मनाचिये गुंथी - हा प्रवास सुंदर आहे
By admin | Published: March 31, 2017 12:17 AM2017-03-31T00:17:03+5:302017-03-31T00:17:12+5:30
प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते
प्रत्येक माणसाला मुक्कामाची ओढ असते. तिथे पोहोचल्यावर काय काय करायचे हे त्याने आधीच ठरवून ठेवलेले असते. त्यासाठी तो अनेक स्वप्नेही रंगवत असतो. पण मुक्काम या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न त्याने कधी केलेला असतो काय? माणसाच्या जीवनाचा प्रवास खरे तर निरंतर सुरू असतो. तो कधी संपत नाही की पूर्ण होत नाही. मग मुक्काम
या शब्दाला खरोखरच काय अर्थ राहिला?
आपल्याला वाटते की आपण एखाद्या ठिकाणी थांबतो, मुक्काम करतो, विश्रांती घेतो; पण तो मुक्काम नसतोच, ती असते पुढच्या प्रवासाची तयारी. ते असते जीवनाच्या प्रदीर्घ प्रवासाचेच एक दुसरे रूप. पण आपल्या ते लक्षातच येत नाही. या विश्वाच्या पसाऱ्याला ब्रह्मांड असे म्हणतात. ब्रह्मांड गोलाकार असते, ते कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे सांगता येत नाही तसेच आयुष्याच्या प्रवासाचे असते. तो प्रवास कुठून सुरू होणार, कुठे घेऊन जाणार आणि कुठे संपणार, हे कुणालाच माहीत नसते. जसजसे पुढे जावे तसतसे क्षितिजही पुढे पुढे सरकत राहावे तसाच हा प्रकार असतो. अजून थोडा प्रवास बाकी आहे, अजून थोडा, अजून थोडा.. असे म्हणता म्हणता माणसे थकून जातात. मुक्कामी पोहोचल्यावर आराम करू, खाऊ-पिऊ, आनंदात राहू, मौजमजा करू, असे त्यांनी ठरवलेले असते. पण आपल्या या प्रवासात खऱ्या अर्थाने मुक्काम नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आनंदाने जगण्याचे, जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचे स्वप्न आपण पुढे पुढे ढकलत आहोत हे त्यांना कळत नाही. मुक्कामी पोहोचल्यावर आनंदाने जगू असे म्हणण्याचा वेडेपणा करत बसण्यापेक्षा प्रवास सुरू असताना, या प्रवासातच आपण आनंदाचा उत्सव साजरा करू, आपली स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करू, असे ते का ठरवत नाहीत? असे म्हणण्यातच माणसाचे खरे शहाणपण आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही? यश प्रवासाच्या शेवटी नसते, आनंद प्रवासाच्या शेवटी नसतो, समाधान प्रवासाच्या शेवटी नसते, विश्रांती प्रवासाच्या शेवटी नसते, कारण शेवट ही गोष्टच अस्तित्वात नाही. जो काही असतो, तो प्रवास ! शेवट भ्रामक तर, प्रवास हे वास्तव असते. त्यामुळे जे काही समाधान, आनंद, यश, विश्रांती मिळवायची आहे ती या प्रवासातच शोधली पाहिजे, प्रवास करतानाच ती मिळवली पाहिजे. त्यातच माणसाचे मोठेपण दडलेले आहे. हे एकदा माणसाच्या लक्षात आले की मग त्याचा सारा प्रवासच आनंदमय होऊन जाईल यात काय शंका? इतकेच काय, तर नंतरच्या त्या अज्ञात प्रवासासाठीसुद्धा त्याच्या ठायी एक आनंददायी उत्सुकताच जन्माला येऊ लागेल आणि तोच खरा मोक्ष नाही काय?
- प्रल्हाद जाधव -