मनाचिये गुंथी - दैवी संपदा

By admin | Published: July 4, 2017 12:18 AM2017-07-04T00:18:06+5:302017-07-04T00:18:06+5:30

जेव्हा आपण जीवाच्या उत्पत्तीच्या सिद्धांताचा अभ्यास करतो, त्यावेळी एक बाब प्रकर्षाने दिसून येते की जीवाचा विकास हळूहळू खालून वर झालेला आहे.

Manechiye Gunthi - Divine Property | मनाचिये गुंथी - दैवी संपदा

मनाचिये गुंथी - दैवी संपदा

Next

- डॉ. भूषणकुमार उपाध्याय 
जेव्हा आपण जीवाच्या उत्पत्तीच्या सिद्धांताचा अभ्यास करतो, त्यावेळी एक बाब प्रकर्षाने दिसून येते की जीवाचा विकास हळूहळू खालून वर झालेला आहे. त्यालाच उत्क्रांती सुद्धा म्हटले जाते. या सिद्धांताचे जनक डार्विन आहेत, ज्यांनी अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला.
डार्विन यांनी उत्क्रांतीचा जो सिद्धांत प्रतिपादित केला आहे, त्याच्याशी मिळता जुळता सिद्धांत अत्यंत प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्या सिद्धांताचे नाव आहे, ‘अवताराची कल्पना’. या सिद्धांतानुसार देव, प्रथम मत्स्य, द्वितीय कच्छ, तृतीय वराह, चतुर्थ नृसिंह, पंचम वामन, षष्ठ परशुराम, सप्तम राम व अष्टम कृष्ण इ. रूपात अवतारित झालेले आहेत. जेव्हा आपण या अवताराचे विश्लेषण करतो, तेव्हा असे आढळते की जीवाची निर्मिती सर्वात प्रथम पाण्यात झालेली आहे. त्यानंतर विकसित होऊन तो पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहायला लागला. त्यानंतर क्रमश: विकसित होताना पूर्णावतार भगवान श्रीकृष्णापर्यंत आला. त्या पाठोपाठ आलेले अवतार पहिल्या अवतारापेक्षा जास्त विकसित व बलवान होते. डार्विन यांनीही आपल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतात हीच बाब सांगितलेली आहे.
जीव जस-जसा वाढत गेला तस-तसे त्याचे गुणही वाढत गेले व तो अत्याधुनिक व सुसंस्कृत होत गेला. परंतु भारतीय मान्यतेनुसार जेव्हा उत्क्रांती होते तेव्हा अवक्रांती सुद्धा होते. म्हणजेच जीवाचे पतन सुद्धा होते. जर जीव चांगल्या मार्गावर नाही चालला तर तो अधोगतीला प्राप्त होतो. हाच जीव उत्तरोत्तर जेव्हा चांगल्या मार्गावर चालतो, तेव्हा शेवटी त्याला जे गुण प्राप्त होतात, त्यालाच ‘दैवी संपदा’ असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवद गीतेत या दैवी गुणांचे वर्णन केले आहे. त्यांनी गीतेच्या सोळाव्या अध्यायात या दैवी व असुरी गुणांचे वर्णन केले आहे. जवळजवळ २६ दैवी गुणांची गणना श्रीमद् भगवद गीतेत आलेली आहे. या सर्व दैवी गुणांमधला पहिला गुण, जो भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितला तो म्हणजे ‘अभय’.
अभय मानवाच्या सर्वोच्च प्रगतीची परिसीमा होय. पूर्णत्वाला प्राप्त करणारा व्यक्ति पूर्णत: भयरहित झालेला असतो. अभय अशी अवस्था आहे, जेव्हा मानव पूर्णत: नि:स्वार्थ व त्यागवृत्तीने काम करतो. यामुळेच संत महात्मा पूर्णत: अभयाला प्राप्त करतात. मृत्यूचे भय हे या विश्वातील सर्वात मोठे भय होय. परंतु मृत्यूचे हे भय संत महात्म्यांना जरासुद्धा व्यथित करीत नाही. इतिहासात असे बरेचशी उदाहरणे पाहायला मिळतात, जिथे सत्पुरुषांनी हसत-हसत मृत्यूचा स्वीकार केलेला आहे. त्यांना जरासुद्धा वेदना झाल्या नाहीत. योगशास्त्रानुसार अभयाची ही अवस्था गहन साधनेने प्राप्त होते. गहन साधनेमुळे मानवाची चेतना पूर्णत: शुद्ध होऊन पूर्ण ब्रह्मांडासोबत एक होते व मानव एक व्यक्ती न राहता सर्वसमावेशक बनतो.
 

Web Title: Manechiye Gunthi - Divine Property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.