मलाबी आमदार झाल्यासारखं वाटतंय !
By सचिन जवळकोटे | Published: July 21, 2019 08:29 AM2019-07-21T08:29:45+5:302019-07-21T12:49:55+5:30
लगाव बत्ती
आचारसंहिता लागू होण्यास राहिलेत अवघे तीन-चार आठवडे. आता होतील एकेक पत्ते ओपन. फुटू लागतील इच्छुकांच्या स्वप्नांना धुमारे. सरड्यानंही लाजून चूर व्हावं, इतक्या झपाट्यानं बदलले जातील अनेकांचे रंग...कारण बरेचजण आत्तापासूनच गुणगुणू लागलेत, ‘मलाबी आमदार झाल्यासारखं वाटतंय.’
किस्सा एक
काय आबा.. तुम्हीही इथं ? : इति दिलीप मालक
स्थळ : पुण्यातलं कात्रज. तानाजीरावांचं आॅफिस. ‘धनुष्यावर बाण’ लावून भगवा फडकलेला. वेळ : गेल्या आठवड्यातली. वेटींग रुममध्ये ‘दक्षिण’चे ‘दिलीप मालक’ थेट ‘तिºहे’हून येऊन बसलेले. बराच वेळ झाला तरीही ‘तानाजीरावां’ची एन्ट्री काही झालीच नाही. एवढ्यात समोरून अकस्मातपणे सांगोल्याचे ‘दीपकआबा’ आले. मालकांनी आबांना बघितलं. आबांनाही मालक दिसले. दोघांचेही चेहरे खर्रऽऽकन बदलले. ‘काय आबाऽऽ तुम्ही इकडं ?’ असं मालकांनी विचारलं. ‘आता तुम्ही जी इच्छा मनात धरून इथं आलात, तोच प्लॅन माझाही असणार नां ?’ असा भाव आबांच्या चेहºयावर प्रकटला. तेव्हा भला-मोठा बुके काऊंटरवरच ठेवून ‘मालकां’नी बाहेरच्या पीएकडं निरोप दिला अन् ते आॅफिस तत्काळ सोडलं.
काही वेळानं ‘तानाजीराव’ आले. त्यांनी आतमध्ये त्यांच्या ‘स्टाफ’ची मिटींग घेतली. बाहेर एका मोठ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आलाय, हे माहीत असूनही मिटींग भरपूर वेळ चालली. अखेर बºयाच वेळानंतर आबांना आत प्रवेश मिळाला. थोडीफार चर्चा झाली; मात्र निर्णय काही झालाच नाही. तरीही ते गप्प बसले; कारण त्यांनाबी आमदार व्हायचंय नां ?
किश्श्यामागचा किस्सा..
‘मध्य’मध्ये उभारणार अशी जोरदार हवा झालेली असतानाच ‘दिलीप मालकां’चे अकस्मात ‘दक्षिण अन् उत्तर’ तालुक्यातील सर्व प्रमुख सहकाºयांना फोन गेले. तातडीची मिटींग बोलाविली गेली. (त्याला खुद्द ‘मालक’च अनुपस्थित राहिले, हा भाग वेगळा). ‘आपल्या नेत्यानं कोणत्याही पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला तरी आपण त्यांचा प्रचार करू’ असं मंद्रुपच्या ‘प्रवीण मालकां’पासून (मोठ्या मालकांचे छोटे मालक !) इतर नेत्यांनी छातीठोकपणे सांगितलं. त्यामुळं ‘दक्षिण की मध्य’ याचं उत्तर शोधता-शोधता शहरातील त्यांचे कार्यकर्ते अधिकच गोंधळात पडले.
दरम्यान, ‘दिलीप मालकांच्या’ गटाकडून म्हणे ‘कमळ’वाल्यांनाही प्रस्ताव गेलाय. त्यांना भविष्यातील विधान परिषदेसाठी शब्द मिळाला तर ते ‘दक्षिण’मध्ये ‘सुभाषबापूं’ना विरोध करणार नाहीत किंवा...त्यांना ‘दक्षिण’मध्ये उमेदवारी देऊन ‘बापूं’ची विधान परिषदेवर व्यवस्था करावी. आता वरचे नेतेही लय हुश्शारऽऽ. त्यांनी ‘मालकांचा मॅटर’ सोपविला थेट ‘बापूं’कडंच...म्हणजे बघा...ज्यांच्यात इंटरेस्ट नाही, ती मंडळी पाठवायची ‘बापूं’कडं... अन् ज्यांना पटकन् जवळ करायचंय, तो ‘चॅप्टर’ सोपवायचा पालकमंत्र्यांकडं. लगाव बत्ती...
किस्सा दोन
शहाजीबापूंच्या फोटोचा वांदा
‘दीपकआबा’ भेटून गेल्याचं कळताच इकडं ‘शहाजीबापू’ अस्वस्थ झाले. त्यांनीही दोन दिवसांपूर्वी थेट ‘तानाजीरावां’ची भेट घेतली; परंतु तिथं ‘आबां’चा विषय राहिलाच बाजूला...‘बापूं’च्या फोटोचा वांदा झाला. कोल्हापूरचे ‘चंदूदादा’ नुकतेच सोलापुरात येऊन गेले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पंढरपूरच्या ‘प्रशांत मालकां’नी पब्लिसिटी केलेली; मात्र त्यात ‘शहाजीबापूं’चा फोटोही झळकलेला. म्हणूनच ‘तुम्हाला कमळाबद्दल एवढं प्रेम असेल तर तिकडंच जा नांऽऽ’ स्पष्ट सल्ला यावेळी दिला गेला. बापू गडबडले. सटपटले. ‘माझा काही संबंध नाही होऽऽ. पंढरपूरवाल्यांनीच परस्पर गेम केली’ असं सांगू लागले; परंतु गणित बिघडलं ते बिघडलंच. ‘कार्यकर्ता म्हणून तुम्हाला वेळप्रसंगी नव्या उमेदवाराचाही प्रचार करावा लागेल’ याची जाणीव त्यांना इथं करून देण्यात आली. तरीही ते गपगुमान बाहेर आले; कारण त्यांनाबी आमदार व्हायचंय नां ?
किस्सा तीन
दादा अन् मामा वेटींगमध्येच..
माढ्याचे ‘बबनदादा’ एकाचवेळी ‘मातोश्री’ अन् ‘वर्षा’ बंगल्यावर संपर्क ठेवून, हे खुद्द ‘देवेंद्रपंतां’नीच पंढरीत सांगितलेलं; मात्र त्याच्याही पुढची अजून एक गंमत. ‘दादा’ अन् ‘मामा’ हे दोघेही बंधू हातात हात घालून याच सावंतांना भेटायला गेलेले. सत्तेविना बराच वेळ ‘ताटकळत बसणं’ काय असतं, हे या दोघांनीही इथं अनुभवलेलं. मात्र, भेट झाल्यानंतरही शेवटपर्यंत त्यांना काही ‘खात्रीचा शब्द’ मिळालाच नाही. ‘संजयमामा’ भलेही बाहेर झेडपीत ‘एखादी आॅफर मिळाली तर विचार करू’ असं मोठ्या रुबाबात सांगत असले तरी तिथं त्यांच्या साध्या ‘रिक्वेस्ट’लाही कुणी गांभीर्यानं घेतलं नाही. आता यामागची खरी मेख वेगळीच...माढ्यात शेवटच्या क्षणी जाहीर होऊ शकते सावंत घराण्यातल्याच कुणाचीतरी उमेदवारी..कारण ‘शिवाजीरावां’नाबी त्यांच्या ‘पृथ्वीराज’ला आमदार करायचंय नां ?
सोनं लॉकरमध्ये...
...ताई जनतेमध्ये !
‘चेतनभाऊ’ अन् ‘श्रीदेवीताई’ यांचा राजकीय वाद मिटविण्यासाठी ‘प्रणितीतार्इं’नी मध्यंतरी समेटाची मिटींग घेतलेली. आता त्या ठिकाणी नेमकं घडलं, हे बाहेर कुठं आलंच नाही...कारण यापुढं कुणीच ‘मीडिया’शी बोलायचं नाही, असा म्हणे फतवा निघाला. (आता हीही गुप्त बातमी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बोलता-बोलता ‘मीडिया’ला सांगितली, ही गोष्ट निराळी). मात्र गेल्या एक महिन्यापासून ‘श्रीदेवीतार्इं’चा ज्या पद्धतीनं ‘पॉलिटिकल फंडा’ गाजू लागलाय, ते पाहून पालिकेतील सारेच ‘इव्हेंट बहाद्दर’ हबकून गेलेत. यात ‘चंदनशिवें’पासून सारेच आले बरं का. पालिका सभागृहाला कुलूप काय...महापौरांना पेढा काय...बजेट सभेत कटोरा काय...बेघरांना अंघोळ काय... ‘श्रीदेवीतार्इं’ची वाटचाल विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं चाललीय,’ हे सांगण्यास आता नसावी कुणाचीच गरज. विशेष म्हणजे या ‘गोल्डन वुमन’तार्इंनी सध्या म्हणे दागिनेही ‘लॉकर’मध्ये ठेवून दिलेत. म्हणजे इलेक्शनची तयारी नक्कीच; कारण कार्यकर्त्यांच्या निरीक्षणानुसार चुकून-माकून ‘युती’ तुटली तर मिळू शकते ‘हातात कमळ’ धरायची संधीही.. म्हणूनच या ‘तार्इं’ना म्हणे आमदार झाल्यासारखं वाटतंय...मग खºया-खुºया आमदारतार्इंचं काय? लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)