महात्मा गांधी : जगाचा माणूस
By राजेंद्र दर्डा | Published: October 2, 2019 06:05 AM2019-10-02T06:05:33+5:302019-10-02T06:06:23+5:30
आज गांधीजींची १५० वी जयंती. मात्र, आजही संपूर्ण जग हे महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावीत आहे, हे निश्चित.
- राजेंद्र दर्डा
(एडिटर इन चीफ, लोकमत समूह)
हो-चि-मिन्ह हे व्हिएतनाम देशातील सर्वांत मोठे शहर. लुनार नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठे पुष्पप्रदर्शन भरले होते. त्यातच होता पुस्तकांचा मेळा. प्रदर्शनात फिरत असताना अचानक महात्मा गांधीजींच्या पुस्तकावर माझी नजर गेली. त्यांच्या भाषेत या पुस्तकाचे नाव होते- ‘जगाला एकच आशा - महात्मा गांधी’. आज गांधीजींची १५० वी जयंती. मात्र, आजही संपूर्ण जग हे महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावीत आहे, हे निश्चित.
युनायटेड स्टेटस एक्स्प्रेस या नियतकालिकाने सन २००० मध्ये जगातील दहा हजार विचारवंतांना, नेत्यांना, वैज्ञानिकांना, नोबेल विजेत्यांना आणि कुलगुरूंना एक प्रश्न विचारला. ‘गेल्या १ हजार वर्षांत जगात झालेला सर्वात मोठा माणूस कोणता?’ त्यातल्या ८८८६ लोकांचे एकमुखी उत्तर, ‘महात्मा गांधी’ हे होते.
आइन्स्टाईन म्हणाला, ‘विसाव्या शतकाने जगाला दोन शक्ती दिल्या. एक, अणुबॉम्ब आणि दुसरी महात्मा गांधी.’ विन्स्टन चर्चिल हे दक्षिण आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल स्मटस यांना म्हणाले, ‘तुझ्या तुरुंगात असताना तू गांधीला मारले असते, तर आपले साम्राज्य जगावर आणखी काही शतके राहिले असते.’ गांधी या नि:शस्त्र माणसाने हे सामर्थ्य कुठून आणले? भारतीय माणूस शस्त्र घेऊन साम्राज्याशी लढू शकत नाही हे ओळखणाऱ्या त्या महात्म्याने भारतीयांची सहनशक्ती हेच त्यांचे सामर्थ्य आहे हे ओळखले व ही सहनशक्ती संघटित करून तिच्या हाती अहिंसा व सत्याग्रह ही परिणामकारक मानवी हत्यारे दिली. त्यांच्या नेतृत्वात संघटित झालेला भारत मग एकटाच स्वतंत्र झाला नाही, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन निम्मे जगच स्वतंत्र झाले. ‘तुमच्या देशात गांधी जन्माला आले नसते तर मी अमेरिकेचा अध्यक्ष कधीच झालो नसतो’ असे बराक ओबामा त्याचमुळे म्हणाले.
महात्मा गांधीजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेसाठी १९३० मध्ये बाहेर पडले. संपूर्ण स्वराज्य प्राप्त केल्याशिवाय साबरमती आश्रमात परतणार नाही, असा दृढनिश्चय त्यांनी केला. त्यानंतर १९३६ मध्ये गांधीजी वास्तव्यासाठी आले ते विदर्भातील सेवाग्राम या लहानशा खेड्यात. सेवाग्रामातील बापू कुटी हे स्वातंत्र्य आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले होते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा शंख याच सेवाग्राममधून फुंकला गेला. सेवाग्राम हा आश्रम नव्हता, तर गांधीजींच्या विधायक कार्यक्रमाची कर्मभूमी होती. गांधीजींच्या आश्रमात चरखा, झाडू आणि सामुदायिक प्रार्थना यांना मानाचे स्थान होते.
स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वत:ला झोकून द्यावे, ही त्या काळातील तरुणांची उत्स्फूर्त भावना होती. सत्याग्रहीचे वय किमान २० वर्षे असावे, अशी अट गांधीजींनी घातली होती. त्या वेळेस आमचे वडील बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांचे वय १९ वर्षे होते. वैयक्तिक सत्याग्रहाच्या परवानगीसाठी त्यांनी थेट सेवाग्राम गाठले. गांधीजींकडून सत्याग्रहाची परवानगी मिळविली. बाबूजी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध सक्रिय झाले, अटक झाली आणि पावणेदोन वर्षाची शिक्षा झाली. स्वातंत्र्यानंतरही गांधीजींच्या विचारांचा घरात इतका प्रभाव होता की, लहानपणी विजयभय्या आणि मी दोघांना दर रविवारी एकदा चरख्यावर सूतकताई अनिवार्य होते. आमचे वडील नेहमीच सांगायचे, ‘बापूंना भेटलो, तो आयुष्यातला सर्वांत रोमांचक क्षण होता’.
आज जगभर गांधी विचार हा युद्धाचा पर्याय म्हणून सांगितला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने गांधीजींचा जन्मदिन हा जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे. भगवान महावीर, बुद्ध, ख्रिस्त, कबीर आणि संत परंपरा यांनी जगाला दिलेला माणुसकीचा व मनुष्यधर्माचा संदेशच गांधींनी आयुष्यभर वाहून नेला.
गांधींसारखी माणसे देहाने जातात. मात्र, त्यांचे विचार अजरामर राहतात. जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे, त्यातली माणुसकी जिवंत आहे आणि त्यातल्या मानवी सद्भावना सक्रिय आहेत तोपर्यंत हे जग गांधींना पाहू शकणार आहे.
लंडनमध्ये शिकत असताना फिट्झरॉय स्क्वेअरवरील वायएमसीए हॉस्टेलमध्ये माझे वास्तव्य होते. तेथे तळमजल्यावरील सभागृहाचे नावच महात्मा गांधी सभागृह होते. ते लंडनमधील भारतीयांचे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र बनले होते.
भारतीय समुद्रकिनाºयापासून १४ हजार किमी दूर असलेल्या कॅरेबियन बेटावरील पोर्ट आॅफ स्पेन येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत प्रवास करण्याचा योग आला. १९९९ साली वाजपेयीजींनी तेथील ५ एकरातील महात्मा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन केले होते. हे केंद्र आज भारतीय संस्कृती वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे.
गांधींनी आपला विचार ग्रंथबद्ध केला नाही. ‘तो अजूनही प्रयोगावस्थेत आहे’, असे ते म्हणत राहिले. अनुयायांनी फारच आग्रह धरला तेव्हा ते म्हणाले, ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे.’
गांधी हे कोणा एका धर्माचे, देशाचे, वर्गाचे वा पंथाचे नव्हे, तर ते साऱ्यांचे होते. असा महात्मा आपल्या भूमीत जन्माला आला आणि या भूमीचे व भूमिपुत्रांचे त्याने वयाच्या ७९ वर्षांपर्यंत नेतृत्व केले हे या देशाचे व आपल्या साºयांचे सौभाग्य आहे. गांधीजींच्या स्मृतींना आमचे लक्षावधी प्रणाम.