महात्मा गांधींनी अहिंसेलाच शस्त्र केले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:43 AM2019-10-02T05:43:24+5:302019-10-02T05:43:37+5:30
खरे तर गांधींच्या या १५० व्या जन्मशताब्दी निमित्ताने आजच्या परिस्थितीत गांधी आणि गांधी विचार आपल्या आयुष्याशी निगडित आहेत का? त्यांची खरी गरज किती आणि कशी आहे हा मूळ प्रश्न आहे.
- डॉ. राजन वेळूकर
(माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ गांधी विचारांचे अभ्यासक)
खरे तर गांधींच्या या १५० व्या जन्मशताब्दी निमित्ताने आजच्या परिस्थितीत गांधी आणि गांधी विचार आपल्या आयुष्याशी निगडित आहेत का? त्यांची खरी गरज किती आणि कशी आहे हा मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गांधींच्या चळवळी, त्यांची तत्त्वे, त्यांनी सांगितलेल्या अहिंसावादाचे महत्त्व, सत्याची कास या साऱ्याचा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे.
असत्य, धाकशाही, हिंसेच्या आधारावरच वर्तमान परिस्थितीत जगाचा कारभार चालू आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी गांधीजींच्या सत्य, अहिंसेचा विचार लोकमनामध्ये जागृत करणे गरजेचे आहे. देशावर येणाºया प्रत्येक समस्येला गांधी प्रयोगाने सोडविता येते़ आज जगासमोर, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरणीय समस्या अशा समस्या ठाण मांडून उभ्या आहेत. असे असताना केवळ हिंसा रोखण्यासाठी शासनाचा एवढा पैसा खर्च होत असेल तर आपल्याला ही हिंसा रोखण्यासाठी पर्यायाची आवश्यकता आहे. हा पर्याय शोधताना आपण आपल्याच इतिहासावर एक नजर टाकली असता आपल्या देशामध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसानेच अहिंसेलाच शस्त्र बनविल्याचे लक्षात येईल आणि या शस्त्राच्या साहाय्यानेच त्यांनी समाजबांधणी व समाजपरिवर्तन घडवून आणले.
आज आर्टिफिशिअल इंटेलिजिन्सवर संपूर्ण जग अभ्यास करत आहे. मात्र या क्षेत्रात काम करणारे नावाजलेले तंत्रज्ञ आज करुणा आणि प्रेम यांचा ताळमेळ यामध्ये कसा घालत येईल याचा अभ्यास करत आहेत. आज अमेरिकेत शालेय शिक्षण हे करुणा आणि प्रेम यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याचा विचार केला जात आहे़ याचाच अर्थ गौतम बुद्ध, महावीर, गांधी यांनी अहिंसारुपी जी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्याचाच हा भाग आहे.
आज लोकांना या गोष्टींची गरज लागते याचाच अर्थ गांधी आज किती संबंधित आणि महत्त्वपूर्ण आहे हे यातून सिद्ध होते. हाँगकाँगमधील आंदोलन हे कशाप्रकारे शांततेत पार पडले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. गांधीजींनी इंग्रजी शिक्षणाला, पुरुषप्रधानतेला, हिंसेला आव्हान दिले होते. त्यांनी आधुनिकतावाद्यांना विरोध केला. त्यातून गांधींना परंपरावाद्यांच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्नही झाला. त्यांनी तंत्रज्ञानाला विरोध केला असे भासविण्याचा प्रयत्नही केला मात्र, गांधींनी परंपरा कोणत्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तंत्रज्ञानाला विरोध नाही तर सर्वसामान्यांच्या रोजगाराला ज्यामुळे धक्का लागणार नाही, अशा तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळातील सरकारला जनतेमध्ये पोहोचण्याची आवश्यकता आहे. खरे तर प्रत्येक सरकारची गरज ती गरज असते मात्र खरे नेतृत्व गांधीजींच्या चळवळींतून समोर येते. त्यांनी देशभरातल्या तमाम जनसामान्यांना, त्यांची भाषा येत नसतानाही किंवा कोणतीही भाषणे न करता स्वातंत्र्यलढ्यात सामावून घेतले
होते.
गांधी हे घटना घडल्यानंतर काही करणाऱ्यांपैकी नव्हते, तर ते घटना घडूच नये म्हणून काळजी घेणाºयांपैकी होते. त्यांची अहिंसा हे काही तत्कालीन औषध नाही. ते चिरकालीन मूल्य आहे. ते आज असते, तर आजही ते सामाजिक ऐक्याचं बीजारोपण करत राहिले असते. या सगळ्यातून एकाच गोष्ट लक्षात येते की गांधी आजच्या काळाशी सुसंगत आहेत. त्यांचे विचार, आचार, तत्त्वे आजच्या परिस्थिती खºया अर्थाने आजच्या काळाची गरज आहेत.