दुष्काळग्रस्तांसाठी ममतेचे पूल
By admin | Published: March 17, 2016 03:55 AM2016-03-17T03:55:35+5:302016-03-17T03:55:35+5:30
ममतेचे हे पूल बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा, मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.
- विजय बाविस्कर
ममतेचे हे पूल बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा,
मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.
दुष्काळाच्या अस्मानी संकटाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा डोलाराच कोसळून पडू लागला आहे. जगण्यासाठी महानगरांच्या आसऱ्याला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शेतकऱ्यांना बांधकाम मजूर म्हणून काम करावे लागते आहे. दुष्काळामागील कारणे काहीही असोत; आता गरज आहे या साऱ्यांना आसरा देऊन त्यांचे जीवन त्यातल्या त्यात सुसह्य व्हावे म्हणून सर्वांनी मिळून काम करण्याची.
मराठवाडा-विदर्भातील अनेक दुष्काळी गावे उठून पुण्याच्या आसऱ्याला आल्याचं चित्र ‘लोकमत’नं मांडलं. मजूर अड्ड्यांवर कामाच्या प्रतीक्षेत तासन् तास बसून राहायचं. काम मिळालं तर ठीक, नाही तर दिवस कसा तरी घालवायचा, असं अनेकांचं जिणं झालं आहे. एखाद्या दिवशी काम मिळालं तर दोनशे-तीनशे रुपये मिळतात; मात्र पुढचे चार-पाच दिवस काम मिळेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या तुटपुंज्या रकमेतच संसाराचा गाडा चालवताना कसरत करावी लागते. तरीही अजून परिस्थिती बरी म्हणायची, पुढचा काळ तर आणखी भीषण आहे. या परिस्थितीत पुण्यासारख्या शहरांची जबाबदारी वाढली आहे.
मराठवाड्यातील दुष्काळ असो की भूकंप, पुणेकरांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लातूर जिल्ह्यामधील किल्लारी येथे १९९२मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर हजारो मुलांच्या आयुष्यात काळोख पसरला. त्यावेळी शांतिलाल मुथा यांनी धाव घेतली. पहिल्यांदा या मुलांना आसरा हवा आहे, हे ओळखले. त्यांना घेऊन ते पुण्याला आले. पिंपरीतील एका शाळेत तात्पुरती व्यवस्था केली. त्यानंतर भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वाघोली येथे शैक्षणिक संकुल उभे केले. या मुलांना केवळ भौतिक सुविधा पुरविल्या इतकेच नव्हे, तर त्यांची मने जाणून घेतली, त्यांच्या दु:खांवर फुंकर घातली. ही सगळी मुले आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. समाजातील मांगल्याच्या त्यांना मिळालेल्या अनुभूतीने एक चांगला माणूस घडला आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या कार्यात या सर्वांचा आजही सहभाग दिसून येतो. आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांवरही शांतिलालजींनी मायेची पाखर घातली आहे. त्यांना भारतीय जैन संघटनेने शैक्षणिक आधार तर दिलाच; शिवाय पालकांच्या आत्महत्त्यांच्या वेळी मुलांचे वय हा महत्त्वपूर्ण घटक ठरत असल्याने वाघोलीमधील प्रकल्पात मानसिक आरोग्य विभागाची स्थापना केली आणि भावनिक वावटळीत सापडलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढले. ‘मंथन’ या उपक्रमाद्वारे या मुलांना आवश्यक असे मानसिक बळ देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याचा व पुढील आयुष्यात प्रगतिपथावर वाटचाल करण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न बीजेएस करीत आहे. राज्याच्या मदतीला जाण्याची पुण्याची ही परंपरा आहे. १९७२च्या दुष्काळातही लाखो दुष्काळग्रस्तांना पुण्याने आधार दिला होता. शेतमजुरांपासून औद्योगिक कामगारांपर्यंत काम करण्यासाठी हजारो जण येथे स्थलांतरित झाले. त्यांची आयुष्ये पुण्याने सावरली. याच काळात पुण्यात स्थलांतरित झालेली दुसरी पिढी आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांच्या नवनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही पुणे आणि परिसर या दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे अनेक उदाहरणांवरून दिसत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांवर अनेक पुणेकरांनी ममतेची पाखर घातली आहे. ‘लोकमत’ने दुष्काळग्रस्तांची व्यथा मांडल्यावर आमच्याशी संपर्क साधून मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. या दुष्काळग्रस्तांच्या निवाऱ्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि त्यांच्या रोजगारापासून मानसिक आरोग्यापर्यंत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. ममतेचे हे पूल असेच बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा, मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.