गांधी आणि लुथर किंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 04:40 AM2019-12-14T04:40:23+5:302019-12-14T04:41:05+5:30
गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले.
- प्रा. बी. वाय. कुलकर्णी
महात्मा गांधी यांचा अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा मार्ग सत्याग्रह. हा वारसा अत्यंत निष्ठापूर्वक स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग (ज्युनिअर). या दोघांच्या कामात विलक्षण साम्य आहे. अमेरिकेतील बोस्टन येथील सामाजिक जबाबदारी संस्थेच्या संचालकांचे महात्मा गांधींवर ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी गांधी आणि किंगबाबत लिहिले आहे की, गांधी यांच्या विचारांचा व अन्यायाला विरोध करण्याच्या मार्गाचा वारसा चालवला तो मार्टिन लुथरने. दोघेही उच्चशिक्षित होते. दोघांनीही सत्याग्रहाच्या मार्गाने राजकीय चळवळीस नेतृत्व दिले. औपचारिक स्वरूपात दोघांकडे राजकीय पद नव्हते; पण दोघांकडे निर्वाचित व्यक्तीपेक्षा जास्त राजकीय सत्ता नियंत्रण होते. अहिंसा दोघांचा मार्ग होता आणि विसंगती पाहा, दोघांचाही अंत गोळीने झाला.
गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले. त्या विचाराने ते इतके प्रभावित झाले की, त्याबद्दल मार्टिन लिहितात की, मी गांधींच्या विचारावर व कामावर असणारी जवळपास अर्धा डझन पुस्तके विकत घेतली. ही पुस्तके वाचल्यानंतर ते लिहितात की, त्यांची सत्ताप्राप्तीची ओढ क्रमाने कमी झाली. अहिंसेच्या मार्गावरचा विश्वास वाढला. सामाजिक सुधारणा शाश्वत पद्धतीने करण्याचा हा एकच मार्ग आहे, याच मार्गात ती क्षमता आहे, असे मार्टिनचे मत झाले.
सामान्य माणसाची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता हाच मार्ग लोकसहभाग मिळवून देऊ शकतो, अशी त्यांची खात्री झाली. केवळ बौद्धिक, वैचारिक कसरतीतून ग्रंथनिर्मिती होईल; पण व्यावहारिक पातळीवर सामाजिक सुधारणा होणार नाहीत. त्यासाठी गांधीमार्गच योग्य आहे, असे त्यांचे मत झाले. मार्टिनच्या मते, त्यांना येशू ख्रिस्तामध्ये प्रेरणा दिसली तर गांधींमध्ये मार्ग दिसला. एका निग्रोंच्या सभेत ते म्हणाले की, आपणास जेल भरावे लागतील, तरच समान हक्क मिळतील. गांधींचे शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते. महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८), तेव्हा त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. मार्टिनची हत्या (१९६८) झाली तेव्हा निग्रोमुक्तीचा लढा अर्ध्यावरच होता. गांधींच्या हत्येनंतर जगभरातून तीन हजार संदेश आले होते. ज्ञात इतिहासातील नोंदीनुसार इतक्या मोठ्या संख्येने शोकसंदेश कुणाच्याच मृत्यूनंतर आले नाहीत. दोघेही अहिंसेचे पुजारी. मात्र दोघांच्याही मृत्यूनंतर प्रचंड दंगली उसळल्या.