Maharashtra Day 2020: महाराष्ट्राची ६० वर्षांची गौरवशाली वाटचाल

By राजेंद्र दर्डा | Published: May 1, 2020 03:08 AM2020-05-01T03:08:01+5:302020-05-01T06:39:20+5:30

आताच्या कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसत असला, तरी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यातही महाराष्ट्रच आघाडीवर असेल, अशी खात्री हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देताना नक्कीच वाटते.

Maharashtra's glorious journey of 60 years | Maharashtra Day 2020: महाराष्ट्राची ६० वर्षांची गौरवशाली वाटचाल

Maharashtra Day 2020: महाराष्ट्राची ६० वर्षांची गौरवशाली वाटचाल

googlenewsNext

- राजेंद्र दर्डा

महाराष्ट्र स्थापनेला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या हीरक महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करताना ऊर अभिमानाने भरून येतो; पण राज्याच्या गौरवशाली वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा सध्याच्या कोरोना संकटामुळे समारंभपूर्वक साजरा करता येत नसल्याने मन काहीसे खट्टूही होते. तरीही महाराष्ट्राचा लढवय्या इतिहास पाहून या संकटावरही आपण नक्की यशस्वीपणे मात करू, असा विश्वास वाटतो. कधीही हार न मानणारा आपला हा महाराष्ट्र भीषण दुष्काळ, विनाशकारी भूकंप व प्रलयंकारी अतिवृष्टी आणि महापूर अशा कितीतरी आपत्तींना समर्थपणे तोंड देऊन पुन्हा नव्या दमाने उभा राहिला आहे. आताच्या कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसत असला, तरी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यातही महाराष्ट्रच आघाडीवर असेल, अशी खात्री हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देताना नक्कीच वाटते.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून आणल्यापासूनची महाराष्ट्राची सहा दशकांची वाटचाल पाहता आणि अनुभवता आली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आमचे परमपूज्य बाबूजी, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्यामुळे महाराष्ट्राचे राजकरण आणि समाजकारण आम्हा दोन्ही भावंडांना लहानपणापासूनच जवळून पाहता आले. एवढेच नव्हे तर देशातील एक आघाडीवरील, प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थित्यंतरेही जवळून अनुभवता आली. या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांना मिळाली. अनेक वर्षे ते राज्यात मंत्री होते. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचा संस्कार त्यांनी आमच्यावरही केला. यशवंतराव चव्हाण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व मुख्यमंत्र्यांना अगदी जवळून पाहता आले. त्याशिवाय पत्रकार म्हणून त्यांचे मूल्यमापनही मला करता आले. यापैकी स्व. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या चार मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला बलशाली करण्याचे आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम हिरीरिने केले. दीर्घकाळ महाराष्ट्राचे नेतृत्व केलेले वसंतराव नाईक यांच्याशी आमचे पारिवारिक संबंध होते. बॅरिस्टर अ. र. अंतुले यांनी तर १९८२ मध्ये औरंगाबादेत ‘लोकमत’चे प्रकाशन केले.


एक राज्य म्हणून ६० वर्षांचा काळ अल्प वाटत असला, तरी मानवी आयुष्याच्या दृष्टीने विचार केल्यास हा तीन पिढ्यांचा काळ होतो. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळची पिढी आणि आताची पिढी पाहिली की, राज्याने केलेल्या प्रगतीचा आलेख चटकन् डोळ््यांपुढे येतो. रयतेचा राजा कसा असावा, या आदर्शाची शिकवण राष्ट्राला देणारे छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीतले. स्वातंत्र्यचळवळीत काँग्रेसला लोकाभिमुख करणारे लोकमान्य टिळक याच भूमीत जन्मले व देशाला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांनी चले जाव चळवळीचा शंख याच महाराष्ट्रातील सेवाग्रामच्या कुटीतून पुकारला. देशात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले असोत की जातीच्या शृंखला तोडणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही महाराष्ट्राचेच! विविध विचारप्रवाह महाराष्ट्र भूमीत उमलले आणि भारतभर फुलले. आरएसएसची स्थापनाही इथलीच व डाव्या विचारसरणीच्या शाखाही इथेच विस्तारल्या. हे सर्वसमावेशीपण महाराष्ट्रीय माणसाने नेहमीच जपले. शाहू-फुले-आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, संगीत आदी विविध क्षेत्रांत अनेकानेक कर्मयोगी निर्माण झाले. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, डॉ. वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर अशी एकाहून एक रत्ने महाराष्ट्राच्या मातीने जगाला दिली आहेत. टाटा, बिर्ला, अंबानी, अझीम प्रेमजी, बजाज, किर्लोस्कर आदी अनेक प्रख्यात उद्योजकही आपल्याच महाराष्ट्रातले.
सुधारक आणि सुधारणांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राने वारकरी भक्तिसंप्रदाय देशभर नेला. ‘आनंदवन’, ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ अशा विविध सामाजिक चळवळींचा प्रवासही याच भूमीतला. समाजाला जाग आणणारे परिवर्तनवादी दलित साहित्यदेखील पहिल्यांदा महाराष्ट्रातच प्रवाही झाले. संगीत रंगभूमीचे शिल्पकार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी पारशी व मराठी नाट्यसंस्कृतीच्या एकत्रिकरणाची किमया १८व्या शतकात केली. कला, विज्ञान, अर्थकारण असो की राजकारण, महाराष्ट्राची कमान उत्तरोत्तर चढतीच राहिली आहे.

गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने अनेक बाबतीत देशालाही नवी दिशा दाखविली. ग्रामीण भागांचा कायापालट करणारे सहकार क्षेत्र ही महाराष्ट्रानेच देशाला दिलेली देण आहे. लोकशाही व्यवस्था तळागळापर्यंत रुजविणारी पंचायतराज्य व्यवस्था सर्वप्रथम महाराष्ट्राने साकार केली. आज देशभर राबविली जाणारी रोजगार हमी योजनाही सर्वप्रथम महाराष्ट्रानेच सुरू केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीचा अधिकार व महिलांना पंचायतींमध्ये राखीव जागा देण्याचे कायदे करूनही महाराष्ट्राने अग्रदूताची भूमिका बजावली. या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने सत्तेची धुरा ज्यांच्या ज्यांच्या हाती सोपविली, त्या सर्वांनीच व्यक्तिगत आवड-निवड बाजूला ठेवून राज्याचे हित हेच सर्वोपरी मानून राज्यव्यवहार केला. उद्योगक्षेत्रातही महाराष्ट्र देशात नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. पूर्वीप्रमाणे आजही देशातील अनेक राज्यांतील लोकांचे रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात येण्याचे आकर्षण कायम आहे.
अजूनही अनेक मोठी आव्हाने आहेत. शालेय आणि उच्चशिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण तर मिळत आहे; पण तेथून बाहेर पडल्यावर रोजगार मिळत नाही. शाळेत शिकल्यानंतर शेतात मेहनत घेणे, या मुलांना कमीपणाचे वाटते, त्यामुळेच तरुणांचे लोंढे
शहराकडे वाहत आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील निम्म्या जागांना विद्यार्थी मिळत नाहीत, अशी अवस्था आहे.
साखर कारखाने व त्यासाठी पिकविल्या जाणाऱ्या उसामुळे भूजल पातळी ४००-५०० फुटापर्यंत खाली गेली. धरणे आणि कालव्यांचे पाणीही बव्हंशी उसासाठी वळविले गेल्याने नदीखोऱ्यांतील खालच्या पट्ट्यांत पाण्याअभावी शेती ओसाड झाली व गाव-वस्त्यांना उन्हाळ््यात पिण्यासाठीही पाणी नाही, अशी स्थिती बघावयास मिळत आहे. अनेक गावांना उन्हाळ्यात टँकर हाच सहारा असतो. शेती आणि पाटबंधारे यासाठी अब्जावधी रुपये खर्च करूनही किफायतशीर शेतीचे गणित काही आपल्याला जमले नाही.
संकटसमयी महाराष्ट्र कधीही मागे हटला नाही. कोणत्याही राज्यावर संकट आले, तर महाराष्ट्र धावून गेला. कोरोनामुळे आता तर जगावरच संकट आले आहे. वर्तमान धूसर होताना भविष्याविषयी अनिश्चितता दिसतेय. हे अस्वस्थ वर्तमान बदलण्यासाठी केवळ संयम गरजेचा आहे. महाराष्ट्र तो दाखवतोय. आपण सारे मिळून कोरोनाला पराभूत करण्याचा दृढनिश्चय करू. लॉकडाऊन पाळू. सुरक्षित आणि निरामय राहू, हा आजच्या महाराष्ट्रदिनी संकल्प करुया !
गोविंदाग्रजांच्या महाराष्ट्र गीतातील या पंक्ती आळवू आणि उजळूया....
मंगल देशा, पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र देशा।।
(एडिटर-इन-चिफ, लोकमत वृत्तसमूह)

Web Title: Maharashtra's glorious journey of 60 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.