नरेचि केला हीन किती नर ...?
By किरण अग्रवाल | Published: December 9, 2021 07:07 AM2021-12-09T07:07:07+5:302021-12-09T10:51:42+5:30
Editors View : कौटुंबिक व सामाजिक मर्यादांमुळे तक्रार न करता छळ सहन करणाऱ्या मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.
- किरण अग्रवाल
जमाना बदलला आहे असे आपण म्हणतो, ते खरेही आहे. काळ बदलला तसा कालौघात व्यवहार, वर्तन व जीवनमानाच्या पद्धतीतही बदल झाला; पण, हा बदल होताना प्रागतिकतेच्या संदर्भाने मानसिकतेत कितपत बदल घडून आला याचा विचार केला तर, तितकेसे समाधानकारक उत्तर हाती येत नाही. शिक्षणाने मनुष्य शिक्षित झाला, परंतु सुशिक्षित झाला का, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो. विशेषतः जुन्या धारणा अगर विचारधारा असोत, की, अंधश्रद्धांची जळमटे ; अजूनही मोठ्या प्रमाणातील वर्गातून ती निघालेली दिसत नाहीत. वंशाला दिवा मुलगाच हवा म्हणून पुढे आलेला ‘नकोशी’चा मुद्दा असो, अगर जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केल्या जाऊ पाहणाऱ्या सहजीवनाला काही ठिकाणी होणारा विरोध व त्यातून घडून येणारे ऑनर किलिंग; अशा काही घटना पाहता वैचारिक मागासलेपण पुरेसे दूर झालेले दिसत नाही. पुढारलेपणाचा डांगोरा पिटणाऱ्या सर्वांनीच या संदर्भात चिंता व चिंतन करणे गरजेचे आहे.
बदलत्या काळानुरूप आंतरधर्मीय विवाह सोहळे आता होऊ लागले आहेत. लपतछपत नव्हे तर, उजळ माथ्याने, धूमधडाक्यात उभय पक्षांच्या साक्षीने असे सोहळे होत आहेत ही समाधानाचीच बाब आहे, पण, दुसरीकडे ग्रामीण भागात उच्च नीचता पाळली जाऊन आंतरजातीय विवाहांना अजूनही विरोध होताना दिसून येतो तेव्हा मानसिक मागासलेपण टिकून असल्याचे अधोरेखित होऊन जाते. बरे, हा विरोध फक्त नाराजीपर्यंत न राहता तो थेट खून खराब्यापर्यंत पोहोचताना दिसतो. सैराट या मराठी चित्रपटाद्वारे तेच वास्तव दर्शकांपुढे मांडले गेले. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात गोयगाव येथे अलीकडेच घडलेल्या अशातल्या एका घटनेतूनही तेच पुढे आले. या घटनेतील भीषणता अशी की, प्रेम विवाह केलेल्या गर्भवती बहिणीचे शीर तिच्या आईच्या मदतीने भावानेच धडावेगळे केले व ते शीर घराच्या ओट्यावर ठेवून पोलीस ठाणे गाठले. मनाची निबरता, निर्दयता किंवा निर्ममता किती टोकाची असू शकते हे तर, यातून लक्षात यावेच, पण, आपल्या संतापापुढे कायद्याची भीतीही बाळगली जात नसल्याचे स्पष्ट व्हावे.
कोणत्याही मुला-मुलींसाठी आई हीच त्यांची सर्वात जवळची मैत्रीण म्हटली जाते. मन कुणाजवळ मोकळे करावे तर, त्यासाठी आई वा, बहिणीखेरीज दुसरी तितक्या हक्काची जागा नसते, पण, असे असताना एखादी माताच आपल्या मुलीच्या जीवावर उठते तेव्हा भावनांनाच धक्के बसून गेल्याशिवाय राहत नाही. मुलाच्या हव्यासापोटी मुलीचा गर्भातच जीव घेणाऱ्या किंवा अनिच्छेने जन्माला आलेल्या मुलीला ‘नकोशी’ची वागणूक देणाऱ्या मातांबद्दलही आश्चर्य वाटून जाते ते त्याचमुळे. विशेष म्हणजे अशा मानसिकतेतूनच काही छळाच्या घटना घडून जातात, ज्या चीड आणणाऱ्या ठरतात. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका मातेने आपल्या अल्पवयीन मुलीचा तीन वेळा विवाह लावून पुन्हा चौथ्यांदा तिच्या लग्नाची तयारी केल्याचा जो प्रकार पुढे आला तो असाच आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून तिची आई व दोन भावांसह बारा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे, त्यामुळे या प्रकरणाचा जो सोक्षमोक्ष लागायचा तो यथावकाश लागेलच, परंतु कौटुंबिक व सामाजिक मर्यादांमुळे तक्रार न करता छळ सहन करणाऱ्या मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.
अशा घटनांकडे अपवाद म्हणूनच पाहता यावे, पण, वैचारिक बुरसटलेपणाचा अंश टिकून असल्याचे त्यातून लक्षात घेता, दुर्लक्षही करता येऊ नये. भौतिक सुख सोयी व प्रगतीच्या मागे लागताना ग्राम पातळी व तळागाळापर्यंतच्या व्यक्तींचे पूर्णतः मानसिक उन्नयन अजून साधले गेलेले नसल्याची जी बाब यातून पुढे येते, त्यासाठी कुणाला काय करता येईल याचा विचार यानिमित्ताने होणे गरजेचे आहे. आज आधुनिक साधनांमुळे माणूस जवळ आला आहे, पण, तरी माणूस माणसाला पारखा होतो आहे. संवेदना शाबूत असलेल्या माणसांकडून माणुसकीचा प्रत्यय येतोच, परंतु हीन, दीनत्व कायम असलेल्या व्यक्तींच्या मनाची मशागत करण्यासाठी सामाजिक पुढाकार घेतला जायला हवा. एकीकडे चंद्रावर वस्ती करण्याची व मंगळावर पाणी किंवा जीव शोधण्याची धडपड, आणि दुसरीकडे अविवेकी मागासलेपणा; या दोन पातळ्यांमधील अंतर शक्य तितके कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत आणि असे प्रयत्न केवळ शासकीय पातळीवरून होऊन चालणार नाही तर, सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही त्याला बळ लाभणे गरजेचे आहे इतकेच यानिमित्ताने.