अग्रलेख: पैशांच्या मस्तीपुढे लोटांगण! व्यवस्थेच्याच अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 08:53 AM2024-05-28T08:53:00+5:302024-05-28T08:53:46+5:30

विशाल अग्रवाल या मुजोर धनिकाच्या ‘बाळा’च्या प्रतापानंतर तळपायाची आग मस्तकात जावी, अशा नव्या बाबी रोज समोर येऊ लागल्या आहेत.

Main Editorial Article on Pune Porsche Car Crash Drunk and Drive Builder Vishal Agarwal manipulating police investigation   | अग्रलेख: पैशांच्या मस्तीपुढे लोटांगण! व्यवस्थेच्याच अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली...

अग्रलेख: पैशांच्या मस्तीपुढे लोटांगण! व्यवस्थेच्याच अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली...

विशाल अग्रवाल या मुजोर धनिकाच्या ‘बाळा’च्या प्रतापानंतर तळपायाची आग मस्तकात जावी, अशा नव्या बाबी रोज समोर येऊ लागल्या आहेत. अल्कोहोल सेवनाच्या बाबतीतील बाळाच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह यावा, यासाठी ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी या बाळाचे मूळ रक्ताचे नमुनेच बदलले. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर हे ते दोन महाभाग. मूळ नमुने त्यांनी कचऱ्यात फेकून दिले. एरव्ही चोवीस तासांत सामान्य नागरिकाला रक्त चाचणीचा अहवाल मिळतो. मात्र, अपघात घडून गेल्यानंतर इतके दिवस झाले, तरी रक्ताच्या चाचणीचा अहवाल कसा समोर येत नाही, या प्रश्नाने पोलिसांना घेरले होते. अखेर याबाबत व्यवस्थेच्याच अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

रक्तनमुने बदलण्यापूर्वी बाळाचा बाप विशाल अग्रवाल आणि एका आमदाराचाही फोन डॉ. तावरे याला आल्याचे बोलले जाते. पैशांच्या या मस्तीला नागरिकांनी आंदोलनाने आणि माध्यमांनी प्रखर वाचा फोडली नसती, तर कुंपणाने शेत खाऊन आतापर्यंत पचविलेदेखील असते. गरिबांचे तारणहार म्हणून खरे तर ससून रुग्णालयाची ख्याती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच घडलेल्या ललित पाटील प्रकरणाने या प्रतिमेला मोठे तडे गेले. ते भरायच्या आधीच पुन्हा हे प्रकरण. व्यवस्थेची भ्रष्ट पाळेमुळे किती खोलवर रुतलेली आहेत, हे ललित पाटील आणि विशाल अग्रवाल या दोन प्रकरणांतून पूर्णपणे समोर आले. माध्यमांनी सातत्याने हा विषय लावून धरल्याने पोलिस, प्रशासनाच्या विविध खात्यांतील काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. निलंबनाची कारवाई हा खरे तर फार्स. यांना बडतर्फच करायला हवे. ‘एखादा गुन्हेगार पैशांच्या बळावर हवे तसे व्यवस्थेला वाकवू शकतो, असा समज कुठल्याही नागरिकाच्या मनात निर्माण होईल..’, असे भाष्य याच स्तंभातून ललित पाटील प्रकरणानंतर केले होते.

सहा महिन्यांतच त्याची पुनरुक्ती करावी लागणे, ही अतिशय खेदाची आणि तितक्याच संतापाची बाब आहे. अशा या संतप्त वातावरणात आणखी एक गोष्ट पुण्यातच घडली, ती म्हणजे पुणे महापालिकेतील आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन. मंत्र्याने सांगितलेली नियमबाह्य कामे करण्यास नकार दिल्याने माझ्यावर हेतूतः कारवाई करण्यात आली, असे त्यांचे म्हणणे. पुणे महापालिकेत त्यांची नियुक्ती कशी झाली, इथपासून आतापर्यंतच्या पूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. डॉ. पवार यांची याआधीही बदली करण्यात आली होती. नियुक्तीनंतर काही महिन्यांतच बदली केल्याने नाराज पवार यांनी मॅटमध्ये धाव घेतली आणि बदली थांबविली. त्यांच्या निलंबनामागे संशयाची सुई आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे वळली आहे. विशाल अग्रवाल प्रकरणातही आमदार सुनील टिंगरे यांचे अपघातानंतर पोलिस ठाण्यात जाणे सर्वांच्या डोळ्यांत आले होते. दुष्कृत्यांसाठीचा राजकीय वरदहस्त आणि प्रशासनाबरोबरची मिलिभगत सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांवर, आकांक्षांवर पाणी फिरवते. इंटरनेट, एआयच्या जमान्यात काहीही लपून राहणे आता शक्य नाही, याची जाणीव भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि व्यवस्थेलाच खाऊ पाहणाऱ्या या ‘पहारेकऱ्यां’ना एव्हाना झाली असेल. कोरोनानंतरची आकडेवारी पाहिली, तर पुण्यामध्ये अमली पदार्थांची विषवल्ली वाढतानाचे चित्र आहे. तरुणाईमध्ये अल्कोहोल सेवन ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत चालले आहे. अशा तरुणांना दिशा दाखविण्याऐवजी गुन्हेगारीकडे नेण्याचा मार्ग यंत्रणाच प्रशस्त करत असेल तर काय होणार? हे लिहीत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याची बातमी आली आहे. अशा घटना समोर आल्या की तरुणाईला दोष दिला जातो. मात्र, मुख्य मुद्दा आहे तो यंत्रणांचा. धमाल जगायला आवडणे हा तरुणाईचा स्वभाव असतो. पण त्यासाठी तसे समन्यायी सामाजिक वातावरणही असावे लागते. अमेरिकेत अध्यक्षांच्या मुलीने दारू पिऊन गाडी चालवली, म्हणून तिला अटक होते. इंग्लंडमध्ये सीट बेल्ट लावला नाही म्हणून पंतप्रधानांना दंड होतो. पाश्चात्यांचे अनुकरण करताना तिकडची ही व्यवस्थाही लक्षात घ्यायला हवी. इथे काय चालले आहे॓? आता खूप झाले. पैशांच्या बळावर मग्रुरीचा माज आता सामान्य माणूस सहन करणार नाही. या घडामोडींची राजकीय पाळेमुळेही खोदून काढायला हवीत. अशा प्रकरणांत बऱ्याचदा अधिकारी स्तरापर्यंत कारवाई होते. मात्र, तितकी पुरेशी नाही. समस्येची उकल पूर्ण झाली नाही, तर भ्रष्टाचाराचा आणि पैशांच्या मग्रुरीचा कर्करोग वारंवार डोके वर काढील. पहारेकरी दरोडे घालत असताना, नागरिकांनीच आता सजग पहारा देण्याची वेळ आली आहे.

Web Title: Main Editorial Article on Pune Porsche Car Crash Drunk and Drive Builder Vishal Agarwal manipulating police investigation  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.