हिवाळी अधिवेशन मुंबईत! महाविकास आघाडी सरकारला विदर्भाची ॲलर्जी तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:19 AM2021-12-03T06:19:00+5:302021-12-03T06:21:49+5:30
Maharashtra Politics News: राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष, शिवसेनेला विदर्भाबद्दल प्रेम नाही, काँग्रेसला सरकारात किंमत नाही, आता तर अधिवेशनही नागपुरात नाही!
- यदु जोशी
(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदाही नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीच्या मर्यादांमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. दोन्ही गोष्टी समजण्यासारख्या असल्या, तरी महाविकास आघाडी सरकारला विदर्भाची काही ॲलर्जी तर, नाही ना अशी शंकादेखील येते आहे. विदर्भानं मोठ्या मनानं महाराष्ट्रासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा झालेल्या नागपूर करारात वर्षातून एक विधिमंडळ अधिवेशन नागपुरात होईल असं नमूद आहे. आगामी अधिवेशन नागपुरातच होत असल्याचं समजून आम्ही विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ असं संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले असते तर, सरकारचं विदर्भाबद्दलचं प्रेम दिसलं तरी असतं. डिसेंबरचं अधिवेशन नाही झालं शक्य, पण, मार्चचं अधिवेशन नागपुरात नक्की घेऊ असं सांगूनही दिलासा देता आला असता.
नागपुरात अधिवेशनाची सांगता होता होता मुख्यमंत्री विदर्भाच्या विकासाचं पॅकेज जाहीर करतात. यावेळी जागा बदलली असली तरी तसं पॅकेज मुंबईतही जाहीर करता येऊ शकेल. ‘राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष आहे, शिवसेनेला विदर्भाबद्दल प्रेम नाही अन् काँग्रेसला सरकारमध्ये फारशी किंमत नाही, त्यामुळे या सरकारमध्ये विदर्भावर अन्याय होतो’ असं विदर्भात बोललं जातं. गेले कित्येक महिने विकास मंडळांची मुदत संपली पण, त्यांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज राज्य सरकारला वाटत नाही, याबद्दलही नाराजी आहे. नागपूर अधिवेशनात जिल्हानिहाय आढावा बैठकी मुख्यमंत्री घेतात; ते मुंबईत होणार आहे का?, मंत्री अधिवेशनासाठी नागपुरात आले की, शनिवार, रविवारी आमगावपासून खामगावपर्यंत जातात, ते तर होणारच नाही. अधिवेशनाच्या पूर्वी नागपुरात विदर्भाच्या प्रश्नांवर आढावा बैठक घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तिथे हजर राहावं अन् मुख्यमंत्री ऑनलाइन उपस्थित राहतील, असं करता येणं सहज शक्य आहे, प्रश्न मानसिकतेचा आहे. विदर्भाला गृहित धरलं जात असल्याची भावना बळावत आहे. त्याला छेद देण्याची संधी म्हणून आगामी अधिवेशनाकडे सरकारला बघता येईल. काळजीवाहू मुख्यमंत्री नका देऊ पण, मागासलेल्या भागाची काळजी करणारे मुख्यमंत्री तरी दिसलेच पाहिजेत ना?
स्वतंत्र विदर्भाचं दार केंद्र सरकारने परवाच बंद केलं. सध्या विदर्भ राज्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं लोकसभेत सांगितलं गेलं. केंद्रात पूर्ण बहुमतात येऊ, तेव्हा नक्कीच विदर्भ राज्य देऊ, असं एकेकाळी भाजप नेते सांगायचे. त्याची उगाच आठवण झाली. विदर्भ राज्याच्या मुद्यावर वाद-प्रवाद होऊ शकतात. पण, विदर्भाच्या विकासाबाबत केंद्र-राज्य सरकारनं आपपरभाव ठेवू नये. विशिष्ट परिस्थितीमुळे नागपुरात दोन वर्षे अधिवेशन होऊ शकलं नाही, हे एकपरी समजता येऊ शकतं. पण, विदर्भाकडे दुर्लक्ष होत असेल तर, ते कसं समजून घेणार?
विधान परिषदेचं काय होणार?
नागपूर अन् अकोल्याच्या विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता आहे. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात भाजपमधून आणलेल्या छोटू भोयर यांच्या पाठीशी काँग्रेसचे नेते किती ताकदीनं उभे राहतात यावर सगळा खेळ आहे. नागपुरात काँग्रेसची अंतर्गत दगाबाजीची जुनी परंपरा आहे. त्यातून पक्षाचं नुकसानच झालं. भोयर भिडले आहेत पण, समोर गडकरी-फडणवीस हे दोन पहेलवान आहेत. दिवसा पक्षासाठी लढणारे काँग्रेसचे नेते रात्री वाड्यावर जमा होतात, हा गेल्या काही वर्षांत काही नेत्यांबाबतचा अनुभव आहे. बावनकुळेंची पक्षीय भेदांपलीकडे जावून असलेली मैत्री त्यांच्या कामाला येऊ शकते. भाजप अन् काही आपल्यांच्या चक्रव्यूहात छोटू भोयरांचा अभिमन्यू तर, नाही होणार?
अकोल्यात चौथ्यांदा आमदारकीच्या तयारीत असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल असा सामना आहे. स्वबळावर निवडून येण्याइतकं बळ दोन्ही पक्षांकडे नाही. बाजोरिया महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे उमेदवार आहेत. तिघांचीही पूर्ण मतं त्यांना पडली तर, जमेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं गणित अचूक समजलेला माणूस अशी त्यांची ख्याती आहे पण, दीर्घ राजकीय प्रवासात तुमचे मित्र वाढतात तसे शत्रूही वाढत असतात. दरवेळचा सोबती भाजप यावेळी विरोधात असल्यानं त्यांची परीक्षा आहे. खंडेलवाल हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे उमेदवार म्हणून ओळखले जाताहेत. एकप्रकारे बाजोरियांचा सामना गडकरींशी आहे.
राऊत-सुप्रिया डान्स अन्...
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लग्नांची धूम आहे. खा. संजय राऊत, नाना पटोले, गुलाबराव पाटील यांच्याकडची लग्नं झाली. प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाडांकडे लवकरच सनई वाजणार आहे. सध्या संजय राऊत आणि खा. सुप्रिया सुळे यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ बराच ट्रोल केला जातोय. नाही नाही त्या विकृत प्रतिक्रिया वाचून वाईट वाटलं. राऊत यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त आयोजित संगीत रजनीतील तो व्हिडिओ आहे. गीत-संगीत-नृत्य हे आनंदाचे प्रकटीकरण नाही का?, एका बापानं मुलीच्या लग्नात नाचूदेखील नये का?, सोशल मीडियात हैदोस घालणाऱ्यांनी त्या डान्सवर दिलेल्या वाईट प्रतिक्रिया या आपल्या समाजाचा घसरत चाललेला स्तर दर्शविणाऱ्या आहेत. तुम्ही ज्या नेत्यांना मानता त्यांच्याकडेही उद्या असे आनंदाचे प्रसंग असतील अन् त्यातही गाणं- बजावणं होऊ शकतं; मग, तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया असेल?, काही गोष्टींकडे राजकारणापलीकडे जावून बघितलं पाहिजे. हे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते अन् त्यांना मानणाऱ्यांसाठी लागू आहे. वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचं काय कारण?, पण, ज्यांची नजरच बिघडली आहे ; त्यांच्याबद्दल काय बोलावं?