भगवान महावीरांच्या संदेशात आजच्या प्रश्नांचीही उत्तरे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:12 AM2022-04-14T07:12:44+5:302022-04-14T07:13:02+5:30
जीवनाच्या अनेक क्षेत्रात भगवान महावीर यांचे योगदान आहे. तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा व सदाचार हे त्यांच्या जीवनाचे सार होते.
जीवनाच्या अनेक क्षेत्रात भगवान महावीर यांचे योगदान आहे. तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा व सदाचार हे त्यांच्या जीवनाचे सार होते.
जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते. भगवान महावीर यांनी जगाला नवा संदेश दिला. एका नव्या जगाच्या निर्माणाचे स्वप्न त्यांनी पाहिले. जीवनाच्या अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान अती महत्त्वाचे आहे. तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा व सदाचार हे त्यांच्या जीवनाचे सार होते. त्याच्या प्रचारासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. भगवान महावीर यांचे जीवन म्हणजे ज्ञानवीर, कर्मवीर व धर्मवीर यांचा अतिशय महत्वाचा असा त्रिवेणी संगम होता.
जन्म-मृत्यूच्या वेगवान प्रवाहात मानवाला सर्वश्रेष्ठ मानव धर्माचे दर्शन घडविणारे भगवान महावीर यांचे जीवन आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. २६२१ वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन केले तर सर्वत्र हिंसेचे थैमान होते. स्वार्थ, अज्ञान, अत्याचार व अनाचार याचे समाजात प्राबल्य होते. सुखाच्या लालसेतून केवळ स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञयागात हजारो मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. ही हिंसा कायमची नाहीशी करण्याचे श्रेय जैन धर्माला व भगवान महावीरांना जाते. महावीरांची अहिंसा ही पुरुषार्थी अहिंसा होती. दुर्बल माणसाची अहिंसा कधीच नव्हती. अहिंसेची महती गाताना महावीरांनी संयमाची प्रशंसा केली.
हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. शेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. चांगला समाज निर्माण करण्यासाठी, समाजकल्याणासाठी महावीर यांनी ज्ञान प्रसारणाचे अविरत कार्य केले.
समाजावर आणि माणसांवर प्रेम करा, असा संदेश देण्यासाठी महावीर देशभर फिरले. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत या सहा तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. आध्यात्मिक मुक्तीसाठी या गोष्टी आवश्यक आहेत, असे त्यांचे मत होते.
त्यांचे अहिंसा हे तत्त्व संपूर्ण विश्वाने स्वीकारले. स्व-स्वार्थासाठी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे म्हणजे अहिंसा होय. आपल्या शरीराला किंवा मनाला जशा वेदना होतात त्या इतरांनाही होत असतील, याची जाणीव होणे म्हणजेच अहिंसेचा स्वीकार करणे. प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, हाच अहिंसा तत्त्वाचा भावार्थ आहे.
भगवान महावीर यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी त्यांनी अनेक शिष्यही निर्माण केले. या शिष्यांनीही त्यांचा संदेश सर्व जगभरात पसरवला.
अपरिग्रह या तत्त्वामध्ये आपल्याला मिळालेल्या संपत्तीमधून कायम समाजासाठी देण्याची भावना अभिप्रेत आहे. थोडक्यात अनीतीने पैसा न कमाविणे म्हणजे अपरिग्रह होय. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीत आपले मत हे अंतिम सत्य आहे असे न मानता इतर व्यक्तींचेही मत विचारात घेऊन त्यावर उपाय काढणे, विषय सोडविणे यालाच अनेकांत म्हणतात. विचारांमध्ये लवचीकता असली पाहिजे तसेच प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असल्याने तेही विचारात घेणे अनेकांत या तत्त्वामध्ये अभिप्रेत आहे. ही तत्त्वे भगवान महावीरांनी रुजवली.
- महावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात. पर्यावरण, नातेसंबंध, लोभ, हव्यास, अनैतिकता, एकमेकांमधली चढाओढ, गरीब-श्रीमंत दरी, फसवणूक.. असे जे अनेक प्रश्न आज समाजाला, जगाला भेडसावताहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी काय केले पाहिजे, त्यासाठी आपली वर्तणूक कशी असली पाहिजे, याचे ज्ञान भगवान महावीरांनी त्याचवेळी समाजाला दिले होते. आपण जसे कृत्य करू, तसेच फळ आपल्याला मिळते, हे त्यांनी लाेकांच्या मनावर बिंबवले आणि लोकांच्या मनात सदाचार जागवला. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे समाजाने वाटचाल केली, तर आजच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे सापडू शकतील आणि समाज सुखी होईल. भगवान महावीरांच्या तत्त्वांचे पालन त्यासाठी सर्वांनीच केले पाहिजे.