मनमोहन सिंग यांची दिलदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 11:51 PM2017-01-19T23:51:11+5:302017-01-19T23:51:11+5:30

मोठेपण अंगभूतच असावे लागते. त्याचा आव आणता येत नाही आणि त्याचे खरेपण लपूनही राहत नाही.

Manmohan Singh's Dilrari | मनमोहन सिंग यांची दिलदारी

मनमोहन सिंग यांची दिलदारी

Next


मोठेपण अंगभूतच असावे लागते. त्याचा आव आणता येत नाही आणि त्याचे खरेपण लपूनही राहत नाही. डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेच्या चौकशी समितीसमोर साक्ष द्यायला आलेले रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांना त्यांच्या होत असलेल्या कोंडीतून जे सावरले तो त्यांच्या याच अंगभूत मोठेपणाचा पुरावा आहे. डॉ. सिंग हे स्वत: रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर राहिले आहेत. त्या बँकेची स्वायत्तता आणि प्रतिष्ठा त्यांनी आपल्या काळात उंचावली आहे. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचे व तिच्या वाढीला वेग देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचेच धोरण नंतर सत्तेवर आलेल्या देवेगौडा, गुजराल आणि वाजपेयी यांच्या सरकारांनी पुढे चालविले व त्याच्या यशस्वीतेवर आपले शिक्कामोर्तब उमटविले. पुढल्या काळात डॉ. सिंग हे स्वत: देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या दोन्ही कारकिर्दी आर्थिकदृष्ट्या यशस्वी आणि देशाची संपन्नता वाढविणाऱ्या ठरल्या. राजकारणातील अजागळपणा आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे त्यांची दुसरी कारकीर्द डागाळलेली दिसली तरी त्याही काळात डॉ. सिंग यांच्यावर कोणाला आर्थिक अकार्यक्षमतेचा वा गैरव्यवहाराचा ठपका ठेवता आला नाही. त्यांच्या नावाला जगाच्या अर्थक्षेत्रात अगोदरच मोठी मान्यता होती. त्यांच्या दोन कारकिर्दींनी ती आणखी तेजस्वी व लखलखती बनविली. मात्र या काळात त्यांच्यावर व त्यांच्या सरकारवर भाजपाने जी टीका केली ती कमालीची हलक्या दर्जाची व राजकारणाची पातळी फार खालच्या स्तरावर नेणारी ठरली. मनमोहन सिंग हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात संसदेत हजर असत. तीत ते बोलत. त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत. पत्रकारांशी संबंध राखत. टीका करणाऱ्या संपादक व पत्रकारांनाही ते भेटत व त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असत. तरीही संसदेतच क्वचितच हजर राहणाऱ्या आजच्या पंतप्रधानांनी व त्यांच्या पक्षाने सिंग यांना मौनी बाबा म्हटले. काही लोक मोजकेच पण नेमके बोलतात. मात्र त्यासाठी त्यांना अबोल म्हणता येत नाही. याउलट जी माणसे अकारण व फार बोलतात त्यांच्यावर वायफळपणाचा ठपका ठेवता येतो. असे वायफळ बोलणे जोरदार हातवारे करीत देशाला ऐकविणारे पुढारीही आता आपल्याला चांगले ठाऊक आहेत. होणारी टीका अन्यायकारकच नव्हे तर आपल्यावर व्यक्तिगत आघात करणारी आहे हे दिसत व अनुभवत असतानाही मनमोहन सिंगांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व संतुलित व संयमी राखले. ज्यांना त्यांच्या गावातही कुणी विचारत नाही अशी अतिशय क्षुल्लक माणसेही त्यांच्यावर चिखलफेक करताना देशाने पाहिली. डॉ. सिंग यांनी आपल्या लहानखुऱ्या देहाचा व मोठ्या मनाचा डौल तेव्हाही विचलित होऊ दिला नाही. तेवढ्या टीकेतही ते शांत, प्रसन्न व हंसतमुख राहिले. आताच्या मोदी सरकारवर त्यांनी प्रथमच प्रभावी टीका केली ती त्याने घेतलेल्या चलनबदलाच्या निर्णयाबाबत. हा निर्णय पुरेशा विचारानिशी व त्याचे परिणाम लक्षात न घेता घेतला गेला असे तर ते म्हणालेच शिवाय या निर्णयाचे अतिशय गंभीर परिणाम देशाला येत्या काळात भोगावे लागतील असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. चलनबदलाचा निर्णय मोदींनी ८ नोव्हेंबरला जाहीर केला असला तरी त्याच्या तयारीला अर्थमंत्रालयाने ऊर्जित पटेलांच्या मदतीनिशी व स्वाक्षरीनिशी (त्यांच्या नियुक्तीच्याही अगोदर) सुरुवात केली होती. या निर्णयाने देशात दडलेला काळा पैसा तर बाहेर आलाच नाही उलट सामान्य व प्रामाणिक माणसांची त्यापायी झालेली फरफटच देशाला पाहावी लागली. या निर्णयाविषयीचे सत्य समजून घेण्यासाठी संसदेच्या संबंधित समितीने ऊर्जित पटेलांना आपल्यासमोर साक्ष द्यायला बोलावले तेव्हा समितीच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची उडालेली फजिती साऱ्यांच्या लक्षात आली. हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असे सरकार सांगत आले असले तरी त्या बँकेने तो घ्यावा अशी सूचना सरकारनेच तिला केली होती हे स्वत: पटेल यांनीच याआधी सांगितले होते. त्यामुळे आपले पद आणि सरकारचे राजकारण या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळण्याच्या प्रयत्नात त्यांची त्रिधातिरपीट उडाली होती. नेमक्या त्यावेळी मनमोहन सिंग यांच्यातील अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचा माजी गर्व्हनर जागा झाला. ऊर्जित पटेल यांच्या तशा अवस्थेत त्यांच्या तोंडून देशाच्या अर्थकारणातील उघड होऊ नयेत अशा गोष्टी उघडकीला येतील असे वाटल्यावरून डॉ. सिंग यांनी त्या समितीवरील सदस्यांना त्यांचे प्रश्न आवरायला आणि ऊर्जित पटेल यांना अडचणीचे वाटतील त्या प्रश्नांची उत्तरे देणे थांबवायला सांगितले. ज्या पक्षाने व ज्याच्या नेत्यांनी, ते विरोधात असताना व सत्तेवर आल्यानंतरही आपल्यावर अतिशय गलिच्छ पातळीवर जाऊन टीका केली त्याचे व्यवस्थापन सावरुन धरायला डॉ. सिंग यांनी घेतलेला हा पुढाकार त्यांचे अंगभूत मोठेपण सांगणारा व देशाच्या राजकारणाला आलेल्या तोंडवळपणाला एक चांगला धडा शिकवणारा आहे. जेव्हां प्रश्न देशाच्या आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील प्रतिमेचा असतो तेव्हां राजकीय अभिनिवेश कसा बाजूला सारावा, याचा वस्तुपाठच डॉ.सिंग यांनी या निमित्ताने घालून दिला असल्याने त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणे अशा वेळी आवश्यकच ठरते.

Web Title: Manmohan Singh's Dilrari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.