मनाचिये गुंथी - गुह्याय नम:
By admin | Published: May 31, 2017 12:20 AM2017-05-31T00:20:12+5:302017-05-31T00:20:12+5:30
संवादाला दोघे लागतात. सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. कोणी तरी ऐकून घ्यावे, समजून घ्यावे अशी मनोवस्था अनेकांची अनेकवेळा
संवादाला दोघे लागतात. सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. कोणी तरी ऐकून घ्यावे, समजून घ्यावे अशी मनोवस्था अनेकांची अनेकवेळा होते. केव्हा केव्हा नेमके उलटही होते. डोळ्यासमोर कोणी नको. आपला एकांतच बरा. एकांतात मन भरून येते आणि वाणी मौन धारण करते. संवादाला चटावलेले मन आत्मसंवाद साधू इच्छिते. यात नैराश्याचा भाव नसतो. बहिर्मुखी झालेली ज्ञानेंद्रिये अंतर्मुखी होऊन ‘स्व’चा शोध घेतात. अनाकलनीय निगूढ असे भावतरंग निर्माण होतात. जिवाला वेगळीच अनुभूती येते. खरे-खोटे, बरे-वाईट, कडू-गोड सारेच संपलेले असते. डोळे भरून येतात. हुंदके आवरेनासे होतात. काळ क्षणभर थांबल्याचा भास होतो. समाधिवस्था वेगळी काय असते? आचार्यांच्या भाषेत ‘अद्वैत अबुध्पते तदा’ असे काही बाही होऊन जाते. ही अवस्था आणता येत नाही ती आपोआप यावी लागते. हे परमगुह्य आई समजावून सांगता येत नाही. शब्दातून व्यक्त करता येत नाही. त्याला तुम्ही आत्मानुभूती म्हणा किंवा आणखी काही ते अतीत आणि अव्यक्तच राहिलेले बरे.
भगवंतानी गीतेच्या पंधराव्या अध्याय समाप्तीला ‘इति गुह्यतमं शास्त्र’ अर्जुना ! तुला हे गुह्य गुपितातील गुपित समजावतो आहे असे म्हटले आहे. गुह्य कोणालाही सांगता येत नाही. निष्पाप अर्जुन भगवंताचा भक्त आणि सखा आहे. म्हणून हा योग त्याला लाभला. सांगणारा नि ऐकणारा दोघेही तेवढेच महत्त्वाचे. ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ अशी सहजावस्था असावी लागते. बारा स्कंधाचे श्रीमद्भागवत पुराण केवढी अलौकिक साहित्यकृती. शुकदेवांनी शौनकांना ‘इति च परमगुह्यम् सर्व सिद्धान्तसिद्धम्’ - शौनका ! अनेक शास्त्रांचा अभ्यास करून हे परमगुह्य तुला सांगितले. गुह्य समजावून सांगण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहेत. ज्ञानदेवांची अवतारसमाप्ती झाली. महाराष्ट्रात ज्ञानदेवांची प्रतिमा मनामनात, घराघरांत पूजेला लागली. ‘प्रकट गुह्यची बोले’ हे आहेत ज्ञानदेवांच्या आरतीमधील शब्द. कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी गुह्य प्रकट केले. संन्याशाच्या पोराने भरभरून दिले. मनाला कोंभ फुटले. भक्तीचे बीज अंकुरले. वारकरी संप्रदायाची गुढी उभारली.
मुक्ताई ज्ञानदेवांपेक्षा चार वर्षांनी लहान; पण त्या योगिनीचा अधिकार तेवढाच मोठा. चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची आई होणे हे कर्तृत्व कोणत्या मापदंडाने मोजायचे? ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. मुक्ताई तर आकाशातच गुप्त झाली. तिच्या जाण्याने गुह्य अजूनपर्यंत कोणालाच आकळले नाही. नामदेवांना समाधीवर अभंगात लिहावे लागले.
- डॉ. गोविंद काळे -