‘मनोहारी’ सल्ला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:47 PM2017-09-08T23:47:15+5:302017-09-09T00:25:39+5:30
एखाद्या व्यक्तीच्या वा मान्यवराच्या जवळ जाण्यासाठी, त्याला खूश करण्यासाठी किंवा त्याची मर्जी संपादन करण्यासाठी पुष्पगुच्छ हा महत्त्वाचा दुवा ठरत असतो.
एखाद्या व्यक्तीच्या वा मान्यवराच्या जवळ जाण्यासाठी, त्याला खूश करण्यासाठी किंवा त्याची मर्जी संपादन करण्यासाठी पुष्पगुच्छ हा महत्त्वाचा दुवा ठरत असतो. स्वागत हा त्यामागील वरकरणी हेतू केवळ नाममात्र. वाढदिवस, यश-निवड, राजकीय नेत्यांपासून आमदार-खासदार, मंत्र्यांच्या स्वागतासाठीच नव्हे; तर कुणाची भेट घ्यायची झाली तरी लोक पुष्पगुच्छ घेऊनच निघतात. वाढदिवस-विवाह समारंभातील फुलांचा अवाजवी वापर तर वेगळाच. केवळ स्वागताच्या नावाखाली किती फुलांचा चुराडा होत असेल, याचा हिशेब न केलेलाच बरा. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते आणि कचºयाच्या प्रमाणात वाढ होते असा निष्कर्ष काढून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘सरकारी कार्यालयांनी कुणालाच सोहळ्यावेळी पुष्पगुच्छ देऊ नये’ असा फतवा काढला आहे. ‘पुष्पगुच्छ द्याल तर शिक्षा करू’ असा दमही गोव्यातील सरकारी कर्मचाºयांना दिला आहे. निमित्त होते, पर्यावरणविषयक सिनेमा महोत्सवाचे. कार्यक्रम शासकीय नसतानादेखील आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना सुखावण्यासाठी मोठा पुष्पगुच्छ दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या पर्रीकरांनी ‘निदान पर्यावणाचा आग्रह धरणाºयांनी तरी फुले वाया घालवू नयेत किंवा कचºयाची निर्मिती करू नये’ असा घरचा आहेर दिला. याच व्यासपीठावरून सरकारी कार्यालयाकडून पुष्पगुच्छ न देता केवळ एक फूल देऊन स्वागत केले जावे असे परिपत्रकच मुख्यमंत्र्यांनी जारी केले आहे. यातील अतिशयोक्ती अथवा गमतीचा भाग बाजूला ठेवला तर पर्रीकरांचा हा सल्ला तसा ‘मनोहारी’च वाटतो. उठसूठ कुणाच्याही स्वागतासाठी पुष्पगुच्छांचा वापर करण्याऐवजी केवळ एक फूल देऊन पर्यावरणाचे रक्षण करता येत असेल तर केवळ गोवा राज्यच नव्हे; इतर राज्यांनीही हा पायंडा पाडणे त्यांच्या पत्थ्यावरच पडू शकेल. पर्रीकरांचा हा सल्ला अन्य राजकारणी मंडळींनी झेलावा आणि आपापल्या पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पाझरत ठेवला तर तो पर्यावरणासाठी पूरकच ठरू शकेल. पुष्पगुच्छ वा फूल दोन्ही समानच, त्यामागील भावना तेवढी महत्त्वाची असते. पर्रीकरांच्या या ‘मनोहारी’ सल्ल्याचे साºयांनी पुष्पगुच्छ न देता आचरणात आणून स्वागत केले किती बरे होईल!