मनाचिये गुंथी - स्वमग्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 12:15 AM2017-07-03T00:15:47+5:302017-07-03T00:15:47+5:30

आपण माणूस आहोत. माणसाचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेत. म्हणजे आपण खूप चांगले आणि वाईटही असतो. सध्या मोबाईलमधील ते

Manchiye Chanti - Selfishness | मनाचिये गुंथी - स्वमग्नता

मनाचिये गुंथी - स्वमग्नता

Next

- किशोर पाठक

आपण माणूस आहोत. माणसाचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेत. म्हणजे आपण खूप चांगले आणि वाईटही असतो. सध्या मोबाईलमधील ते व्हॉट््सप ग्रुप बोकाळलेत. काही त्याला नावं ठेवतात. काही न बोलता ग्रुपमध्ये सामील होतात. काही नावं ठेवत ठेवत कॉमेंट करतात. पण प्रत्येकाला हजेरी लावावी वाटते. म्हणजे मी आहे बुवा, जिवंत आहे हे सांगायला सगळे असतात. काहींना स्वत:चे मेसेज, जोक्स सांगावे वाटतात. काहींना दुसऱ्यांचे उतारेच्या उतारे द्यावे वाटतात. कवितांचा तर सुकाळच म्हणावा. एवढे कवी जन्मतात, मिरवतात, विझतात, पण उत्साह कमी होत नाही. काहींना स्क्रीन बघून बघून डोळ्यांचे विकार होतात. त्याला दूर जावे वाटते. हे वाटते खरे पण आपण अ‍ॅनिमिक झालेय. मोबअ‍ॅनिमिया नावाचा नवा आजार फैलावतोय. मग एकदा लाखो माणसं वापरताहेत म्हटल्यावर त्याचा व्यापार आला. हायजॅक करणं आलं. हँग होणं आलं. एकवेळ फासावर टांगा, पण मोबाईल चालू हवा. आपण त्या वाचून जगू शकत नाही. केवढा प्रचंड व्यवहार चालतो यात. हजारो कंपन्या, त्यांचे ब्रँड, जाहिराती सकाळचा मोबाईल दुपारी शिळा. २जी, ३जी, ४जी अजून किती जी होतील कठीण आहे. यात हजारो तरुणांना रोजगार मिळतो. स्क्रीनवर दु:ख, सुख, हास्य, गंभीर, बातम्या, गाणी, शेरोशायरीचा तर धुडगूस साऱ्या भावना नीट पोहोचतात. एक नक्की जग जवळ आलं, प्रगत झालं. पूर्वी परदेशात गेलेल्या मुलाला ठराविक वेळी, फोनजवळ बसून कमी वेळ बोलावं लागायचं. त्यात बाबा दरडावायचे, आई दृष्ट काढायची, ताई हट्ट करायची, पण हे सारं तेवढ्याच वेळात. मग फोन ठेवताच घरातच तू-तू-मैं-मैं. मला हे बोलायचं होतं राहून गेलं. माणसाला राहून गेल्याची चुटपुट जे केलं त्यापेक्षा जास्त लागते. म्हणजे अलीकडे तर ९८ टक्के मार्क मिळाले तर आईबाबा दोन टक्के कुठे गेले विचार करीत बसतात. म्हणून मोबाईल हे अस्त्र आहे ते द्या कुणाच्या हातात. ते शस्त्र होतं. मग स्क्रीनवर मेसेज सुरू. हे करू नका, ती साईट ओपन करू नका. आपण ज्ञानवृद्धीसाठी त्याचा किती वापर करतो ते महत्त्वाचे. पण माणूस आपल्या मूडप्रमाणे मोबाईल खेळवतो, मला खेळ हवा खेळ. मला गाणं हवं गाणं पण, आताशा मोबाईल खेळवतो आपल्याला. तो बंद स्क्रीन आपल्याला वाकुल्या दाखवतो. सलग दहा मिनिटं मी मोबाईल पाहिला नाही म्हणजे भयंकर गुन्हा झालाय, असा चेहरा होतो. एक विलक्षण स्वमग्नता आलीय या हत्याराने. माणूस एकटा कुणाशीही न बोलता स्क्रीनवर असतो. तो हळूहळू एकांतवासी होतोय, पण त्याला हे माहीत नाही तो स्क्रीनवरल्या कल्लोळात एकटा एकाकी होत चाललाय. तो इतरांना हाक मारताना स्वत:ला बोलवत नाही, ऐकत नाही हे वाईटच म्हणावे की चांगले, चला धावा नवा अ‍ॅप आलाय!

Web Title: Manchiye Chanti - Selfishness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.