अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 10:35 AM2024-06-01T10:35:02+5:302024-06-01T10:35:57+5:30

अर्थात ट्रम्प हे काही गपगुमान राहणारे व्यक्तिमत्त्व नाही. ज्यांच्या समक्ष खटला सुरू आहे, त्या न्यायाधीशांवरच भ्रष्ट असल्याचा ठपका ठेवत, वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

Main Editorial on Donald Trump Stormy Daniel and US Presidential Elections 2024 | अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

वादाच्या भोवऱ्यात राहण्याची सवय जडलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प, गप्प राहण्यासाठी लाच दिल्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्याने, पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ट्रम्प केवळ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असते, तर कदाचित या विषयाची अमेरिकेबाहेर फार चर्चा झालीही नसती; पण ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ होण्याची मनीषा बाळगत असल्याने, जगभरच त्या प्रकरणाचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे.

अर्थात ट्रम्प हे काही गपगुमान राहणारे व्यक्तिमत्त्व नाही. ज्यांच्या समक्ष खटला सुरू आहे, त्या न्यायाधीशांवरच भ्रष्ट असल्याचा ठपका ठेवत, वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. कायद्याचे राज्य असलेल्या लोकशाहीप्रधान देशात वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो आणि ट्रम्प तो वापरत असतील, तर त्यामध्ये काहीही वावगे नाही; पण त्यांनी स्वत:ला बळीचा बकरा म्हणून सादर करून सहानुभूती  मिळविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, ते सदैव वादाच्या भोवऱ्यात का सापडतात, याचे कधी तरी आत्मपरीक्षण करायला हवे. ट्रम्प नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आव्हान देण्याची मनीषा बाळगून आहेत; पण त्यापूर्वीच ते ज्या निवडणुकीत विजयी झाले होते, त्या २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीतील भूत बाटलीतून बाहेर येऊन त्यांना वाकुल्या दाखवू लागले आहे.

स्टॉर्मी डॅनिअल या नावाने प्रौढांसाठीच्या चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या स्टेफनी क्लिफोर्ड या अभिनेत्रीचा असा दावा आहे, की २००६ मध्ये तिचे ट्रम्प यांच्याशी संबंध होते. त्यानंतर २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीच्या तोंडावर, ट्रम्प यांनी त्यांचे वकील मायकल कोहेन यांच्या माध्यमातून, क्लिफोर्डला १.३० लक्ष डॉलर्स एवढी रक्कम, त्या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी न बोलण्यासाठी लाच म्हणून दिली होती, असा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. शिवाय ती रक्कम दडविण्यासाठी त्यांनी त्यांच्या हिशेब वह्यांमध्ये गडबड केल्याचाही आरोप आहे.

ट्रम्प यांनी क्लिफोर्डसोबतचे प्रकरण आणि लाच देण्याचा आरोप, दोन्ही फेटाळून लावले आहेत; पण १२ सदस्यीय ज्युरीने दोन दिवस विचारविनिमय केल्यानंतर, त्यांना एकमताने दोषी ठरविले आहे. या निर्णयामुळे ट्रम्प हे फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोप सिद्ध झालेले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार होण्यात यशस्वी झाल्यास, ते दोष सिद्ध झालेले प्रमुख राजकीय पक्षाचे पहिलेच अध्यक्षीय उमेदवारही ठरतील. या पार्श्वभूमीमुळे रिपब्लिकन पक्षाची अध्यक्षीय उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया आणि अध्यक्षीय निवडणुकीची समीकरणेच बदलण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य अध्यक्षीय उमेदवार म्हणून सर्वांत आघाडीवर होते; परंतु दोषी सिद्ध झाल्यामुळे ते माघारतील काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बदललेल्या परिस्थितीत, ट्रम्प हे अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी लायक नसल्याचा मुद्दा, बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षातर्फे जोरात मांडला जाईल. दुसरीकडे ट्रम्प यांच्या समर्थकांनी मात्र अद्यापही हार मानलेली नाही. ट्रम्प यांना दोषी ठरविणे ही राजकीय छळवणूक असल्याचा युक्तिवाद त्यांनी सुरू केला आहे. लोकप्रियतेत माघारलेल्या बायडेन यांच्यासाठी ज्युरीचा निकाल, `आंधळा मागतो एक डोळा, अन् देव देतो दोन’, याच श्रेणीतील ठरला आहे. त्यामुळे त्यांचे निवडणूक व्यवस्थापक हा मुद्दा सहजासहजी हातचा जाऊ देणार नाहीत. ट्रम्प यांच्या विरुद्ध हा खटला सुरू असतानाही ते लोकप्रियतेत बायडेन यांना टक्कर देत होते. प्रमुख दोलायमान राज्यांमध्ये (की स्विंग स्टेट्स) तर त्यांनी बायडेन यांच्यावर किंचितशी आघाडीही घेतली होती.

खटला सुरू असतानाही ठामपणे ट्रम्प यांच्या पाठीशी राहिलेले त्यांचे पाठीराखे, ते दोषी सिद्ध झाल्यानंतरही खंबीरपणे त्यांची पाठराखण करत राहिले, तर कदाचित ट्रम्प हे पायउतार झाल्यानंतर पुन्हा पदारूढ होणारे दुसरेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरतील. यापूर्वी केवळ ग्रोवर क्लीव्हलँड यांनाच तशी किमया करता आली होती. स्वत: बायडेन यांनीही तो धोका ओळखला आहे. त्यामुळेच एका निधी संकलन कार्यक्रमास संबोधित करताना ते म्हणाले होते, ‘ट्रम्प यांना पुन्हा ओव्हल ऑफिसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मतपेटी!’ अमेरिकन मतदार बायडेन यांना अभिप्रेत असलेल्या सूज्ञतेचा परिचय देतो का, हे कळण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षाच करावी लागेल!

Web Title: Main Editorial on Donald Trump Stormy Daniel and US Presidential Elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.