मनाचिये गुंथी - सहजीवनाचा अर्थ

By admin | Published: July 7, 2017 12:47 AM2017-07-07T00:47:49+5:302017-07-07T00:48:08+5:30

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समूह करून राहतो. मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल, हे इंग्रजीतील वचन प्रसिद्ध आहे. प्राणी कळपाने

Mantechi Gunthi - meaning of Sahivvaan | मनाचिये गुंथी - सहजीवनाचा अर्थ

मनाचिये गुंथी - सहजीवनाचा अर्थ

Next

- प्रल्हाद जाधव
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समूह करून राहतो. मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल, हे इंग्रजीतील वचन प्रसिद्ध आहे. प्राणी कळपाने राहतात. पक्षीही थव्याने राहतात. असे का, तर ती निसर्गाचीच योजना आहे. सर्वांनी मिळून मिसळून रहावे आणि जगण्याचा आनंद लुटावा, हे त्यामागील कारण स्पष्ट आहे. वेदांमधील प्रार्थनेतही एकत्रितपणे जगण्याचा, एकत्रितपणे पराक्रम करण्याचा महिमा वर्णन करण्यात आला आहे. ‘ओम सहनाभवतू सह नौ भुनक्तू’ ही प्रार्थना हजारो वर्षांपासून घरोघरी म्हटली जाते. दुसऱ्याचा द्वेष न करता किंवा त्याच्या स्वातंत्र्यावर आक्र मण न करता सर्वांनी आनंदाने आणि गुण्यागोविंदाने जगावे, असेही त्या प्रार्थनेत पुढे म्हटले आहे. निसर्गाची ही जी योजना आहे तिचे पालन करण्याची माणसाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी तो नीट पार पाडत आहे का, याचाही विचार करायला हवा. सर्वांनी सुखी रहावे याचा अर्थ फक्त माणसालाच सुख मिळावे असा नसून त्यात पशु-पक्षी, वृक्ष-वेली, कीटक-पतंग या साऱ्यांचा समावेश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
सहजीवनाचे उद्गान केवळ अध्यात्मानेच केलेले नाही तर विज्ञानानेही ती पताका उचलून धरलेली आहे. प्राणी परस्परांचे अंग चाटून स्वच्छ करतात. एक पक्षी दुसऱ्या पक्षाच्या डोक्यावरील पिसे साफ करतो. माकडे नेहमी एकमेकांचे अंग साफ ठेवत असतात. गाईच्या पाठीवरील बगळा तिच्या अंगावरचे कीटक फस्त करून तिला मदतच करत असतो. कासव आपल्या पिल्लांवरील प्रेम केवळ आपल्या नजरेने व्यक्त करीत असते. त्या प्रेमळ नजरेच्या आधारानेच कासवाची पिल्ले मोठी होत असतात. भूचर, जलचर, वनचर आणि वनस्पती जीवनातील साहचर्याची अशी कितीतरी उदाहरणे दाखवून देता येतील. वेलीला वर जायचे असेल तर वृक्षाचा आधार आवश्यक असतो. आई मुलीचे किंवा मुलगी आईचे केस विंचरत आहे, हे किती सुंदर दृश्य आहे! सहजीवनाच्या संकल्पनेचा जणू काही लोगोच आहे तो. माणसाला स्वत:ची पाठ थोपटून घेता येत नाही, त्यासाठी त्याला कुणीतरी सोबती असावा लागतो. प्रसंगी कुणाच्या खांद्यावर मान ठेवून त्याला आपल्या दु:खाला वाट मोकळी करून द्यायची असेल तर? त्यासाठीच निसर्गाची ही सहजीवनाची व्यवस्था व्यापक अर्थाने विश्वबंधुत्वाच्या पातळीवर पोहचणारी आणि जगाला विनाशाच्या खाईत ढकलू पाहणाऱ्या युद्धखोरांचे डोळे उघडू पाहणारी!

Web Title: Mantechi Gunthi - meaning of Sahivvaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.