महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजाला चटके! -- जागर - रविवार विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:00 PM2018-03-10T23:00:47+5:302018-03-10T23:00:47+5:30
पतंगराव कदम, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख या चारही नेत्यांना निरोप देण्यासाठी लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटविणारे नेतृत्वाच्या फळीतील मोहरे अचानक निघून जाणे चटका लावणारे आहे.....
- वसंत भोसले-
पतंगराव कदम, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख या चारही नेत्यांना निरोप देण्यासाठी लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटविणारे नेतृत्वाच्या फळीतील मोहरे अचानक निघून जाणे चटका लावणारे आहे.....
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजाला आणखीन एक चटका बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचलेले आणि ज्यांना लोकांमध्ये राजकीय स्थान होते, असे चार नेते गेल्या सहा वर्षांत आकस्मिक निघून गेले आहेत. प्रचंड राजकीय घडामोडीमुळे खळबळ उडते, मात्र अशा राजकीय नेत्यांच्या निधनामुळे शोककळा पसरते. पतंगराव कदम यांच्या आधी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची अचानक झालेली एक्झिट हीच भावना निर्माण करून गेली. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, शोकसागरात बुडाला. या चारही नेत्यांची पार्श्वभूमी पाहिली की, सामान्य राजकीय कार्यकर्ता म्हणून वाटचाल सुरू करीत महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांनी गवसणी घातली होती. सर्वांची पार्श्वभूमी छोट्या गावांची होती. यापैकी दोघे मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेजारशेजारी होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील यांचा राजकीय उदय सांगली जिल्ह्यातील छोट्या गावातूनच झाला. हेदेखील चौघांच्या पार्श्वभूमीतील साधर्म्य असावे.
डॉ. पतंगराव कदम यांचे वादळी व्यक्तिमत्त्व गेल्या महिन्यापर्यंत महाराष्ट्रभर वावरत होते. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. त्यापूर्वीच्या नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी झाले होते.
आपला अमृतमहोत्सवी वर्षाच्या पदार्पणाचा वाढदिवस गेल्याच ८ जानेवारी रोजी साजरा केला होता. मात्र, त्यानिमित्त सांगली जिल्ह्यात किंवा मतदारसंघात आले नव्हते. तेव्हाच मनात पाल चुकचुकली होती. सतत लोकांमध्ये राहणारा आणि त्यांच्याविषयी लोकांमध्येही प्रचंड उत्साह असताना अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना ‘साहेब’ दूरदूर का राहिले, अशा लोकांच्या मनात भावना दाटून येत होत्या. अन्यथा, सांगलीतील निवासस्थानापासून प्रवासाला सकाळी सुरुवात करीत आपल्या मतदारसंघाचा दक्षिणोत्तर शंभर किलोमीटरचा प्रवास ते सहज करून येत असत. लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत असत. भिलवडी-वांगी नावाने तासगाव तसेच खानापूर या सांगली जिल्ह्यातील तालुक्यांचा दक्षिणोत्तर पश्चिमेकडील पट्टा म्हणजे त्यांचा मतदारसंघ. तासगावचा भाग कृष्णा नदीच्या काठावर वसलेला, तर खानापूरचा भाग हा उंच डोंगरावर चढून गेल्यावर पठारसारखा पसरलेला आहे. पावसाचे प्रमाण तेथे कमी असल्याने कोरडवाहू शेतीच होती. सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्याला समांतर असणाºया खानापूर तालुक्यातील सोनसळ या डोंगरावर वसलेल्या छोट्या गावचे ते सुपुत्र. त्या गावचं नाव आज सर्वदूर त्यांनी पोहोचविले. सोनसळ या छोट्या गावात शिक्षणाची सुरुवात करीत शैक्षणिक, सहकार आणि राजकारणात काम केले. सांगली जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची राजकीय राजधानीच होती.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी. डी. लाड, लोकनेते राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील, आदींनी राज्याचे नेतृत्व करून मोठी परंपरा निर्माण केली होती. त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अनेकांची भर पडत गेली. त्यांनीही तीच परंपरा निर्माण करीत राज्याचे नेतृत्व करण्यापर्यंत मजल मारली. त्यात सर्वांत आघाडीवरचे नाव डॉ. पतंगराव कदम यांचे घेता येईल. काही दिवसांपूर्वी उत्साहाने राजकारण करीत सार्वजनिक जीवनात वावरणारे डॉ. पतंगराव कदम यांचे अचानक निघून जाणे धक्कादायक आहे.
यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या उभारणीच्या काळात नेतृत्व केले. सार्वजनिक जीवनातील एक आदर्श घालून दिला. महाराष्ट्र हे विकसनशील तसेच पुरोगामी राज्य म्हणून नावारूपास आणणारी एक मोठी परंपरा त्यांनी निर्माण केली. त्याच वाटेवरचे वारकरी पतंगराव कदम होते. त्यांनी आपले सार्वजनिक जीवन शैक्षणिक कार्यापासून सुरू केले आणि राजकारण तसेच सहकारात यशस्वी करून दाखविले. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तसे घडले नाही. त्यांचे ते स्वप्न होते. मात्र, त्यासाठीची गटबाजी, कटकारस्थाने आणि तडजोड्या कधी केल्या नाहीत. कॉँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहात मिळेल ती संधी घ्यायची असते. असे ते मानत आले. त्यामुळे कदाचित संधी मिळणे दुरापास्त झाले असेल, पण कॉँग्रेसची निष्ठा ही तत्त्वप्रणाली अंगी बानवणे, त्यानुसार सार्वजनिक वर्तन करणे सोपे नाही. ते त्यांनी आयुष्यभर केले.
डॉ. पतंगराव कदम यांच्या आधी अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्याचेच सुपुत्र आर. आर. (ऊर्फ आबा) पाटील यांचेही असेच अचानक निघून जाणे झाले. १९९० पासून सलग सहावेळा विधानसभेच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या. सांगली जिल्ह्यातील तासगावच्या पूर्वेला बावीस किलोमीटरवरील डोंगराळ भागातील कोरडवाहू शेती करणाºया अंजनी गावातून त्यांनी विद्यार्थी असतानापासून सार्वजनिक कामाची सुरुवात केली. संस्थात्मक काम करणाºयांना पाठबळ देणार, पण स्वत: शक्यतो संस्था काढणे किंवा चालविण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यांचा प्राधान्यक्रमच वेगळा होता.
गावापासून सुरू केलेली राजकीय वाटचाल महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत जाण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यासाठी पतंगराव कदम यांच्याप्रमाणेच अहोरात्र राजकीय आघाडीवर चमकत राहणे त्यांनी पसंत केले. पहिल्यांदाच आमदार झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा एका वर्षात केला होता. प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली होती. आपण जरूर तासगावचे प्रतिनिधित्व करीत असू, पण महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रतिनिधी आहोत. त्यासाठी महाराष्ट्र समजणे आवश्यक आहे, असे ते मानायचे. तसेच राजकारण ते करीत राहिले. अत्यंत प्रभावशाली भाषाशैली आणि वक्तृत्व त्यांच्याकडे होते. अभ्यास करण्याची तसेच त्यासाठी कष्ट उपासण्याची तयारी होती. उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारल्यावर ‘आता एक पायरी राहिली’ असे ते खासगीत बोलून दाखवित असत. त्यांनाही कर्करोगाने गाठले, २०१४ च्या आॅक्टोबरमध्ये हिरिरीने निवडणुका लढविणारे आर. आर. पाटील १५ फेब्रुवारी २०१५ रोजी निघून गेले. त्या अचानक झालेल्या एक्झिटने महाराष्ट्र हळहळला होता.
भाजपचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन फारच धक्कादायकच होते. बीडसारख्या मराठवाड्यातील मागास जिल्ह्यातून नेतृत्व करीत विरोधी पक्षांचे राजकारण करणे महाराष्ट्रात सोपे नव्हते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कॉँग्रेसचा प्रचंड पगडा होता आणि त्यासाठी नेतृत्वाने कष्ट उपसले होते. त्यांच्या विरोधात भाजपसारख्या संघीय विचारसरणीच्या पक्षातून राजकारण करणे महाकठीण काम होते. पतंगराव कदम यांनी विधानसभेची पहिली निवडणूक १९८० मध्ये लढविली होती. ते अपक्ष होते. त्यात त्यांचा केवळ ८६ मतांनी पराभव झाला होता. त्याच निवडणुकीत भाजपतर्फे गोपीनाथ पांडुरंग मुंडे पाच हजार मताधिक्याने विजयी झाले होते. दोघांची राजकीय कारकीर्द एकाचवेळी सुरू झाली. डॉ. कदम यांना पाच वर्षे थांबावे लागले. १९८५ मध्ये त्यांनी तीस हजारांहून अधिक मताने सभागृहात प्रवेश मिळविला. गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण अतिशय संघर्षाचे होते. त्यांच्या पक्षाची ताकद राज्यात मर्यादित होती. सत्तेवर कधी तरी येऊ असेही वातावरण नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही. पक्षात आणि सत्तारूढ पक्षांविरुद्ध सत्ता संघर्ष केला. १९९५ मध्ये महाराष्ट्रात प्रथमच विरोधी पक्ष सत्तेवर आले. त्यावेळी संघर्षाच्या आघाडीवर असलेले गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. बीड जिल्ह्याच्या पूर्वेच्या टोकाला असलेल्या परळी वैजनाथच्या बाजूला नाथ्रा गावातून सुरुवात केली.
सलग निवडून येत त्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाला गवसणी घातली. विरोधी पक्षनेता म्हणूनही प्रभावी भूमिका बजावली. २००९ पासून संसदेत प्रतिनिधित्व केले, पण तेथेही विरोधी बाकावर बसावे लागले. २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपची केंद्रात सत्ता आली. गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिपदाऐवजी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. मात्र, त्यांनी आग्रहाने केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रिपद घेतले. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर पुढील निर्णय घेता येतील, अशीच त्यांची भूमिका होती. २६ मे २०१४ रोजी शपथविधी झाला आणि केवळ आठच दिवसांत ३ जूनच्या सकाळी दिल्लीतील निवासस्थानातून विमानतळाकडे जात असताना अपघाती निधन झाले. वय वर्षे पासष्ट होते. बीड जिल्ह्याच्या जनतेचा सत्कार स्वीकारण्यास मंत्री झाल्यावर प्रथमच ते येत होते. हा धक्का भयंकर होता.
२ जून २०१२ रोजी कोल्हापूरच्या दौºयावर आलेले विलासराव देशमुख आजारी असतील असे सूतराम वाटत नव्हते आणि केवळ अडीच महिन्यांत कर्करोगाशी झुंज देत १४ आॅगस्ट रोजी रोजी त्यांचे चेन्नईत निधन झाले. लातूर शहराच्या आग्नेय दिशेला केवळ दहा किलोमीटर असलेल्या बाभूळ गावचे सरपंच राहिलेले विलासराव देशमुख अत्यंत रूबाबदार व्यक्तिमत्त्व होते. उत्तम वक्तृत्वशैली, उच्चशिक्षण आणि देहबोलीत देशमुखी रंगेरंग भरलेली होती. असा फटकेबाज बोलका माणूस महाराष्ट्राने पाहिला नाही. महाराष्ट्राचे आठ वर्षे मुख्यमंत्री पद सांभाळले. त्यांचीही १९८० मध्येच विधानसभेची पहिली निवडणूक होती. त्यांचाही १९९५ मध्ये पतंगराव यांच्याप्रमाणे राजकीय बळी घेण्यात आला. त्याच डावपेचाने विलासराव देशमुख यांना धक्का बसला होता. पतंगराव पुन्हा पोटनिवडणूक हरले, तसे देशमुख विधानपरिषदेत जाण्याच्या प्रयत्नात हरले होते. १९९९ मध्ये तेही विजयी झाले. एक लाख मतांचे मताधिक्य मिळाले होते आणि आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीच झाले. त्यांचे जाणेही धक्कादायक होते.
या चारही नेत्यांना निरोप देण्यासाठी लाखोंची संख्या होती. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात त्यांची प्रतिमा उभी होती. विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारा कार्यकर्त्यांचा फलक आंबोलीत होता, गोपीनाथ मुंडे यांना गगनबावड्याच्या घाटातील करूळ गावच्या वेशीवर श्रद्धांजली वाहणारे ग्रामस्थांनी फलक लावले होते. आर. आर. आबा यांना पुण्याहून ताम्हिणी घाटाकडे जाणाºया रस्त्यावरील पिरंगूट गावात मोठे फलक लावून अभिवादन केलेले फलक मी पाहिले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात आपला ठसा उमटविणारे नेतृत्वाच्या फळीतील मोहरे अचानक निघून जाणे चटका लावणारे आहे.