माणूस? सरासरी नऊ तास झोपतो, काम फक्त अडीच - तास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2023 10:20 AM2023-07-08T10:20:25+5:302023-07-08T10:25:01+5:30
माणूस दिवसभरात काय काय करतो? साधारण आठ तास गप्पाटप्पा, साडेचार तास मित्र- कुटुंबीयांसाठी, पोटपूजा अडीच तास आणि नटण्या-मुरडण्यात एक तास
- श्रीमंत माने
कामाने इतके कंटाळलो की थोडी विश्रांती घ्यायला हवी, असे माणूस सहज बोलून जातो; पण खरेच थकवा यावा इतका तो काम करतो का? अनेक जण करतातही; पण सगळेच करत नाहीत. गेल्या १५ नोव्हेंबरला जागतिक लोकसंख्येने ८ अब्जाचा आकडा ओलांडला. या आठ अब्ज लोकांच्या जवळपास वीस वर्षांच्या दैनंदिनीचा अभ्यास केल्यानंतर निघालेला ताजा निष्कर्ष सांगतो, की माणसे सरासरी ९ तास झोपतात आणि केवळ २.६ तास अर्थात १५६ मिनिटे काम करतात. हे धक्कादायक, पण कटुसत्य आहे.
परवा, ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा होईल, तेव्हा प्रामुख्याने लोकसंख्येची वाढ, पोट भरण्यासाठी त्यांचा आटापिटा पर्यावरणाचा असमतोल, दुष्काळ व महापुराची संकटे, संकटात शेती यावर चर्चा होईल. यंदा या चर्चेत कॅनडातील माँट्रियल येथील मॅकगिल विद्यापीठाच्या संशोधकांनी काढलेल्या आणि प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने महिनाभरापूर्वी प्रकाशित केलेल्या निष्कर्षाची भर पडेल तब्बल १४५ देशांमधील लोकांचा २००० ते २०१९ अशा वीस वर्षांचा महाप्रचंड डेटा यासाठी संशोधकांनी वापरला. त्या देशांतील शासकीय अशासकीय संस्थांचे सर्वेक्षण, तसेच रोजगार मंत्रालयाची कामाच्या तासांची आकडेवारी एकत्र केली गेली.
आठ अब्ज लोकांच्या तब्बल १९० अब्ज मानवी तासांचे विश्लेषण व वर्गीकरण करण्यात आले. पृथ्वीच्या परिवलनानुसार, वेगवेगळ्या देशांमधील लोकांच्या कामाच्या, झोपण्याच्या वेळा गृहीत धरण्यात आल्या. त्यात आढळले, की वैश्विक मानव सरासरी ९.१ तास विश्रांती घेतो किंवा झोपतो. निद्रानाशाचा त्रास असलेल्यांना हे धक्कादायक वाटेल; पण या अभ्यासात नवजात अर्भकांपासून सगळ्या जिवंत माणसांचा समावेश आहे. झोपेसाठी १ तास खर्च होण्याची दोन कारणे पहिले, झोप सगळ्यांनाच घ्यावी लागते आणि मोठी माणसे कमी झोपतात, तर लहान मुले १२ ते १६ तास झोपतात. त्यामुळे माणसांची सरासरी झोप नऊ तासांच्या पुढे गेली. माणूस दिवसाचा सरासरी एक तृतीयांश वेळ बोलणे चालणे, सार्वजनिक ठिकाणी घालवतो. त्याचे ४.६ तास वाचन, टीव्ही पाहणे, खेळ, मित्रमंडळी, कुटुंबीयांसोबत जातात. या वेळेत कुणी चित्रे रेखाटतात, संगीताचा रियाझ किंवा खेळांचा सराव करतात.
स्वयंपाक करणे व भोजन यासाठी जाणारा वेळ अडीच तास आहे. वैयक्तिक स्वच्छता, स्नान, कपडे व नटणे-मुरडणे यात १.१ तास जातो. धुणीभांडी, घर व अंगणाच्या साफसफाईसाठी ०.८ तास लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे नोकरी कामधंद्यासाठी सरासरी २.६ तास इतकाच वेळ दिला जातो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देश तरुण आहे, की वृद्ध यावर तिथला कार्यक्षम वयोगट ठरतो. भारतासारखे मोजके अपवाद वगळता जगातील अनेक देशांचे सरासरी वय खूप अधिक असल्याने कष्ट करणाऱ्यांची संख्याही कमी आहे. कुणी असा विचार करील, की नोकरी किंवा उपजीविकेच्या आधी शिक्षण, ज्ञानार्जन करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ दिला जात असेल. हा अंदाजही चुकीचा ठरला. जगभरातील माणसांचा शिक्षणासाठी दिला जाणारा सरासरी वेळ केवळ १.१ तास इतकाच आहे.
माणसाचे स्वतःचे घर, त्यासाठी सामानाची जुळवाजुळव, अशी अनेकांची मिळून घरबांधणी, गावे व शहरे विस्तारत जात असताना उभ्या राहणाऱ्या वसाहती, त्यांच्या अवतीभोवतीच्या पायाभूत सुविधा, रस्ते- रेल्वे- विमानतळ या वाहतुकीच्या साधनांचा विकास हे सारे किती अवाढव्य वाटते; पण त्यासाठी खर्च होणारे मानवी श्रमाचे तास मात्र खूपच किरकोळ आहेत. या सगळ्या कामांसाठी खर्च होणारा सरासरी वेळ घरादाराच्या साफसफाई इतकाच म्हणजे अवघा ०.८ तास आहे. याचा अर्थ असा नाही, जगभर या वेळांचे नियोजन समान आहे. जग सगळ्या प्रकारच्या विषमतेने व्यापले आहे. आर्थिक विषमता त्यात मुख्य. हा अभ्यास सांगतो, की पैशाच्या व्यवहारात श्रीमंत देशांमधील लोक गरीब देशांमधील लोकांपेक्षा तब्बल दीड तास अधिक घालवतात, तर त्याच श्रीमंत देशातील लोकांना अन्नधान्य पिकविण्यासाठी अवघी पाच मिनिटे लागतात. त्या तुलनेत गरीब, विकसनशील देशांमधील लोक शेतीवर अधिक अवलंबून असल्याने त्यांचा सरासरी एक तास शेतीच्या कामात खर्च होतो.