मनाचिये गुंथी - कट्टा

By admin | Published: January 9, 2017 12:34 AM2017-01-09T00:34:25+5:302017-01-09T00:34:25+5:30

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी.

Manchahee Gunthi - Katta | मनाचिये गुंथी - कट्टा

मनाचिये गुंथी - कट्टा

Next

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी. खूप प्रश्न पाडलेत या समाजाने. सभ्यता जागविलेला जमाव म्हणजे समाज किंवा संवेदना माळलेला जमाव, असेही म्हणता येईल. ठरावीक कारणाने जमतो तोही समाजच असतो. स्मशानात जमलेली माणसं त्या त्या जातीचा समाजच असतो. ज्ञानेश्वरांनी पसायदानात एक शब्द वापरला, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ही मांदियाळी सज्जन माणसांचा समुदायच असतो. वर्षानुवर्षे हे आपल्यावर संस्कारित झालंय. हा समाज ज्या एका जागेवर जमतो ते भले पटांगण असो, सभागृह असो, छोटा हॉल असो, लगेच त्या जागेला विचारांचे एक वेगळे वलय प्र्राप्त होते. पण जागा बदलली की हेतू बदलतात. उदा. पार्टीचं कार्यालय आणि कट्टा. कट्टा म्हटलं की सगळंच बदलतं. माणसांचा वयोगट बदलतो. विचार बदलतात. भाषा बदलते. एरवी जे असभ्य, अश्लील म्हणून डोळे मोठे करून बघितलं जातं ते एकदम रुटीनचं किंबहुना आवडीचं, नेहमीचं होतं. समाजात पडद्यामागील शब्द, भाषा, स्तर, संबंध एकदम मोकळे होतात. जात येते ती शिवी म्हणून. घर येतं ते बोअर कोंडवाडा म्हणून. आई-बाबा म्हातारी-बाप होतात. यार भंकस नुस्ती, पकवतात रे बोलून बोलून. हे बघा, कुठलीच भीडभाड न ठेवता बोललं पाहिजे. ही थिअरी आणि नियम इथले. इथली भाषा आणि चर्चा घरापर्यंत जाऊच द्यायची नाही. फळ चोरून खाल्ल्यानंतर कुणाला कळू नये म्हणून मुलगा तोंड स्वच्छ धुतो. पुसतो. हात धुतो घाईने चड्डीला पुसतो. पण नेमके होते काय की चड्डीला पुसलेले हात आईला कळतात. कारण ठराविक भागच ओला दिसतो. तसे काहीसे होते. चुकून मित्र घाईने घरी येतो. डोकं भेंगाळलेला, तो त्याच्या परवलीच्या भाषेत मित्राला हाक मारतो. शिवाय भ ची बाराखडी जोडूनच. आजोबा दारात येतात. मित्र बावरतो. क्षणभर त्याची बोबडी वळते. आपले संदर्भ ह्यांना कळले तर? आजोबा हसतात म्हणतात, ये बाळा आहे तो घरात! आजोबा एका हास्याने भाषा सुधारतात. खरं तर पुन्हा प्रश्न! आधीची मुलाची भाषा चांगली होती की आताची.
खरं तर दोन्ही एका गटाला संमत असलेले शब्द दुसऱ्या वयाला पचत नाहीत, पटत नाहीत, पण त्यांचा रोष उमटतही नाही. स्वीकारायला हवे, आजोबांचे सरोवर झालेले. त्यामुळे दगड टाकला की ढवळणारच सारे. पण तरण्या पोरांची खळखळ नाही. ते त्या वयाची भाषा बोलतात. राग, वैताग, विद्रोह आणि प्रेमही व्यक्त करतात. नकळत तो समाजच वेगळा होतो. मग आजोबाही उठतात. हातात काठी घेऊन त्यांच्या कट्ट्यावर येतात. त्यातल्या त्यात तरुण म्हाताऱ्याला डोळा मारतात. बायकोचा डोळा चुकवून थोडी मिठाई खाल्ल्याचे सांगतात. पलीकडे कट्ट्यावर वडापाव शिळा होता रे म्हणून घमासान शिव्यायुद्ध चालू असते. एकंदर समाजाचे दोन्ही घटकच! एक धट्टाकट्टा दुसरा मठ्ठाकट्टा!

किशोर पाठक

Web Title: Manchahee Gunthi - Katta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.