मनुचे श्लोक अन् गुरुजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:19 AM2018-07-10T00:19:14+5:302018-07-10T00:20:27+5:30
काल आमच्या वर्गावर अचानक एक नवे गुरुजी आले होते. पिळदार मिशा, अंगात बुशर्ट, कमरेला धोतर, त्यावर शेला अन् डोक्यावर पागोटे असा त्यांचा गणवेश होता. सकृतदर्शनी ते बंड्याचे बाबा असावेत असा आमचा ग्रह झाला होता. कारण तालमीत जाण्याचं निमित्त करून बंड्यानं पुन्हा शाळेला दांडी मारली होती.
- नंदकिशोर पाटील
काल आमच्या वर्गावर अचानक एक नवे गुरुजी आले होते. पिळदार मिशा, अंगात बुशर्ट, कमरेला धोतर, त्यावर शेला अन् डोक्यावर पागोटे असा त्यांचा गणवेश होता. सकृतदर्शनी ते बंड्याचे बाबा असावेत असा आमचा ग्रह झाला होता. कारण तालमीत जाण्याचं निमित्त करून बंड्यानं पुन्हा शाळेला दांडी मारली होती. चौकशीसाठी आले असतील, असे वाटले होते. पण आमचा तो तर्क खोटा ठरला. ते तर नवे गुरुजी होते. हल्ली ते सगळीकडे फिरत असतात. आजवरचे गुरुजी कसे वर्गावर येताच आधी ‘अटेन्डन्स्’ घेत असत. नव्या गुरुजींनी वर्गात पाऊल ठेवताच सर्वांवरून करडी नजर फिरवली अन् थेट धड्यालाच हात घातला. कमरेचा शेला आणखी करकचून आवळला अन् ‘चला बाळांनो आज मी तुम्हाला मनुचा धडा शिकवतो’ असं म्हणून ते कुठला तरी श्लोक म्हणू लागले. आम्ही लगबगीनं दप्तरातील पुस्तकं बाहेर काढली. एक-एक करून चाळून पाहिली, पण कुठल्याच पुस्तकात ‘मनु’चा धडा आम्हाला सापडला नाही. मागच्या बाकावर बसलेल्या पिंट्यानं आमच्या मनातील ही शंका गुरुजींपुढं उपस्थित केली. तर त्यावर ते म्हणाले, ‘बाळानों, तुमचे ग्रंथ सरकारी कारकुनांनी लिहिले आहेत. कारकुनांना शून्य अक्कल असते. मनु समजण्याची त्यांची लायकी नाही. फेकून द्या ते सरकारी दफ्तर.’ नव्या गुरुजींची आज्ञा शिरसावंद्य मानून काही आज्ञाधारक कारटी दफ्तर फेकण्यासाठी खरंच खिडकीपाशी गेली. तेवढ्यात गुरुजींनी ‘सावधान’ म्हणत त्यांना जागेवर बसवलं. ‘जीवनात शिस्त अन् वर्गात स्वयंशिस्त असल्याखेरीज राष्टÑोन्नती नाही. हिंदुस्थान हे एक बलशाली राष्टÑ बनले पाहिजे. त्यासाठी दंडात जोर अन् अंगात जोश असला पाहिजे.’ गुरुजी हे सांगत असतानाच शेजारच्या बाकावर बसलेल्या शिऱ्यानं शर्टाची बाही वर करून आम्हाला दंड दाखवले. तेवढ्यात गुरुजींनी डस्टर फेकून मारला. शिºयानं नेम चुकवला. अन्यथा, त्याचा कपाळमोक्ष अटळ होता.
गुरुजींनी धडा कंटिन्यू केला. ‘आपल्या भारतभूमीत मनू नावाचा महापराक्रमी, महाविद्वान, महाज्ञानी असा एक महापुरुष होऊन गेला. त्यानं मनुस्मृती नावाचा महान ग्रंथ लिहिला. समाजातील प्रत्येकानं आपल्या पायरीप्रमाणे वागलं पाहिजे म्हणून त्यानं वर्णाश्रम आणला.
यत्र नार्यस्तु पूजज्यन्ते रमन्ते देवत:
अर्थात, जिथे नारीची पूजा होते तेथे देवता रममाण होतात...गुरुजींचं हे मनुपुराण सुरु असताना वर्गात चुळबूळ सुरू झाली. तेवढ्यात कुणाच्या तरी मोबाईलवर ‘आला बाबुरावऽऽ आता आला बाबुरावऽऽ’ अशी रिंगटोन वाजली. वर्गात एकच हंशा पिकला. गुरुजींचा पारा चढला. मोबाईलधारी बालकास त्यांनी बेंचावर उभं राहण्याची शिक्षा फर्मावली. वर्ग शांत झाला. गुरुजींनी पुन्हा मनुपुराण सुरू केलं. ‘मनु हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ होता.’ असं विधान गुरुजींनी करताच समोरच्या बाकावर बसलेले दोन-चार विद्यार्थी उठून उभे राहिले. त्यांनी गुरुजींच्या निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. मग कसलीही भीडभाड न ठेवता वर्गातील इतर विद्यार्थीही त्यांना सामील झाले. वर्गात एकच गलका झाला. नवे गुरुजी वर्गातून हळूच पसार झाले. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी हेडमास्तरांच्या कानावर घातली. त्यावर, ‘चौकशी करून कारवाई केली जाईल’,
असे आश्वासन हेडमास्तरांनी दिले!