मनाचिये गुंथी - नीरक्षीरविवेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2017 12:34 AM2017-04-01T00:34:46+5:302017-04-01T00:34:46+5:30

हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो

Manchiye Gonti - Neerakshireevivek | मनाचिये गुंथी - नीरक्षीरविवेक

मनाचिये गुंथी - नीरक्षीरविवेक

Next

 हंस श्वेतो बक श्वेतो।
को भेद: बकहंसयो:
नीरक्षीर विवेकेन।
हंसो हंस: बको बक:
हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो? दूध आणि पाणी यांना वेगळे करण्याची, निवड करण्याची क्षमता हंसात असते. बाह्याकाराने त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या बगळ्याजवळ निवडीची ही क्षमता, कुशलता नसते ‘चांचूचेनि सांडसे’ (चिमट्याने), खांडिजे (वेगळे करतो) पयपाणी राजहंसे (ज्ञाने ९.४४)
‘देखे ऐके, शिवे हुंगे। खाय, जाय, निजे, श्वसे। बोले, सोडी, धरी। वा पापणी हलवी जरी’ या सगळ्या मूलभूत क्रिया जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या कोणत्याही माणसात एकसारख्या असतात. मात्र नीरक्षीरविवेक, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, श्रेयस आणि प्रेयस यातून निवड करण्याची क्षमता आणि शहाणपण फार दुर्मीळ असते. ज्या माणसाजवळ विवेक असतो त्याची निर्णयशक्ती अचूक असते. राग-द्वेषाने, हा आपला तो परका या विचाराने, त्यांच्या निर्णय घेणाऱ्या बुद्धीवर कोणताही पडदा पडत नाही. कारण त्याची बुद्धी स्वच्छ आरशासारखी असते. ती प्रत्येक वस्तूचे खरेखुरे रूप प्रतिबिंबित करते. ‘शापिती ते आरशांना पाहुनि अपुल्या मुखाते’ अशी स्वत:च्या चुकांसाठी समर्थन किंवा सारवासारव त्यात नसते. सत्संगाने व्यक्तीचा विकास होतो; पण पूर्ण विकास होत नाही. सत्पुरुष आणि विवेकी यात अंतर असते. सत्पुरुषाच्या डोळ्यावर निळा चष्मा असतो त्यामुळे त्याला जगातले सारे चांगले दिसते. सत्पुरुष शुक्ल पक्षाकडेच आकर्षित होतो. दुर्जनांच्या डोळ्यावर काळा चष्मा असतो. त्यांना सर्व दोषास्पद दिसते. दोघांनाही जगाचे खरे स्वरूप कळत नाही. नीरक्षीरविवेकी या साऱ्या पलीकडे जात असतात. विवेकी तटस्थपणे विचार करून अचूक निर्णय देतो. तो द्रष्टा असल्याने भविष्याचे रूप जाणतो. कमाल पातळीवरचे त्याचे निर्णय व्यावहारिक पातळीवरही मानले जातात. त्यात एकांगीपणा नसतो. बाह्य संवेदना नसतात. इच्छा, आकांक्षा नसतात. कठोपनिषदातील मार्मिक रूपकात म्हटले आहे की इंद्र्रियरूपी घोड्यांना बुद्धीरूपी सारथी चालवतो. मनाचे लगाम, सारथी बुद्धीच्या हातीच असतात. नाहीतर इंद्रिये उधळून रथाला कुठे खेचून नेतील सांगणे कठीण आहे. बुद्धीची विलक्षण नेत्रदीपक झेप म्हणजे विज्ञान आणि कोमल भावनांमधून जिचे सृजन होते ती कला यांच्यात विरोध नाही. ते एकमेकांविरुद्ध ठाकले तर मात्र अनर्थ, संकटे, सर्वनाश ! सामंजस्य, समन्वय, नीरक्षीरविवेकच जगाला निरंतर, सुरक्षित ठेवू शकतो. ‘सलिली पय जैसे। एकले होऊन मीनले असे परि निवडुनी राजहंसे। वेगळे की जे’ (ज्ञाने अध्याय २-१२७)
 - डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -

 

Web Title: Manchiye Gonti - Neerakshireevivek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.