मनाचिये गुंथी - राजहंस माझा निजला
By Admin | Published: February 18, 2017 12:30 AM2017-02-18T00:30:12+5:302017-02-18T00:30:12+5:30
कविता, नाटक आणि विनोद या तिन्ही क्षेत्रात सारख्याच वैभवाने तळपणारे राम गणेश गडकरी म्हणजेच भाषाप्रभू गोविंदाग्रज. जेव्हा ते गिरगावच्या
कविता, नाटक आणि विनोद या तिन्ही क्षेत्रात सारख्याच वैभवाने तळपणारे राम गणेश गडकरी म्हणजेच भाषाप्रभू गोविंदाग्रज. जेव्हा ते गिरगावच्या बनाम हॉल लेनमध्ये कृष्णाबाई इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते तेव्हा एकदा जवळच्या वाडीत एका तान्ह्या बाळाच्या मृत्यूचा प्रसंग त्यांनी नुकताच पाहिला होता. बाळाची नुकतीच बाळंत झालेली पोरवयाची आई, मांडीवरच्या मृत बाळाला उचलू देत नव्हती.
‘नुकतेच दूध प्यायलेल्या माझ्या बाळाचा आता कुठे डोळा लागला आहे. तुमच्या गलबल्यानेच कशाला, पायरवाने तो उठेल. तुम्ही म्हणता तसे काही अशुभ घडले असले तरी ज्याला मऊ पाळणा टोचतो त्याचा कोमल देह तुम्ही खाचखळग्यात ठेवणार ही कल्पनाही मला सहन होत नाही. कारण ‘राजहंस माझा निजला’ या जिवाचा ठाव घेणाऱ्या कवितेविषयी गोविंदाग्रज म्हणतात -‘आईच्या प्रत्येक बाळाला, प्रेमाच्या गावात घडलेल्या या करुण प्रसंगाचे मर्म कळेल !’ गडकऱ्यांच्या नाट्यप्रतिभेची जात शेक्सपिअरची होती असे म्हटले जाते, ते अगदी यथार्थ असल्याचा प्रत्यय या कवितेने येतो. हृदयाला पीळ पाडणारा करुण रस, पराकाष्ठेचा विनोद आणि चकित करणारी कल्पकता याचा विलक्षण समन्वय असणाऱ्या गोविंदाग्रजांची ‘राजहंस माझा निजला’ ही शोकरसपूर्ण कविता १९१२ला मनोरंजनमधून प्रसिद्ध झाली. कुसुमावतीबाई देशपांडेंनी ‘पासंग’ (पृ २३) मध्ये नमूद केले आहे की ‘ज्याच्या त्याच्या तोंडी ही कविता असे. घरी-दारी-शाळेत या कवितेचे गुणगुणणे चाले. गोविंदाग्रजांच्या कवितेच्या लोकप्रियतेने काव्यगायनाच्या प्रथेला कितीतरी चालना दिली.’ याच करुणरम्य भावकवितेला मराठीतील पहिल्या ध्वनिमुद्रित कवितेचा मान प्राप्त होतो. विनायक जोशी यांनी (एका दैनिकाच्या) रविवार पुरवणीत स्वरभावयात्रा सदरातील अभ्यासपूर्ण लेखात ही माहिती दिली आहे. त्या काळात रंगभूमी गाजवणारे ललित कलादर्श नाट्यसंस्थेचे नायक, अभिनेते व्यंकटेश बळवंत पेंढारकर यांच्या आवाजात ही ध्वनिमुद्रिका सिद्ध झाली. रंगभूमीवर नाट्यसंगीत गायनाने त्यांनी स्वत:चे युग निर्माण केले होते म्हणतात. मूळ १८ कडवी असणाऱ्या या कवितेतील निवडक अंशच ध्वनिमुद्रिकेसाठी घेतले असावेत.
गडद करुण भाव असणारे हे मराठीतील पहिले भावगीत ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते. ध्वनिमुद्रिकांचा संग्रह करणाऱ्या एचएमव्हीची रेकॉर्ड अजूनही असल्याचे लेखकाने नोंदवले हे मराठी रसिकांना अमोल वाटते. प्रतिभेचा स्पर्श
लाभलेले नादमधुर शब्द, भावपूर्ण आशय, संगीतकाराची स्वरयोजना, गायकाचे सूर यामुळे ‘राजहंस माझा निजला’ हे मराठीतील पहिले ध्वनिमुद्रित भावगीत कालजीवी ठरेल यात शंका नाही.
डॉ. सौ. प्रज्ञा आपटे