...तुम्हीच बनवा तुमचे डम्पिंग ग्राऊंड
By चंद्रशेखर कुलकर्णी | Published: September 25, 2017 01:21 AM2017-09-25T01:21:16+5:302017-09-25T01:21:31+5:30
विलक्षण वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणातून काही नव्या समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. महानगरांच्या उंबरठ्यावरून नागरी व्यवस्थापनाला एकप्रकारे आव्हान देणा-या समस्या केवळ प्रशासनासाठीच नव्हे
विलक्षण वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणातून काही नव्या समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. महानगरांच्या उंबरठ्यावरून नागरी व्यवस्थापनाला एकप्रकारे आव्हान देणा-या समस्या केवळ प्रशासनासाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीही डोकेदुखी बनल्या आहेत. कचरा ही त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची समस्या. मुंबई-ठाणे यासारख्या शहरांसाठी ही आटोक्यात न राहिलेली बाब बनली आहे. भरमसाट लोकसंख्या, बकाल वस्त्या आणि बेशिस्त जनता यामुळे निर्माण होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट हा प्रश्न गंभीर बनला नसता तरच नवल! रोजच्या रोज निर्माण होणारा प्रचंड कचरा टाकायचा कुठे, या चिंतेवरचे उपाय आता खुंटल्यात जमा आहेत. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईत एक नवी सुरुवात करण्याचे पुढचे पाऊल मुंबई महापालिकेने उचलले आहे. तुम्ही निर्माण केलेल्या कच-याची विल्हेवाटही तुम्हीच लावा, हे त्याचे सूत्र असणार आहे. थोडक्यात सांगायचे, तर तुम्हीच बनवा तुमचे डम्पिंग ग्राऊंड, असा स्पष्ट संदेश मुंबई महापालिकेने नागरिकांना दिला आहे.
ही काही विनंती नाही. आवाहनही नव्हे. त्यासाठी ताकीदवजा आदेशच जारी करण्यात आला आहे. काही जण याच्या विरोधात सूर लावतीलही, पण कचºयाच्या विषयात यापूर्वी पालिकेने बरेच प्रयत्न करून पाहिले आहेत. प्लास्टिकचा वापर टाळण्यापासून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या आवाहनापर्यंत आणि रस्त्यावरच नैसर्गिक विधी करण्याला प्रतिबंध करण्यापासून डम्पिंग ग्राऊंडसाठी नव्या जागा शोधण्यापर्यंत खूप काही करून झाले. पण एरवी पाणी तुंबले की महापालिकेच्या नावाने बोटे मोडणारे नागरिक महापालिकेच्या अशा आवाहनांना नीट प्रतिसाद कुठे देतात? कच-याची विल्वेवाट निवासी सोसायट्यांनी स्वत:च लावण्याच्या नोटिशीच्या बाबतीतही हाच अनुभव येत आहे. पालिकेच्या आदेशाला एव्हाना फक्त चार-पाच टक्के सोसायट्यांनीच प्रतिसाद दिला आहे. ज्या सोसायट्या शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करतात, त्यांनी स्वत:च या कचºयाची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. म्हणजे आपला कचरा नकळत दुसºयाच्या दारात नेऊन टाकणे, यात अपेक्षित नाही.
खरा प्रश्न असतो, तो ओल्या कच-याची वासलात लावण्याचा. ती कशी लावायची, याचे प्रशिक्षण याच महानगरात मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने गेली २५ वर्षे दिले जात आहे. पण गळ्याशी आल्याखेरीज असे ज्ञान आत्मसात करण्याची बुद्धी बहुसंख्य लोकांना होत नाही. डम्पिंग ग्राऊंडला असलेल्या मर्यादा लक्षात घेता, सोसायट्यांनी आपापल्या आवारात शहरी शेती करण्याचा मार्ग भविष्यात अधिक सुखकर आणि व्यवहार्य ठरणार आहे. भाभा अणु संशोधन केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ शरद काळे यांनी निसर्गऋणाची परतफेड करण्याच्या मनीषेतून पर्यावरणाला पोषक ठरेल अशी कच-याच्या विल्हेवाटीचा प्रकल्प सिद्ध केलेला आहे. आजमितीस अनेक ठिकाणी हा वस्तुपाठ गिरविला जात आहे, पण मुंबईकरांनी अजून तो कित्ता म्हणावा तसा गिरवलेला नाही. विज्ञान आणि समाज यांच्यातील नात्याची वीण घट्ट करण्याची ही एक संधी आहे, या दृष्टीने गांधी जयंतीला कचºयाच्या विल्हेवाटीची नवी सुरुवात झाली तर ते पुढचे पाऊल ठरेल!