राष्ट्रपिता महात्मा गांधींचे कानात शिसे ओतणारे भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 05:25 AM2020-03-07T05:25:50+5:302020-03-07T05:25:57+5:30
गांधींचे हे भाषण इंग्रजीत झाले. त्यावेळी त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. त्याबद्दल त्यांनी प्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य याबद्दल आपली मते ठासून मांडणी केली.
- जयंत दिवाण
पंडित मदनमोहन मालवीय यांनी बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. या यूनिव्हर्सिटीच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात त्यावेळी गांधींचे भाषणही झाले होते. हे भाषण म्हणजे भारतीय राजकारणातील त्यांचे ‘पहिले पाऊल’ म्हणविले जाते. या यूनिव्हर्सिटीच्या शिलान्यासासाठी स्वत: व्हाईसरॉय उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रांताचे गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नरही त्यावेळी उपस्थित होते. संस्थानांचे राजे, रजवाडे रंगबिरंगी पोशाख व दागदागिने घालून या कार्यक्रमासाठी आले होते. भारतातील प्रसिध्द नेतेही उपस्थित होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असा भव्य मंडप या कार्यक्रमासाठी घालण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमाला जणू दरबाराचे स्वरुप आले होते.
गांधींचे हे भाषण इंग्रजीत झाले. त्यावेळी त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. त्याबद्दल त्यांनी प्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य याबद्दल आपली मते ठासून मांडणी केली. स्वराज्याला त्यांनी मातृभाषेशी जोडले. गेली ५० वर्षे जर देशी भाषेतून शिक्षण झाले असते, तर गरीबातील गरीब माणूस स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडला जाऊन भारत कधीच स्वतंत्र झाला असता, असे मत त्यांनी यावेळी मांडले. केवळ ठराव करुन किंवा भाषण करुन स्वराज्य मिळणार नाही, असे सांगताना त्यांनी बनारसमधील मंदीरांच्या परिसरातील गलिच्छपणाचा उल्लेख केला. जेथे आपली मंदिरे गलिच्छ असतील
तेथे आपले स्वराज्य कसे असेल याकडे त्यांनी उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधले. गांधींनी आपल्या भाषणात राजे रजवाड्यांची चांगलीच कान उघाडणी केली. लोक कंगाल असताना जवाहिरांचे प्रदर्शन शोभेसाठी करु नका, असे ते म्हणाले. त्यांनी ठासून सांगितले की, स्वातंत्र्य शेतकऱ्यांमार्फतच येईल. त्यांचे भाषण जसजसे रंगू लागले, तस तसे मंचावरील अॅनी बेझंट वगैरे मंडळी धुसफूसू लागली. कडेलोट झाला तेव्हा गांधी म्हणाले, ‘मला जर असे आढळून आले की भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांनी येथून निघून गेले पाहिजे, तर त्यांना चलेजाव म्हणण्यास मी कचरणार नाही.’ सभास्थानी बसलेल्यांची सहनशीलता संपली. बेझंट बाई उठून गेल्या, राजे रजवाडे निघून गेले. त्यांना असे वाटले की, या माणसामुळे आपल्यावर राजद्रोहाचा गुन्हा तर लागणार नाही ना! मंचावर कोणीच उरले नसल्याने सभा आपोआपच विसर्जित झाली.
या भाषणामुळे वर्तमानपत्रांमध्ये जो वाद-विवाद सुरु झाला, त्यामुळे वाचकांचे लक्ष गांधींकडे वेधले. बेझंट बाईंनी जाहिर केले की, गांधी संतदृष्टीने कितीही मोठे असले तरी राजकारणाच्या दृष्टीने अर्भकच आहेत. परंतु गांधींच्या रुपाने काही तरी एक नवीन तत्वज्ञान हिंदुस्थानात येत आहे, अशी चर्चा सामान्य सुशिक्षित लोकांमध्ये या निमित्ताने सुरु झाली. गांधी चर्चेचा विषय ठरले.
(लेखक गांधीवादी, सर्वाेदयी कार्यकर्ते आहेत.)