युती की आघाडी? - वारे कुणाच्या बाजूने?

By यदू जोशी | Published: October 4, 2024 08:25 AM2024-10-04T08:25:00+5:302024-10-04T08:25:26+5:30

निवडणुकीच्या परीक्षेचा पेपर आजतरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला अवघड दिसतो आहे. आता शेवटच्या महिनाभरात काय होते, ते पाहायचे! 

mahayuti or mahavikas aghadi? - On whose side is the wind in Maharashtra assembly Election 2024? | युती की आघाडी? - वारे कुणाच्या बाजूने?

युती की आघाडी? - वारे कुणाच्या बाजूने?

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

होस्टेल लाइफमध्ये एक मित्र होता. त्याला आम्ही परीक्षेच्या आधी आणि नंतरही शुभेच्छा द्यायचो; नंतर यासाठी की तो पेपर कोणाकडे तपासायला गेले याची माहिती काढून तिकडून स्वत:ला पास करवून आणायचा. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्या मित्राची आठवण होते आहे. राज्याचे एकूण चित्र पाहता प्रमुख राजकीय पक्षांना निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतरही शुभेच्छांची गरज भासेल असे दिसते. 

महाराष्ट्राची निवडणूक शेवटच्या महिना-सव्वा महिन्यात फिरते. अचानक काही भावनिक मुद्दे येतात आणि बाकीचे मुद्दे मागे पडतात. तसे काही घडले तर आत्ता वर्तविली जाणारी भाकिते खोटी ठरण्याची शक्यता अधिक. भावनिक, धार्मिक आणि जातीय समीकरणे यावेळच्या निवडणुकीत महत्त्वाची असतील. यावेळचा मोठा खेळ हा ‘उमेदवार कोण’ यावर असेल. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षात बंडखोरी होते, कोण तगडा उमेदवार अपक्ष वा लहान पक्षाकडून लढतो आणि मतदारसंघातील तीनपैकी दोन कोणत्या मोठ्या जाती एकत्र येतात यावरही पारडे वरखाली होईल. पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीचा लेखाजोखा मांडून निवडणुकीचे विश्लेषण खरेतर होऊ नये; पण, महाराष्ट्र आजही त्यापलीकडे जाऊ शकलेला नाही. मराठा, माळी, कुणबी, तेली, लिंगायत, धनगर, मुस्लीम, दलित, आदिवासी हे फॅक्टर तर आहेतच; पण, लहानलहान जातींची भूमिकाही यावेळी महत्त्वाची असेल. लहान समाजघटक कोणाला कौल देतात हेही महत्त्वाचे असेल. मायक्रो ओबीसी जातींमधील नेत्यांच्या स्वतंत्र बैठकांचा सपाटा सध्या भाजपने त्यासाठीच चालवला आहे. मोठ्या जातींच्या राजकारणात आपल्याला कोणी विचारत नाही, असा या जातींचा आजवरचा रोष आहे, तो भाजप दूर करीत आहे.
विजयासाठी आवश्यक असलेल्या तंत्राची दिशा भाजपने यावेळी पूर्णपणे बदलली आहे. गेल्या वेळी उमेदवार वरून लादले होते, यावेळी प्रत्यक्ष मतदारसंघातील दीडदोनशे प्रमुख नेते, कार्यकर्त्यांची मते (उमेदवार कोण हवा?) लिफाफ्यात बंद करून घेतली जात आहेत. 

आता ज्या काही शक्यता दिसतात, त्या अशा - १) महायुती किंवा महाविकास आघाडीची एकहाती सत्ता येईल आणि लगेच सरकार बनेल. २) दोन्हींपैकी एका बाजूला बहुमत मिळाले तरी २०१९ ची पुनरावृत्ती होणारच नाही याची खात्री दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने कौल एका बाजूला दिला आणि भलतेच सत्तेत बसले असेही होऊ शकते. फक्त भाजप-काँग्रेसचे सरकार येणार नाही; बाकी काहीही होऊ शकते. ३) त्रिशंकू विधानसभा. ना युतीला बहुमत ना महाविकास आघाडीला बहुमत. त्या स्थितीत लहान पक्ष आणि अपक्षांना सोन्याचा भाव येईल. दसरा, दिवाळी आहे. त्यामुळे लक्ष्मीदर्शन मोठ्या प्रमाणात होईल. गमतीने सांगायचे तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ते ट्रिलियन वगैरे काय म्हणतात ते होण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असेल.

महायुतीचे काय होईल? 
महायुतीत अजित पवार यांना तिघांमध्ये सर्वांत कमी वाटा मिळेल. लोकसभेतील स्ट्राईक रेट पुढे करून शंभरएक जागा घेण्याच्या शिंदेसेनेच्या प्रयत्नांनाही यश येणार नाही. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या ५४ जागा, सध्या काँग्रेस व लहान पक्षांचे सोबत असलेले पाच आमदार असे मिळून ५९ आणि अधिक सहा जागा अशा एकूण ६५ जागा अजित पवार गट मागत आहे; पण, त्यांच्यासोबत असलेले पक्षाचे ३९ आणि इतर ५ असे मिळून ४४ अधिक सहाआठ जास्त जागा त्यांना मिळतील असा अंदाज आहे. भाजप १५५ ते १६० च्या खाली येणार नाही. १६० मतदारसंघांमध्ये निरीक्षक पाठवून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेतच.  काँग्रेस, उद्धवसेना यांच्यापेक्षा भाजप ५० ते ६० जागा अधिक लढवणार आहे. महायुतीच्या विजयाचा स्ट्राईक रेट भाजपच्या यशावर अधिक अवलंबून असेल. सामाजिक समीकरणांचा लोकसभेत भाजपला सर्वाधिक फटका बसला होता. आता सर्वाधिक जागा तेच लढत असल्याने तोच फटका पुन्हा बसला तर काय, हा महायुतीमध्ये सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. 

दसऱ्यापासून रा.स्व. संघाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. या वर्षात संघाच्या जन्मभूमीत सत्ता राखणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे असेल. अजित पवार गट ही महायुतीतील कच्ची कडी असल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे महायुतीत दुहेरी चिंता दिसते. लोकसभेत १५ पैकी ७ जागा जिंकल्या म्हणून शिंदेंचे खूप कौतुक झाले; पण, त्यातील तीन मतविभाजनामुळे जिंकता आल्या आणि मुंबईतील एक जागा फक्त ४८ मतांनी जिंकली होती, हेही लक्षात घेतले पाहिजे. निवडणुकीच्या परीक्षेचा पेपर आजतरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला अवघड दिसतो आहे. लाडक्या बहिणी, सरकारच्या अन्य योजना अन् निवडणुकीआधीच्या महिनाभरातील घडामोडी यांचा काय परिणाम होतो ते पाहायचे. एक गोष्ट महत्त्वाची. भाजप आणि काँग्रेस यांना यावेळी मोठे यश मिळाले तर २०२९ च्या निवडणुकीत सध्याच्या सहापैकी फारतर चार पक्ष दिसतील.
    yadu.joshi@lokmat.com

Web Title: mahayuti or mahavikas aghadi? - On whose side is the wind in Maharashtra assembly Election 2024?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.