मनाचिये गुंथी - निवड

By admin | Published: February 20, 2017 12:18 AM2017-02-20T00:18:28+5:302017-02-20T00:18:28+5:30

तुमची आवड काहीही असो तुमची निवड महत्त्वाची. आणि आवड असली तर सवड मिळतेच. सवड मिळाली तर चांगली निवडही

Manechee Gundi - Selection | मनाचिये गुंथी - निवड

मनाचिये गुंथी - निवड

Next

तुमची आवड काहीही असो तुमची निवड महत्त्वाची. आणि आवड असली तर सवड मिळतेच. सवड मिळाली तर चांगली निवडही करता येते. निवडणुका नुसता शब्द उच्चारला तरी गडबड, गोंधळ आणि थरार दिसू लागतो. त्यातून महापालिकेच्या निवडणुका तर अधिकच रंगतदार. बघा ना वॉर्ड, प्रभाग त्यात किती उमेदवार? मुख्य पक्षांचे, उपपक्षांचे आणि अपक्षांचे, बंडखोरांचे, फितुरांचे, अपमानितांचे आणि नुकतेच परगृही गेलेले. नुस्ता कल्ला ना! बरं! हेही ठरवून चालू. म्हणजे एका ठिकाणी एक पाय आणि दुसरीकडे दुसरा हा ठिकरीचा खेळ चालूच. त्यातून निष्ठा, द्रोह, मिलीजुली हे वेगळेच. माणसे पद्धतशीरपणे आपले पाय भिंगरीसारखे गरागरा फिरवीत राहतात आणि मतदार चक्रावतो. चुकीचे मतदान करतो. मतदान हा आपला हक्क! तो बजावायलाच हवा. स्वतंत्र भारताचे आपण स्वतंत्र नागरिक आहोत. हे सारे माणसांना माहीत असते. आपण बोटांना शाई लावून घेण्यापुरतेच हेही वाटत राहते. कुणी म्हणतात डोकं वापरा आणि ठरवा. कुणी म्हणतं डोकं बाजूला ठेवा, दादा, ताई, भाऊ, माई, दीदी, साहेब काय म्हणतात ते लक्षात ठेवा. गृहोपयोगी वस्तू जेव्हा चिन्हं होतात तेव्हा समजावे भांड्याला भांडं लागलं, आता उघडउघड रस्सीखेच, एकमेकांची उणीदुणी आणि इतके दिवस गुण्यागोविंदाने (?) एकत्र राहिलेले क्षणात एकमेकांचे कट्टर शत्रू होतात. सामान्य माणसाला बरे वाटते. अरेच्चा फक्त माझ्याच घरात भांडणं नाहीत, सर्वत्र हेच आहे. भाऊ- बहिणीला विचारत नाही, आई बापाला पोर विचारीत नाही. इतकंच काय नवरा बायकोला विचारीत नाही. आता संसार कसा चालायचा? पण चालतो. बरं यांच्या घोषणा तर ऐकाव्या, आश्वासनं ऐकावी, वाटतं सर्व उमेदवारांनी दिलेली आश्वासनं एकत्र करावी ती अलिबाबाला द्यावी. त्याने दिवा घासावा. राक्षस प्रकटावा आणि त्याला म्हणावं हे जे जे म्हणतात ते पूर्ण कर. आपला वॉर्ड, प्रभाग, गाव, शहर आणि देश एकदमच नंदनवन! सुखच सुख! एकही गरीब नाही, नळ गळत नाहीत, वीज जात नाही, इंधन फुकट की! सर्वांना सुबक घरे, प्रत्येकाला काम, भिकारी नाही, संघटना नाही, मोर्चे नाहीत, चोऱ्या नाहीत, दरोडे नाहीत, शस्त्र नाहीत, खून, बलात्कार नाहीत, पोलीसच नाहीत, कारण प्रत्येक जण सुरक्षित, वाहतुकीचे नियम पाळणारे, सर्व नाती सुरक्षित, वृद्धाश्रम बंद, कारागृह ओसाड, जेलची मंदिरं वाचनालयं झालेली, कॉलेजात फीच नाही, शिक्षण मोफत, सगळे एकमेकांचे, म्हणजे जात नाही, मग धर्म नाही, पंथ नाही, सगळी माणसं एकमेकांशी घट्ट बांधलेली. एकदम सुखाचा स्वर्गच... स्वप्नवत... उठा उठा! जागे व्हा! अरे हा एवढा गोंधळ कसला? हो हो! देतो ना सगळ्यांनाच मत देतो. अरेच्चा अलिबाबा गेला वाटतं! हं तेच म्हटलं, इतकं शांत का वाटत होतं? आता सवड संपली, आवड आठवा. निवड करा. आकाशाच्या प्रचंड पोकळीत गोेल गोल फिरण्यापेक्षा एकच ग्रह पकडून ठेवा. त्याची निवड आपल्या हातात. त्या ग्रहाचं नाव माणूस !
- किशोर पाठक

Web Title: Manechee Gundi - Selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.