मनाचिये गुंथी - जे खळांची !

By admin | Published: March 27, 2017 12:20 AM2017-03-27T00:20:13+5:302017-03-27T00:20:13+5:30

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता

Maneethee Gundali - Jats! | मनाचिये गुंथी - जे खळांची !

मनाचिये गुंथी - जे खळांची !

Next

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता. सध्याचा कालखंड हा गीता अभ्यासावी असाच आहे. गीतेचा भावानुवाद ज्ञानेश्वरांनी केला. तो करताना ज्ञानदेवांनी गीता फुलवली. पण ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्ण यात फरक म्हटलाच तर कृतीचा आहे. कृष्ण म्हणतो ‘ततो युद्धाय युज्यस्व’! युद्ध कर ‘हतो वा प्राप्तसी स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम्’। म्हणजे मार किंवा मर । त्याला माणसाच्या अस्तित्वावर शंका आहे. पण ज्ञानेश्वर तसे करीत नाहीत. त्यांचे अमर महाकाव्य ‘पसायदान’ यात ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीरति वाढो ।। आणि दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।। म्हणजे ज्ञानदेव जिंकण्यासाठी युद्ध कर म्हणत नाहीत. म्हणजे दृष्ट झाला तरी त्याला जवळ करून त्याची दृष्टता दूर कर, त्याची सत्कार्यात गती वाढव, तिथे मैत्र जिवांचे महत्त्वाचे. म्हणून तर दुरितांमधला अंधकार दूर व्हावा. विश्वाने स्वधर्माचा सूर्य पहावा हा स्वधर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, इस्लाम नाही. हा स्वत:चा धर्म जो सूर्य पाहतो. म्हणजे माणसाला मारून तू राजा झालास तर ते राज्य तुला लाभणार नाही. त्यापेक्षा माणसातील माणूसपण जागं करणं महत्त्वाचं आहे ! सर्व संतांचं आयुष्य हे दुरित नष्ट करण्याचं आहे. ज्ञानदेवांनी कुणाही दृष्टाला मारून टाका म्हटलं नाही. माणसातलं वाईटपण दूर करा. माणूस वाईट नसतोच. त्याची एखादी कृती त्याला क्रूर, गुन्हेगार बनवते. तो क्षण टाळायला हवा. हे टाळण्याचं अनुसंधान संत असतात. म्हणून संतांची संगती हवी ! आपण माणसाला बदलू शकत नाही, त्याला आहे तसा सर्व गुणदोषांसकट सांभाळणे, स्वीकारणे, बदलवणे हेच आपल्या हातात. मला याबाबत बिभीषण महत्त्वाचा वाटतो. महाबलाढ्य रावणाशी संयमाने, विचाराने बोलणारा बिभीषण खूप वेगळा वाटतो. समाजात असे खूप बिभीषण असतात. त्यांना रावणांना बदलायचं असतं. पण ते बदलत नाहीत. ते आपलाच शेवट करून घेतात. तो शेवटही साधा नसतो. ती सुरुवातही साधी नसते. ही व्यंकटी सांडणं सोपं नाही. भल्याभल्यांना ते जमत नाही. जमलं नाही म्हणून तर आपल्याकडे रामायण, महाभारत ही केवळ आर्ष महाकाव्य नाहीत तर तो एक वाक्प्रचार आहे. ‘तुला हे महाभारत माहीत नाही’, हे म्हणताना खूप काही घडलेलं असतं. म्हणजे महाभारत वेगळेच, पण ते आयुष्याचे होते. आपण कसे असतो आणि कसे असावे यातील अंतर म्हणजे जगणे असते. हा मधला मजकूर वाचता यायला हवा. आपण म्हणतो खरे की मी असा, तसा पण तुकाराम म्हणतात तसा अनुभव प्रमाण असतो. बघा ना, ज्ञानेश्वरांनी तारुण्याच्या उंबरठ्यावरच जगाचा निरोप घेतला, तुकाराम संसार करीत जगला म्हणजे संसार केला पेक्षा झाला म्हणावा, पण दोघांनी जगाचे तत्त्वज्ञान मांडले. हे तत्त्वज्ञानच पसायदानात सार रूपाने आहे. या ओळीच्या आशेवरच सगळे सुजन माणसं वाईटाचं वाईटपण नष्ट होईलच असं समजून जगत असतात. आपणही या ओवीला सांभाळू या !

किशोर पाठक

Web Title: Maneethee Gundali - Jats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.