मनाचिये गुंथी - संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:16 AM2017-07-24T00:16:56+5:302017-07-24T00:16:56+5:30

अंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं.

Manechiye Gunthi - Confusion | मनाचिये गुंथी - संभ्रम

मनाचिये गुंथी - संभ्रम

googlenewsNext

किशोर पाठक

अंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं. किंबहुना आपण कोण याचाही अशावेळी अंदाज घ्यावा लागतो. आपण शोधत असतो आपल्यालाच कळत नाही आपण आपण आहोत की अजून कोणी? असं निरर्थक होत जाणं म्हणजे स्वत:ला दिशांच्या स्वाधीन करणं. मग वारा वाहील तसा आपला प्रवास आणि आपण या सर्वात अनोळखी होत जातो स्वत: मग शोधूही लागतो आपल्यालाच. हा शोध विलक्षण असतो. आपण हरवलोत की नाही माहीत नाही. पण आपण आपल्याला सापडत नाही. अखंड शोध चालू असतो. वाटतं की हेच आहोत आपण, पण आपण ते नसतो आणि आपण जे असतो त्यावर विश्वास बसत नाही. आपण तेच आहोत असं जरी कुणी म्हटलं तरी ते खरं वाटत नाही. पुन्हा खरं काय त्याचाही अदमास लागत नाही. ज्याला आपण खरं मानतो त्याला पूर्ण असत्य कुणीतरी म्हणतं. मग खरं काय? हा खऱ्याचा प्रवास खरं तर खडतरच. कारण गवसलेले सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही आणि असलेल्याचा आपला सातत्याने नकार म्हणूनच आपण ते नाकारतो आणि जे पूर्ण नाकारतो तेच सत्य म्हणून समोर दत्त म्हणून उभं राहतं. आता असा संभ्रम पोकळ अवस्था मनाची होतेच तेव्हा आपण कुठल्या पर्वातून जात असतो? म्हणजे प्रत्येक वयात असे संभ्रम आपल्याला भेडसावतात. लहानपणी आपल्याला गरम तव्याला, ज्योतीला हात लावावासा वाटतो. आई बाबा नाही म्हणतात. वर्गात आपली गृहितके सर नामंजूर करतात. त्यांच्या पद्धतीने विचार करावा लागतो. तरुणपणी एखादीबद्दल आकर्षण वाटते ती आपली पत्नी होऊ शकत नाही. एक मित्र म्हणाला, अति सुंदर स्त्री मला पत्नी म्हणून नको. का तर मला न्यूनगंड येईल. पण असा न्यूनगंड स्त्रियांना येत नाही? एखाद्या अतिशय नाजूक तरुणीला जाडाभरडा, काळा कुळकुळीत धिप्पाड नवरा मिळतो तेव्हा तिला काय वाटत असेल म्हणजे आपण पूर्ण मनाचं, मनासारखं वागू शकत नाही म्हणजे आपल्यावर कुणी बळजबरी केलीच असते असे नाही पण नाही आपण काही करू शकत. चांगला विचार डोक्यात घुसला की पक्का जाऊन बसतो. त्याचा राग येत नाही. आपण त्याचा विचार करतो. संभ्रमाची अवस्था दूर जाऊ लागते. खरंतर संभ्रम काही क्षण का होईना दूर गेलेले असतात आणि नवे संभ्रम निर्माण होण्यापूर्वीचा स्वच्छ प्रकाश असतो तो. ज्यात नक्की चांगलंच वाटतं. कारण संभ्रम नसतात, नवे नसतात आणि जुने संपलेले असतात.

Web Title: Manechiye Gunthi - Confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.