मनाचिये गुंथी - संपूर्ण व्यक्तिमत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 12:08 AM2017-02-21T00:08:48+5:302017-02-21T00:08:48+5:30
मानवाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या अस्तित्वाची आधारशीला असते. मानवाच्या संपूर्ण जीवनाची प्रगती तसेच अधोगती त्याच्या
मानवाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या अस्तित्वाची आधारशीला असते. मानवाच्या संपूर्ण जीवनाची प्रगती तसेच अधोगती त्याच्या व्यक्तिमत्त्वावरच अवलंबून असते. यामुळेच ‘व्यक्त्तिमत्त्व विकास’ एक अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्र म्हणून विकसित झाले आहे.
व्यक्तिमत्त्वाची व्याख्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. आधुनिक मनोविज्ञानाने व्यक्तिमत्त्व म्हणजे विचार, वाणी आणि कर्म यांचा संपूर्ण जमाखर्च आहे असे म्हटलेले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात तसेच योग शास्त्रामध्ये व्यक्तिमत्त्वाची स्पष्ट व्याख्या दिलेली आहे. उपनिषदामध्ये पंचकोशांचे वर्णन केलेले आहे. हे पाच कोश म्हणजेच - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय. अन्नमय कोश म्हणजेच आपले शरीर. ते अन्नापासून तयार झाले आहे. या कोशापेक्षा सूक्ष्म कोश प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे आपली ऊर्जा होय, जी आपल्याला पूर्णपणे संचलित करते. प्राणमय कोशापेक्षाही सूक्ष्म कोश मनोमय कोश आहे. मनोमय कोश आपल्या अनंत मनाचा विस्तार आहे. त्यापेक्षाही सूक्ष्म कोश म्हणजे विज्ञानमय कोश. जे आपल्या चेतनेशी संबंधित आहे. या चारही कोशापेक्षा सर्वांत सूक्ष्म कोश आहे आनंदमय कोश. हे आनंदमय कोश म्हणजेच मानवाचा मूळ स्वभाव होय आणि त्याला प्राप्त करण्यासाठी माणूस अनेक प्रकारचे कर्म करतो. हे पाच कोशच आपले व्यक्तिमत्त्व तयार करते. आपले शरीर या व्यक्तिमत्त्वाचा पहिला भाग आहे. अर्थात त्यामुळेच त्याला स्वच्छ व स्वस्थ ठेवण्याबाबत बोलले जाते. आयुर्वेदामध्ये शरीराचे स्वास्थ्य कसे सुरक्षित ठेवले पाहिजे याबाबत उपाय सांगितलेले आहेत. योगशास्त्रात अन्नमय कोशाला व्यवस्थित ठेवण्यासाठी आसनाचे तर प्राणायम कोशाला व्यवस्थित ठेवण्यासाठी प्राणायम करण्याबाबत सांगितले आहे. मनाच्या वृत्तीला नियंत्रित करण्यासाठी योगाचा पर्याय सुचविला आहे. त्याशिवाय काही वेगळ्या योगाची चर्चा आहे जे आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतात. या पाच कोशाचे वर्णन भारतीय वैचारिक तथा दार्शनिक चिंतनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे पाच कोश एकमेकांपासून वेगळे न होता परस्पर अनन्य रूपात जोडलेले असतात. एक कोश दुसऱ्या कोशाला प्रभावित करतो. ज्याप्रमाणे समुद्रात उसळलेली लाट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाते, त्याचप्रमाणे एका कोशामार्फत होणारी क्रिया दुसऱ्या कोशापर्यंत पोहोचते. पूर्ण व्यक्तिमत्त्व त्यालाच प्राप्त होते, ज्याचे सर्व कोश विकसित व संतुलित आहेत. यासाठी भारतीय परंपरेत अनेक मार्ग सांगितलेले आहेत. या मार्गांना आपण ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोगाच्या श्रेणीत ठेवूशकतो.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय