धार्मिक सौहार्द कायम राखून तोडगा निघावा

By admin | Published: March 29, 2017 01:00 AM2017-03-29T01:00:54+5:302017-03-29T01:00:54+5:30

बाबरी मशीद - राम जन्मभूमी वाद पुन्हा एकदा चर्चेत आहे. ‘मंदिर वही बनायेंगे’चा वारंवार नारा लावणारे योगी आदित्यनाथ हे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत

Maintain religious harmony and solve the problem | धार्मिक सौहार्द कायम राखून तोडगा निघावा

धार्मिक सौहार्द कायम राखून तोडगा निघावा

Next

बाबरी मशीद - राम जन्मभूमी वाद पुन्हा एकदा चर्चेत आहे. ‘मंदिर वही बनायेंगे’चा वारंवार नारा लावणारे योगी आदित्यनाथ हे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर राममंदिर निर्मितीतील सर्व अडचणी दूर केल्या जातील, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी संसदेत केले होते. आणि आता या राज्यात संपूर्ण बहुमतासह भाजपाचे सरकार स्थापन झाले असून, स्वत: योगीच मुख्यमंत्री झाले आहेत. अशात राममंदिर निर्मितीची आस धरून बसलेल्यांची अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा पुन्हा एकदा परस्पर सामंजस्यातून या वादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. या विषयावर मागणी झाल्यास मध्यस्थी करण्यासही न्यायालय राजी आहे. अर्थात सत्ताधारी भाजपाने अयोध्येत राममंदिर निर्मितीचा मुद्दा नेहमीच उचलून धरला असला तरी पक्षाने हे प्रकरण अनेक वर्ष थंडबस्त्यात ठेवले हेसुद्धा एक सत्य आहे. आता जेव्हा की उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आले आहे आणि त्याचे नेतृत्व योगींकडे आहे; एकतर न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निर्णय द्यावा अथवा केंद्रातील स्पष्ट बहुमतातील भाजपा सरकारने घटना दुरुस्तीचा मार्ग अवलंबून मंदिर निर्मिती करावी ही मागणी जोर धरू लागली आहे. परंतु अजूनही रामभक्तांना वाटते तेवढी राममंदिराची निर्मिती सोपी नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.
बाबरी मशीद विध्वंसापूर्वी आणि नंतरही परस्पर समझोत्याचे प्रयत्न झाले आहेत आणि बहुदा या वादावर तोडग्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु आजवर हे सर्व प्रयत्न यशस्वी न होण्यातही खूप काही दडून आहे. अशा काही गाठी आहेत ज्या अद्याप उकलू शकलेल्या नाहीत. आता न्यायालयाने समझोत्याचा सल्ला दिला आहे. तडजोडीचा अर्थच काही पदरात पडणे तर काही गमावणे असा होतो. कधीकधी अशीही परिस्थिती निर्माण होते जेव्हा काही गमावून काही मिळविता येते. या प्रकरणात सुद्धा तशी तयारी ठेवली पाहिजे असे मला वाटते. आपण काही गमावतो आहे असे न समजता प्रयत्न केले तर मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. जेथवर प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळाचा प्रश्न आहे तर ही एक आस्था आहे. ऐतिहासिक आणि पुरातात्त्विक पुरावे नसले तरी या आस्थेचा आदर केला पाहिजे. परंतु एकाची आस्था जपण्याकरिता दुसऱ्याच्या भावना पूर्णपणे चिरडून टाकणेही योग्य नाही. आस्था आणि भावना दोहोंचे रक्षण कसे करायचे हा प्रश्न आहे.
काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांत एक बातमी प्रकाशित झाली होती. अयोध्येत हुनमानगढी मंदिराच्या मालकीच्या जमिनीवर एक मशीद उभारण्यासंदर्भातील ते वृत्त होते. ते मशिदीला विरोध करणारे खचितच नव्हते. हनुमानगढी मंदिराचे महंत ज्ञानदासजी यांनी केवळ या मशिदीच्या पुननिर्मितीची परवानगीच दिली नाहीतर जोवर ही मशीद तयार होत नाही तोवर या भूमीवर नमाज पठनाचाही सल्ला दिला होता. शेवटी हेसुद्धा स्वत:चेच घर आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
संपूर्ण प्रकरणाचा गोषवारा
या आलमगिरी मशिदीची निर्मिती सतराव्या शतकात औरंगजेबाच्या एका शिलेदाराने केली होती. इ.स. १७६५च्या जवळपास नवाज शुजाउदुल्ला यांनी मशिदीची ही संपूर्ण जमीन हनुमानगढी मंदिराला या अटीसह दानात दिली की मशिदीत नमाज पठन सुरूच राहील. वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीनुसार कालांतराने तेथील नमाज पठन बंद झाले. मशिदीची इमारत मात्र कायम राहिली. परंतु देखभालीअभावी मशिदीची ही इमारत पडीक झाली आणि अयोध्या नगरपालिकेने येथील प्रवेशावर निर्बंध घातले. काही दिवसांपूर्वी स्थानिक मुस्लीम बांधवांनी हनुमानगढीचे मुख्य महंत ज्ञानदासजी यांच्याकडे मशिदीच्या पुनर्बांधणीची परवानगी मागितली. महंतजींनी केवळ परवानगीच दिली नाहीतर यासाठी लागणारा खर्च देण्याची तयारीही दर्शविली. परस्पर सौहार्दाचे यापेक्षा चांगले उदाहरण दुसरे काय असू शकते? सद्सद्विवेकबुद्धी आणि बंधुभावाने वाद मिटतातच शिवाय जगण्याचा मार्गही निर्माण होतो, याचीही यातून प्रचिती यावी.
हे आपल्या देशातील धार्मिक सौहार्दाचे एकमेव उदाहरण नाही. ईद-दिवाळी सोबत साजरी करण्याची आपली दीर्घ परंपरा राहिली आहे. आजही अनेक गावांमध्ये हिंदू माता आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी त्यांना ताजियांच्या खालून नेतात. आजही रामलीलेचा मंच मुस्लीम कारागिरांकडून सजविला जातो. अशा पद्धतीने एकोप्याने राहणारे हिंदू- मुस्लीम काही गमावत नाहीत तर काही तरी मिळवत असतात. गमावलेले काही तरी मिळविण्याची ही परंपरा गंगा-जमुना सभ्यतेला आकार देत असते. त्याबाबत गर्व करण्याचा हक्क प्रत्येक भारतीयाला आहे. दुसऱ्याला कमी लेखून नव्हे तर दुसऱ्याला वर आणण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांतूनच एका सच्च्या भारतीय समाजाची परंपरा, सभ्यता आणि संस्कृतीला आकार दिला जाऊ शकतो. समाजिक चौकटीला मजबूत बनविले जाऊ शकते.
आज बाबरी मशीद राम जन्मभूमी वाद पुन्हा चर्चेत आला आहे. हा वाद सोडविण्याच्या प्रक्रियेला गती दिली जात असल्याचे दिसून येते. त्यासाठी सांप्रदायिक सौहार्दाची आपली परंपरा आणि विवेकशीलतेच्या विचारांचा आधार घेण्याची गरज आहे.
केवळ मंदिरच नव्हे तर मशीदही ईश्वराचे घर असते, हे मर्म समजून घ्यायला हवे. मंदिर, मशीद जवळ बनणार की दूर, शरयू नदीजवळ बनणार की दूर हाही हा प्रश्न नाही. केवळ आपल्या आस्थेचा नव्हे तर परस्परांच्या आस्थेला बळकटी देण्याचा हा मुद्दा आहे. कोणताही प्रश्न हेकेखोरपणे सोडविला जाऊ शकत नाही. भारतीय समाजातील प्रत्येक वर्गाने दुसऱ्यांच्या भावना समजून घेत त्यांचा सन्मान करण्याबाबत विश्वास दाखवायला हवा. त्यासाठी हट्ट केला जावा. ज्या दिवशी हिंदू-मुस्लीम, ख्रिश्चन -पारशी यांच्यात परस्परांना कोण चांगल्याप्रकारे समजून घेतो याबाबत स्पर्धा लागेल त्यावेळी खऱ्या अर्थाने धर्माचा विजय होईल. केवळ हिंदू धर्मच नव्हे तर कोणताही धर्म ही एक जीवनपद्धती असते. धर्म ही गर्व करण्याची नव्हे आचरणात आणण्याची बाब आहे. भारतात ८० टक्के हिंदू तर उर्वरित २० टक्क्यांमध्ये मुस्लीम आणि अन्य धर्म येतात. भारत हा शंभर टक्के भारतीयांचा आहे. धर्म, जात, भाषेच्या आधारावर त्याची विभागणी करणे किंवा अशी विभागणी करताना स्वत:चा स्वार्थ जपणे हा केवळ देशाच्या प्रति नव्हे तर मानवतेप्रति गुन्हा आहे. सलोख्याने जगत सर्वांच्या साथीने विकास करण्याचा आपला अधिकार आणि कर्तव्य जाणायला हवे. मंदिर त्याच ठिकाणी बनणार की दहा पावले दूर, मशीद शरयू नदीच्या या काठावर बनणार की त्या काठावर याबाबत हेकेखोरपणा केला जाऊ नये. मंदिर-मशीद सोबत कशी राहणार यासाठी जिद्द केली जावी, मात्र स्मशान आणि कब्रस्तानावर राजकारण केले जात असताना हे अशक्यच वाटते. एक भारतीय म्हणून अभिमानाने जगायचे असेल तर अडचणींवर मात करायलाच हवी. ही लढाई सोबत सोबत जगण्यासाठी व्हायला हवी.

विश्वनाथ सचदेव
(ज्येष्ठ पत्रकार)

Web Title: Maintain religious harmony and solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.