मनाचिये गुंथी - गाववाड्यातील लोकरंग
By admin | Published: March 30, 2017 12:41 AM2017-03-30T00:41:57+5:302017-03-30T00:41:57+5:30
भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे
भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे, तर दुसरीकडे मुक्त आनंदाचा लोकोत्सव म्हणून तो उत्साहात साजरा होतो आहे. उत्सवांचे नियोजनही ऋतुमानाप्रमाणे आणि निसर्ग घटकांच्या ऋतुचक्राप्रमाणे केले गेले आहे. चैत्रात वसंत ऋतू येतो तो चैतन्याची अनुभूती घेऊनच. या वसंत आगमनाच्या स्वागतासाठी ‘वसंत आगमनोत्सव’ म्हणून होळीचा सण साजरा होतो. या उत्सवाचे रूप पाहता हा सण मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असून, नंतर त्यात कालांतराने धार्मिक व सांस्कृतिक विधी विधानांची भर पडून त्याचे स्वरूप तयार झाले.
होलिकोत्सव म्हणजे होळी, धुलिकोत्सव म्हणजे धुळवड आणि रंगोत्सव म्हणजे रंगपंचमी. या तिन्हीचे एकत्रिकरण होऊन या लोकोत्सवाच्या अंगाने होळी पौर्णिमेपासूनच रंग, ढंग आणि शृंगाराची उधळण होते. शेतातले पीकपाणी घरी आलेले असते. गावगाड्यातील उरुस, जत्रांना सुरुवात होते. होळी पेटल्यानंतर तर मनसोक्तपणे बोंब मारायला पूर्ण मुभा असते. गंभीर तत्त्वज्ञान, सात्त्विक आदर्शवाद या साऱ्यांना क्षणभर बाजूला ठेवून एक वेगळीच धुंदी गावगाड्यात अवतरते. राजस वृत्तीचे सारे खेळ, लीला, क्रीडा याला उधाण येते. सर्वसामान्यांना स्वभावधर्म ओळखून मनात दाबून ठेवलेल्या शृंगारवृत्तीला मुक्तपणे शब्दातून व्यक्त करण्याचा जणू धार्मिक परवानाच शिमग्याच्या निमित्ताने या कालावधीत लोकांना मिळतो. विनोदी कार्यक्रमांद्वारा विडंबनात्मक अश्लील बोलण्यातून लोकांना हसविणारे ‘भाव’ हे याच काळात गावगाड्यात हिंडू लागतात. दरवेशी, कोल्हाटी, शकुनी, बहुरूपी, पिंगळे, पांगूळ, बाळसंतोष, सरवडा या साऱ्या लोकभूमिका गावगाड्यात येऊन आपल्या आगमनाने रंग भरवतात. त्यांच्या वर्षाच्या फेराचा डेकार त्यांना शेतकऱ्यांच्या खळ्यावर मिळे आणि मग तृप्त होऊन या लोकभूमिका आपल्या पारंपरिक लोककलांमधून लोकांना रिझवित नाथमहाराजांनी भागवतात या भांडांचा संदर्भ दिला आहे. ‘‘का भांडांचे तोंडी भंडपुराण। त्यावरी आला शिमग्याचा सण। मग करिता वाग्विटंबन। आवरी कवण तयासी।’’ शिमग्याच्या पंधरवड्यात वाग्विटंबनेपासून समाजाच्या विकृतींवर मार्मिक शैलीने आघात करणाऱ्या भांडाच्या भंडपुराणाला उधाण येत असे. त्याच काळात गावगाड्यात बारा बलुतेदारांचा तमाशा होत असे. गावच्या उत्पन्नातून ‘देकार’ नावाची देणगी या खेळ-तमाशासाठी बाजूला काढून ठेवली जायची. गावकीच्या तमाशात तेली, न्हावी, महार, कुंभार, मुलाणी, सुतार, गुरव, परीट हे सारे भाग घ्यायचे. गावचा ब्राह्मणही कवने करून द्यायचा आणि बारा बलुतेदारांच्या चावडीवर तमाशातून लोकरंजनाचे एक थिएटर उभे राहायचे. भक्तिरसात रमलेला गावगाड्यातला भोळा भाव तमाशाच्या शृंगारातही तितकाच रंगायचा. खेळ, सण, उत्सवांच्या माध्यमातून जीवनाच्या विविध रंगांची उधळण करणारी मुक्त समाजव्यवस्था इतरत्र कोठे आढळणार?
डॉ. रामचंद्र देखणे