मनाचिये गुंथी - ... कधी होशिल माणूस

By admin | Published: July 8, 2017 12:14 AM2017-07-08T00:14:09+5:302017-07-08T00:14:09+5:30

माणसाच्या मनाचा थांगा लागत नाही. ते अथांग सागरासमान गहन, गूढ आहे. खूप खोल असून

Manechiye ganthi - ... ever sensible man | मनाचिये गुंथी - ... कधी होशिल माणूस

मनाचिये गुंथी - ... कधी होशिल माणूस

Next

- कौमुदी गोडबोले 
माणसाच्या मनाचा थांगा लागत नाही. ते अथांग सागरासमान गहन, गूढ आहे. खूप खोल असून त्याचा तळ गाठणं कठीण! अत्यंत चपळ, चंचलदेखील आहे. वाऱ्याचा वेग कमी पडेल इतकं वेगवान आहे. क्षणात आकाशात झेपावतं तर क्षणात जमिनीवर सैर करतं. स्वैरपणानं सैर करणारं मन स्वच्छंदी असतं. आपल्या नादात गिरक्या घेत जातं. आजूबाजूच्या परिसराचा विसर पडून आत्ममग्न होतं. कधी खळखळून हसतं तर कधी खळखळाट करणाऱ्या निर्झरासमान पुढे पुढे झेपावतं! निरागस बालकासमान निर्व्याज होऊन आनंद लुटतं. निराशेला सहजपणानं दूर लोटतं.
मनाच्या किती विविध छटा अनुभवायला मिळतात. त्याचे रंग कधी आकर्षक तर कधी भडक! कधी सौम्य आल्हाददायक तर कधी उग्र नको वाटणाऱ्या रंगछटा! रंगांची दुनिया जादूभरी तशीच मनाची दुनिया अनोखी! मन कळायला सोपं आहे का? अत्यंत गुंतागुंतीचं असल्यामुळे समजायला अवघड आहे. ते कशात ... कधी... कसं अडकेल ... गुंतेल त्याचा काही नेम नाही. वस्तूंमध्ये ... माणसांमध्ये... नात्यांमध्ये ते गुंतून जातं. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या मागे मागे जातं. त्याच्या प्राप्तीसाठी तळमळतं. घडणाऱ्या घटनांमध्ये सदैव अडकून राहतं. भ्रमर जसा कमळामध्ये अडकतो ना! माणसाच्या मनाची अवस्था भ्रमरासमान होऊन ते विषयांमध्ये बंदिस्त होऊन जातं.
अस्वस्थ, अस्थिर, अशांत मनाची अवस्था मोठी कठीण आणि केविलवाणी होऊन जाते. कलियुगामध्ये याचा उच्चांक गाठलेला दिसतो. शिक्षण आणि संस्काराचा संबंध संपल्यापासून मनं सैरभैर न झाली तर नवल? ते भलतीकडे भरकटत जातं. स्वत:बरोबर समाजाला त्रस्त करतं. वासनांचा भडका उडून विकृती जन्म घेते. शिक्षणातल्या गुणांचा जीवन जगताना, माणूसपण जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी उपयोग होताना दृष्टीस पडत नाही. बहिणाबाई चौधरी लिहितात
अरे माणसा माणसा कधी होशिल माणूस?
ही ओळ आजच्या काळातील माणसाच्या मनाची अधोगती अधोरेखित करणारी आहे. अशा माणसांच्या मनाला सुयोग्य वळण लागण्यासाठी सात्विकतेची गरज आहे.
नको त्या स्थानी... नको त्या भावनेत गुंतल्यानं त्याची फार गुंतागुंत होऊन जाते. मनाचा गुंता हळूवारपणानं सोडवायचा असतो. शब्द, शस्त्र यांचा वापर त्यासाठी केला तर जखमा होण्याची दाट शक्यता! शरीराच्या जखमा लवकर भरून येतात परंतु मनाच्या जखमा भरून येणं कठीण! स्नेहाचं सुंदर मलम लावून प्रेमाची पट्टी लावली की मनाच्या जखमा भरून यायला साह्य होतं. हे अमूल्य कामं असहृदयी, संयमी, सोशिक संत करीत असतात.

Web Title: Manechiye ganthi - ... ever sensible man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.