महात्मा गांधी कधीही संपणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:46 AM2019-10-02T05:46:14+5:302019-10-02T05:46:40+5:30

महात्मा गांधींच्या आचार-विचार कृतिशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता हा होता. आपली मानवतावादी तत्त्वे समाजाच्या प्रत्येक अंगात लागू करण्यासाठी म्हणूनच त्यांनी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेतले.

 Mahatma Gandhi will never end | महात्मा गांधी कधीही संपणार नाहीत

महात्मा गांधी कधीही संपणार नाहीत

Next

- बी.व्ही. जोंधळे
आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक

महात्मा गांधींच्या आचार-विचार कृतिशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता हा होता. आपली मानवतावादी तत्त्वे समाजाच्या प्रत्येक अंगात लागू करण्यासाठी म्हणूनच त्यांनी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेतले. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात फक्त स्वातंत्र्य चळवळच करून चालणार नाही, तर स्वातंत्र्य चळवळीला अन्य परिवर्तनवादी चळवळींचीही जोड दिली पाहिजे, तरच भारतीय समाजात मूलभूत परिवर्तन येऊ शकते, अशी गांधीजींची धारणा होती. सत्य, अहिंसा, प्रेम ही गांधीजींची जीवननिष्ठा होती. त्यांच्या जीवनशैलीत द्वेषाला, हिंसेला, शस्त्राचाराला मुळीच स्थान नव्हते. समाजात सद्भाव, सहिष्णुता, प्रेम निर्माण करण्याचे उच्चतम ध्येय त्यांनी उराशी कवटाळले होते व या मूल्याधिष्ठित ध्येयासाठीच त्यांनी बलिदानही दिले.
देशाला सशस्त्र लढ्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, ही भूमिका गांधींना मान्य नव्हती. आपले मित्र हर्मन कालेनबाख यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, ‘हिंसाचाराला भिऊन उद्या इंग्रजांनी हा देश सोडला, तर त्यावर राज्य कोण करेल? पिस्तूलधारी खुनी की रक्ताची चटक लागलेले लोक? खुनी माणसे भारताला काहीही देऊ शकणार नाहीत. मग ते खुनी काळे असोत की गोरे असोत.’
म. गांधींचा सर्वसामान्य माणसांच्या शक्तीवर अपार विश्वास होता. म्हणूनच त्यांनी हिंदू-मुसलमान, सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, शहरी-ग्रामीण या सर्व समाजघटकांतील दुरावा नाहीसा करून सर्वांचा स्वातंत्र्य चळवळीत समावेश केला. गांधींच्या उदयापूर्वी राष्ट्रभक्ती ही मूठभर उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. मात्र, गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनात या देशातील फाटक्या माणसांचा व स्त्रियांचा समावेश करून स्वातंत्र्यलढ्याला व्यापक स्वरूप दिले. म. गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य माणसांचा समावेश केल्यामुळे येणारे स्वातंत्र्य हे कष्टकरी बहुजनांचे असेल व हे स्वातंत्र्य आपल्या परंपरागत वर्चस्ववादी उच्च जातव्यवस्थेच्या हितसंबंधास मारक ठरणारे असेल, हे ओळखणाऱ्या मनुवादी वर्णव्यवस्थेच्या ठेकेदारांनी म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, हे विशेष!
म. गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवीत होते; पण त्यांचे हिंदू असणे इतर धर्माचा द्वेष करीत नव्हते. माझे हिंदुत्व हे मला माझ्या धर्मातील दोष काढून टाकण्याची शिकवण देते, अशी त्यांची धारणा होती. गांधीजींची सामूहिक प्रार्थना म्हणजे कर्मकांडी पूजा-अर्चा नव्हती, तर परस्पर सद्भावाचे ती प्रतीक होती. सत्य, अहिंसा, प्रेमाचा स्वीकार करतानाच ती द्वेष मत्सर, हिंसा, भेदभाव, उच्चनीचतेला नकार देणारी होती. गांधीजी ‘रघुपती राघव राजाराम’ म्हणतानाच ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ ही प्रार्थनाही म्हणायचे. बौद्ध, जैन, शीख धर्मांतील प्रार्थनाही त्यांच्या श्रद्धेचा भाग होता. गांधीजी गीतेला प्राणग्रंथ मानत आणि त्याच वेळेस कुराणातील वचनेही देत. येशू ख्रिस्ताची प्रवचने ते नित्यनेमाने वाचीत असत. बुद्धाची अहिंसाही त्यांनी शिरोधार्य मानली होती. गांधी एकाचवेळी हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन-बौद्ध नि जैन होते. गांधीजींनी सर्वच धर्मांतील मानवी मूल्यांचा अंगीकार करतानाच सर्वच धर्मांतील अन्याय प्रथा-परंपरा नाकारल्या. सर्वच धर्मांतील सुंदरतेची बेरीज आणि कुरूपतेची वजाबाकी करणारा त्यांचा मानवतावादी मनुष्यधर्म होता. म. गांधींनी रामराज्याचाही उल्लेख केला; पण त्यांचा राम धर्माचे राजकारण करणारा नव्हता, तर तो प्रजेची काळजी वाहणारा प्रजाहितदक्ष राम होता. रामाच्या लढाया, त्याचे धनुष्यबाण, ‘मंदिर वही बनाएंगे’ वाला राम त्यांना नको होता.
गांधीजींना प्रारंभी वर्णव्यवस्था ही श्रमविभाजनावर आधारित आहे, असे वाटत असल्यामुळे त्यांनी वर्णव्यवस्थेचेही समर्थन केले. जातीव्यवस्थेसही सुरुवातीस त्यांचा फारसा विरोध नव्हता; पण नंतर त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणे जसे बंद केले, तसेच अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग असेल, तर असा हिंदू धर्म आपणाला मान्य नाही, असेही निक्षून सांगितले. विजातीय विवाहांचा पुरस्कार करतानाच त्यांनी त्यांच्या आश्रमात अस्पृश्यांना जसा प्रवेश दिला, तसेच अस्पृश्यता पाळणाऱ्यांना त्यांच्या आश्रमात प्रवेशही नाकारला. तात्पर्य, समता हे मानवी मूल्य गांधीजींच्या समग्र चळवळीचे मूलाधार होते.
म. गांधींचा झाडू हा वरवरच्या स्वच्छता अभियानापुरतासीमित नव्हता, तर तो अंत:करण शुद्धीतून उच्च-नीचता नष्ट करण्याचा प्रतीक होता. आपल्या समाजात घाण करणाºयांना प्रतिष्ठा मिळते. मात्र, घाण साफ करणाºयांना तुच्छतेची हीन वागणूक मिळते. ही बाब गांधींना मान्य नव्हती. त्यांनी म्हणूनच विषमता नाहीशी करण्यासाठी, भंगीकाम करण्यासाठी हाती झाडू घेतला.
म. गांधींनी स्त्री स्वातंत्र्याचाही आवर्जून पुरस्कार केला. स्त्री आणि पुरुष समान आहेत. स्त्रियांना पुरुषांएवढीच मानसिक शक्ती निसर्गाकडून मिळाली आहे. स्त्री ही अहिंसक लढा देण्यासाठी अधिक सक्षम आहे, अशी त्यांची धारणा होती. हिंदू धर्मात देवींच्या मंदिरांची संख्या खूप आहे; पण महिलांवर अत्याचार करण्यात तुलनेने हिंदू धर्मीय पुरुषच आघाडीवर आहेत, ही बाब मान्य नसणाºया गांधीजींनी म्हणूनच स्त्रियांना निर्भय करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीच त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत समावेश केला.
गांधींमुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सरोजनी नायडू, अरुणा असफअली, श्रीमती विजया लक्ष्मी पंडित, कस्तूरबा गांधी, कमला नेहरू यांच्यासह हजारो महिला सहभागी झाल्या. विदेशी कपड्यांची होळी करण्यात महिलाच आघाडीवर होत्या. यासंदर्भात एक उदाहरण लक्षणीय ठरावे. मुंबईत विदेशी कपड्यांची होळी करताना एक महिला पकडली गेली. तेव्हा तिने तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका माणसाकडे आपल्या अंगावरील दागिने काढून दिले व म्हणाली, हे दागिने माझ्या घरी नेऊन द्या. तो माणूस म्हणाला तुम्ही मला ओळखत नाही. मग हे दागिने तुम्ही माझ्या जवळ कसे काय देता? त्यावर ती महिला म्हणाली, तुमच्या अंगावर खादी आहे, डोक्यावर गांधी टोपी आहे. मग तुम्ही बेइमान कसे असाल? हा होता ‘गांधींच्या सच्चाईचा खरा करिश्मा! पण गांधींच्या मानवतावादी विचारांचा आज आम्हास विसर पडला आहे. परिणामी, देशात आज धर्मांध वातावरण निर्माण झाले आहे. विचार कधीही संपत नसतो. म. गांधींचे कृतिशील विचार जिवंतच आहेत. धर्मांधाचा उन्माद फार काळ टिकणारा नाही. म. गांधींच्या विचारात ती ताकद आहे. गांधींच्या स्मृतीस प्रणाम.

Web Title:  Mahatma Gandhi will never end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.