मानवच युगाचा निर्माता
By admin | Published: December 24, 2016 06:22 AM2016-12-24T06:22:38+5:302016-12-24T06:22:38+5:30
‘अर्थस्य पुरुषो दासो’ अर्थात माणूस हा पैशांचा दास आहे, हे कालातीत विधान प्राचीन ते अर्वाचीन सर्व काळाला लागू पडते. अधिकाधिक
‘अर्थस्य पुरुषो दासो’ अर्थात माणूस हा पैशांचा दास आहे, हे कालातीत विधान प्राचीन ते अर्वाचीन सर्व काळाला लागू पडते. अधिकाधिक पैसे कमावणे या सर्वाधिक महत्त्वाच्या वाटणाऱ्या एकमेव ध्येयाकडे धाव घेताना जीवनमूल्ये, संवेदनशीलता, सामाजिक भान सारेच मागे पडते आहे. खेळ, अवांतर वाचन व इतर छंद सारे वर्ज्य करून एका साचेबंद अर्थकेंद्री साच्यात पुढच्या पिढ्यांना बसवले जाते आहे. कौशल्ये, विज्ञान-तंत्रज्ञान याआधारे भौतिक प्रगती साधताना निव्वळ ग्राहक बनत जाणाऱ्यांनी सर्वसमावेशकता गमावली आहे.
भूदान चळवळीचे प्रणेते आणि थोर विचारवंत विनोबा भावे यांनी आजच्या समाजाविषयी जे आशावादी आणि सकारात्मक विचार मांडले आहेत त्याला खरोखर तोड नाही. विनोबा एका कथेत सांगतात की बुद्धकाळात म्हणजे अंदाजे तीन हजार वर्षांपूर्वी श्रावस्तीच्या लोकांनी गौतम बुद्धांना श्रावस्तीला आमंत्रित करण्याचे ठरविले. त्यांच्यासाठी शांत जागा हवी असल्याने एका जमीनदाराकडे जमिनीसाठी विनंती केली. जेवढ्या जमिनीवर सोन्याच्या मोहरा अंथराल तेवढी जमीन देईन असे त्या लोभी माणसाने सांगितले.
चालता बोलता विश्वकोश असणारे विनोबा म्हणाले की, भूदान यज्ञाच्या संदर्भात आजच्या कलियुगात मात्र विनोबा त्याच श्रावस्तीला पोहचले तेव्हा अत्यंत मूल्यवान अशी शंभर एकर जमीन त्याच गावातील लोकांनी त्यांना दान म्हणून दिली. या कथेचे सार सांगताना विनोबा म्हणतात की, युग आम्हाला आकार देत नसते तर समाजातलेच आपण सारे युगाला इष्ट आकार देऊ शकतो. ज्ञान आणि भावना यांचा मेळ, मिलाप, संगम झाला तर सुख साधनांच्या जोडीने समाधान मानवाला श्रेयस्कर दिशेने नेईल. १५ नोव्हेंबर १९८२ ला त्यांनी इच्छामरण स्वीकारले. मात्र त्यांचे विचार अक्षररूपाने आपणास चिरंतन दिशादर्शन करत असतात.
भूदान यज्ञासाठी विनोबांनी साडेतेरा वर्षे आसेतु-हिमाचल पदयात्रा केली. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रथम सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. त्यांच्या चळवळीला समकालीन असणारा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास समजून घेत डॉ. अनंत अडावदकर यांनी ‘विनोबा’ हा प्रबंधरूप ग्रंथ सिद्ध केला आहे. चरित्रात्मक कादंबऱ्यांचे कुशलपणे लेखन करणाऱ्या शुभांगी भडभडे यांनीही अत्यंत परिश्रमपूर्वक ‘भौमर्षी’ ही विनोबांच्या जीवनाचा आणि विचारांचा वेध घेणारी कादंबरी शब्दांकित केली आहे.
भौमर्षीनंतर ज्ञानेश्वर आणि आद्य शंकराचार्यांच्या जीवन आणि विचारांचा वेध घेताना शुभांगीतार्इंनी त्या त्या व्यक्तींच्या केवळ अक्षरार्थांचा वेध न घेता कथा-प्रवाहाच्या ओघात त्यांच्या विचारांचे सार उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जे दिव्य ते बघुनिया मज वेड लागे’ अशा मनोवृत्तीने या दोन्ही लेखकांनी सर्वसामान्य वाचकांपर्यंत विनोबांचे विचार प्रभावीपणे पोहोचवल्याचे जाणवते.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे