मनाचिये गुंथी - ही वाट दूर जाते

By Admin | Published: January 11, 2017 12:23 AM2017-01-11T00:23:35+5:302017-01-11T00:23:35+5:30

चरैवेति-चरैवेति-चरैवेति। असा दिव्य संदेश मंत्रदृष्ट्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी दिला़ जन्मास आलेल्या प्रत्येकास

Manechiye ganthi - The distance will go away | मनाचिये गुंथी - ही वाट दूर जाते

मनाचिये गुंथी - ही वाट दूर जाते

googlenewsNext

चरैवेति-चरैवेति-चरैवेति।
असा दिव्य संदेश मंत्रदृष्ट्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी दिला़ जन्मास आलेल्या प्रत्येकास चालणे अनिवार्य ठरले. पायाने पांगळे असणारे सुद्धा कधी काठीचा तर कधी कुबडीचा आधार घेत चालू लागले़
चालणाऱ्यांच्या पायांना फुटतात नव्या वाटा़ कोणी कोणत्या वाटेवरून चालावे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य़ काही जवळच्या वाटा पसंत करतात तर काही दूरस्थ वाटा़ काही म्हणतात, जीवनाची वाट अजून गवसली नाही़
वाटेवरून चालताना काहींचे जीवन यशस्वी झाले ते वाटेवरचे आनंदयात्री ठरले़ काहीना फ ारच जड गेले़ वाटेवरून चालताना सारेच खडतर ठरले़ ‘अजुनी चालतोचि वाट’ संपता संपेना़ त्यांच्या आयुष्यात वाटा खडतर ठरल्या़ स्वप्नामधील गावांना ते पोहचलेच नाहीत, यात वाटांचा काय दोष, वाटचाल तर आपण करीत असतो़ वाटेला सगळेच सारखे. ती भेदाभेद करीत नाही़
वाटेवर चालणे अवघड होते तेव्हा मात्र कोणाला तरी शरण जावे लागते़ वाट चुकण्यापेक्षा मार्गदर्शक असलेला बरा़ हिताच्या वाटा दाखविणारे म्हणजे संत़ आयुष्याला दिशा दाखविणारी वाट तेच दाखवू शकतात़ ती वाट असते प्रेमाची- भक्तीची- श्रद्धेची़ समाधानाची आणि सुखाची सुद्धा़ त्याला पंढरीची वाट असेही म्हणतात़ याच वाटेवर सावळे परब्रह्म भेटते़ या वाटेवर चालणाऱ्या वृद्धाशी बोलण्याचा योग आला़
बाबा! तुमी कुण्या गावचे? बाबा म्हणाले- मुक्ताईच्या गावचे़ या वयात एवढ्या लांबून तेही चालत कशासाठी आलात? विठोबा तर सर्वत्र आहे़ सर्वव्यापी आहे़ मग हे चालत येण्याचे कष्ट कशासाठी? कोणी दाखविली ही वाट?
म्हाताऱ्याबुवाचे डोळे पाणावले़ मुक्ताईने मला ही वाट दाखविली़ १४०० वर्षे वयाच्या चांगदेवाची आई आमची मुक्ताई़ एवढे कर्तृत्व जगाच्या पाठीवर फक्त मुक्ताईचेच आहे़ योगीराज चांगदेव पंधरा वर्षांच्या कुमारीकेच्या चरणावर डोके टेकवून शरण गेला़ ती मुक्ताई एकदा स्वप्नात आली म्हणाली- पंढरीच्या वाटेवर चाल. येतो गेली २५ वर्षे चालत़ मी तुमच्यासारखा शिकला सवरलेला नाही पण जीवाला लई सुख भेटतं़
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला़ या अडाण्याला सुख गवसलं होतं़ सुखाची वाट सापडली होती़ ‘लई सुख भेटतं’ संत साहित्याचे सगळे सार तीन शब्दात सांगून तो मोकळा झाला होता़ माझा मित्र शेजारीच उभा होता़ तो म्हणाला सुख म्हणजे काय? त्याची प्रथम व्याख्या केली पाहिजे़ त्या बुद्धिवादी मित्राची पाठ थोपटून म्हणालो- चल चहा घेऊ या़ गरमागरम चहाचे घुटके घशाखाली घालताना तो म्हणत होता’ सुख वाटे जीवा़
दोघांनाही सुख गवसलं होतं़ एवढे मात्र खरे की म्हाताऱ्याच्या सुखात आणि माझ्या बुद्धिवादी मित्राच्या सुखकल्पनेत जमीन अस्मानाचं अंतर होतं़

डॉ. गोविंद काळे

Web Title: Manechiye ganthi - The distance will go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.