीने २०१४ हे वर्ष महाराष्ट्राच्या वाटचालीत नोंद घेतले जाणारे आहे.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे सर्वांत मोठे व वेगळे वळण म्हणून २०१४ या वर्षाची नोंद होईल. याचे कारण महाराष्ट्राचे सामाजिक अंग व राजकारण देशातील अनेक प्रांतांपेक्षा वेगळे आहे. शिवाय महाराष्ट्राची वाटचालही वेगळी आहे. त्यामुळे आजचे महाराष्ट्र राज्याचे राजकीय वास्तव हे काही प्रमाणात विसंगतही वाटते, पण त्याचे कारण मुख्यत: महाराष्ट्रच बदलला आहे. त्याचे भान सातत्याने सत्तेवर राहिलेल्या कॉँग्रेस पक्षाकडून सुटले
आणि महाराष्ट्रात भाजपासारख्या पक्षाची सत्ता कधी येईल, असे वाटत नव्हते. ते घडले आहे.
- वसंत भोसले