उन्मादी देशभक्तांचा हिंदूंना धोका
By admin | Published: December 24, 2014 11:07 PM2014-12-24T23:07:58+5:302014-12-24T23:07:58+5:30
मंदिर’वादी पक्ष असणाऱ्या भाजपाने गेल्या लोकसभा निवडणुकीत विकासाचे गाजर दाखवून ‘सबका विकास’ म्हणत सत्ता हस्तगत केली
प्रभाकर तिंबले,(राजकीय भाष्यकार आणि गोव्याचे माजी निवडणूक आयुक्त) -
मंदिर’वादी पक्ष असणाऱ्या भाजपाने गेल्या लोकसभा निवडणुकीत विकासाचे गाजर दाखवून ‘सबका विकास’ म्हणत सत्ता हस्तगत केली असली, तरी अलीकडच्या घटनांतून तो पक्ष कालचक्र उलटे फिरविण्याच्या प्रयत्नात आहे, असे वाटते. भारतीय हिंदूंना समता, पुरोगामीपणा आणि विज्ञानविषयक जाणिवांऐवजी भेदभाव, मागासलेपणा, जुनाट परंपरांच्या अधीन करण्याचे त्याचे धोरण दिसते. गेल्या ६ महिन्यांतील राजकीय ‘परिवर्तन’ जे हिंदू मतांच्या धु्रवीकरणातून शक्य झाले आहे; शिवाय नवमध्यमवर्गाने आपल्या आशाआकांक्षांचे सुकाणू नरेंद्र मोदी यांच्या हातात सोपविले खरे, पण स्थिती आहे त्यापेक्षा बिघडू लागली. स्वातंत्र्यप्रेमी भारतीय हिंदू आणि आपल्या लोकशाहीवर विश्वास असणारे इतर लाभधारक यांना एकाच वेळी कचाट्यात पकडण्याचा डाव उजवे हिंदुत्ववादी करू लागले आहेत.
गेल्या ६ महिन्यांत कोणत्याही नवीन कल्पनांचा उगम पाहायला मिळाला नाही. उलट, भारताचा भूतकाळ हाच आपला भविष्यकाळ बनू पाहत आहे. संघ आणि इतर भगव्या संस्था आपला धार्मिक अजेंडा पुढे रेटताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांना विकास आणि राष्ट्रवादाचा चपखल मुखवटा मिळाला आहे. एवढ्या छोट्याशा कार्यकाळात कोणत्याही सरकारचे मूल्यमापन शक्य नसले, तरी या अवधीत त्यांची पावले विकासाच्या दिशेने पडलेली पाहायला मिळत नाहीत. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांच्याभोवतीच ढोल पिटणे सुरू आहे. एकसंध भारतातील समृद्ध, धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णू वारसा पुसण्याचा प्रयत्न होत आहे. गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर यांना विस्मृतीत लोटण्याचे, संघाच्या विचारसरणीचा भाग असलेले उपद्व्याप केंद्रभागी आले आहेत. नव्या सत्ताधाऱ्यांची पावले भारतीय हिंदू आणि मध्यमवर्ग यांच्यासाठी घातक असून, हिंदू मूलतत्त्ववादी देशातील शिक्षण, मानवसंसाधन, इतिहास, संस्कृती आणि अंतर्गत कायदा व सुरक्षेवर आपला दबदबा प्रस्थापित करू पाहत आहेत. मुक्त अर्थव्यवस्था, असहिष्णू आणि विद्वेषाचे राजकारण आणि समाजाला मागे नेणाऱ्या कल्पना, हाच भाजपा सरकारचा सध्याचा अजेंडा दिसतो.
महात्मा गांधींच्या छातीत गोळ्या घालणारा उजव्या हिंदू विचारसरणीचा कार्यकर्ता नथुराम गोडसे याचा जन्मदिवस ‘शौर्य दिन’ म्हणून पाळून त्याचा उदोउदो करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील बजरंग दल या संघाच्या शाखेनेच केला. भाजपाचे खासदार साक्षीमहाराज तर म्हणाले, की ‘नथुराम हा महात्मा गांधींएवढाच देशभक्त होता. नथुराम गोडसे हाही राष्ट्रवादी होता.’ प्रत्येकाचे आचारविचार स्वातंत्र्य मान्य करून आणि या क्षुल्लक घटना आहेत, असे गृहीत धरले तरी ही वक्तव्ये या उजव्या लोकांच्या असहिष्णू आणि विद्वेष पेरणीची चुणूक दाखवतात. आमचं नशीब, की गांधी हत्येचा दिन ‘देशभक्त दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी अजूनपर्यंत त्यांनी केलेली नाही. ख्रिसमसचा दिवस ‘सुशासन दिन’ म्हणून पाळण्याचा प्रयत्न चालला होता. मुलांना आणि शैक्षणिक संस्थांना यात ओढण्याचे काही निष्फळ प्रयत्नही झाले आहेत.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या म्हणण्यानुसार भगवद्गगीतेत प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण आहे आणि त्यामुळे तो ‘राष्ट्रीय ग्रंथ’ जाहीर व्हावा. खरे तर गीता हा अनेक उपलब्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. गीतेचे अनेक अन्वयार्थ लावले गेले आहेत. त्यात अनेक बदलही केले गेले आहेत. अशा प्रकारच्या घटनांतून सरकारचा वैचारिक आणि सांस्कृतिक अजेंडाच समोर येतो. ही केवळ एखाद्याचे मत म्हणून दुर्लक्षिण्यासारखी गोष्ट नाही. आपल्यासारख्या लोकशाही देशाचा एखादा पवित्र ग्रंथ असेल तर तो आपली ‘घटना’च असायला हवा.
धर्मांतरण किंवा ‘घरवापसी’चे आग्रा आणि अलिगढ येथील प्रकार देशाला अस्वस्थ ठेवतील. धर्मस्वातंत्र्यात धर्माची निवड करण्याचा हक्कही आहे. सर्व धर्मातील मिशनरी धर्मांतरणे करण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण एखादा राजकीय पक्ष त्यात लक्ष घालतो तेव्हा त्यातून सामाजिक तेढ निर्माण होते.
वरील गोष्टींचा विकास आणि राष्ट्रीय अस्मितेशी दुरान्वयेही संबंध नाही. पण उजव्या संघटना त्या पुढे रेटत आहेत कारण आपला छुपा अजेंडा रेटण्यासाठी राजकीयदृष्ट्या त्यांना वातावरण पोषक वाटते आहे. ज्या प्रकारे या घटना हाताळल्या जाताहेत ते पाहता त्याला असलेला सरकारी आश्रय स्पष्ट दिसून येतो.
भारताच्या धर्मनिरपेक्षतेला हा धोका आहे असे मला अजिबात सुचवायचे नाही. हे खूपच छोटे विषय आहेत आणि त्याला अतिमहत्त्व देण्यात येत आहे. अशा उन्मादी घटना या अल्पसंख्याकांपेक्षा बहुसंख्याक हिंदूंसाठी घातक आहेत. भाजपातील असे घटक सामाजिक आणि राजकीय युद्धे जिंकत असतील तर हिंदू आणि मध्यमवर्ग अधिक बिचारा होणार आहे. मूलतत्त्ववाद्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. हिंदूंनी आपले निवडीचे, आचार, विचार आणि संचाराचे स्वातंत्र्य या उन्मादी देशभक्त आणि राष्ट्रवाद्यांकडे गहाण टाकावे असे त्यांना वाटते. तोंडातून विकासाचा जप, आणि डोक्यात हिंदूंना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्नशील. देशातील हिंदूंनी सावधान राहिले पाहिजे.