विष्णू मास्तराचा प्रश्न आभाळाएवढा झालाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 07:17 AM2021-02-13T07:17:53+5:302021-02-13T07:19:22+5:30
आपण एकमेकांचा द्वेष करायला लागलो, आपल्याहून वेगळं मत मांडणाऱ्यांच्या जिवावर उठलो आणि हे आपल्याला गौरवास्पद वाटतंय...
- जयंत पवार, ख्यातनाम लेखक
वेगवेगळी दहशत निर्माण करणाऱ्या माणसांबद्दल, परिस्थितीबद्दल तुम्ही परखड लिहित आला आहात. कोविडच्या दहशतीबद्दल काय वाटतं?
जवळपास एक वर्ष आपण कोविडच्या सावलीत काढलं. आणखी किती काळ या विषाणूची भीती जगाचा पाठलाग करत राहील, माहिती नाही. जग भीतीच्या छायेत होतं हे खरंय. पण त्याची दहशत सार्वत्रिक नव्हती. लॉकडाऊनने माणसांना त्यांच्या छोट्याशा जागांमध्ये जखडून टाकलं होतं,त्याचा त्यांना जाच नक्कीच झाला असणार. माझ्या उपचारांसाठी दवाखान्यात जायचो तेव्हा मला आसपासच्या बैठ्या चाळी आणि वस्त्यांमधली तरणी मुलं भटकताना दिसायची. ती तरी काय करणार? दवाखान्यात येणाऱ्या बायकांच्या बोलण्यातून वेगळीच भीती दिसायची. घराघरात लोकांची कमाई थांबली होती, ही धडकी भरवणारी गोष्ट होती. हातावर पोट असणारे मजूर आपापल्या गावाच्या दिशेनं सहकुटुंब चालत निघाल्याच्या बातम्या नंतर येऊ लागल्या. त्यांचे हाल अंगावर शहारे आणणारे होते. सारंच भयंकर होतं. पण ही दहशत मरणाची नव्हती, भूकेची होती.
मृत्यूची दहशत पसरली होती ती त्याच्यावरच्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गात. ज्या सुरक्षित कवचात तो जगत होता ते कवचच कोरोनानं फोडलं. कोरोनाने त्याला मरणभय दाखवून एकटेपणाच्या बेटावर आणून सोडलं. त्यांच्यासाठी नव्या जगण्याशी जुळवून घेणं खूप कठीण होतं. जे लोक आपल्या गावी गेले त्यांना वेशीवरच अडवणारे गावकरी हे त्या गावातले सुस्थापित आणि सुस्थिर नागरिकच होते. एका अदृश्य शक्तीने आणलेल्या मृत्यूच्या दहशतीखाली हे सारे जगत होते.
टोकाचं व्हलनरेबल वाटण्याच्या या काळात लेखक म्हणून नवं सुचणं कसं शक्य होतं?
- उलट व्हलनरेबल माणसांना तर अधिक सुचतं. या सुचण्यातूनच त्यांच्या आत एक वेगळं विश्व तयार होतं, जे त्यांना जगायला आधार देतं. अर्थात प्रत्येकाचं सुचणं व्यक्त होण्यापर्यंत जातंच असं नाही. त्याचं कलेत, साहित्यात रूपांतर होणं ही तर फार पुढची गोष्ट. लेखक म्हणून मला सांगितल्याविना चैन पडत नाही तेव्हा मी कोणाचीही पर्वा न करता लिहितो. कारण लिहिणं ही तेव्हा माझी गरज बनलेली असते. मी जास्त करून व्हलनरेबल माणसांविषयीच लिहिलंय. अर्थात, प्रत्येक सुचणं आकार घेतंच असं नाही; पण सुचत राहातं. आज स्वतःच्या विवेकाशी प्रमाण राहून सत्य सांगू बघणाऱ्या लेखकांसाठी कठीण दिवस आलेत. लेखक मुळातच एकटा असतो आणि असा लेखक तर आता सत्तेसाठीच नव्हे तर उपद्रवकारी समाज गटांसाठीही सॉफ्ट टार्गेट आहे. लेखक या प्राण्याचं अवमूल्यन करायचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. अशा काळातच लेखकाची कसोटी लागणार आहे. काळाला चकवणारे व्यक्त होण्याचे मार्ग लेखकालाच शोधून काढावे लागणार आहेत.
‘कोन नाय कोन्चा’ ही एकाकी निष्ठूर जाणीव साथीच्या काळात आणखी तीव्र झाली असं वाटतं का?
होय. माणूस अधिक भित्रा, एकटा आणि दांभिक झाला आहे. व्यक्तिगत पातळीवर तो अधिकाधिक स्वार्थी होत चालला आहे. ही प्रक्रिया केव्हाच सुरू झाली होती. समाज म्हणून आपण एकजिनसी कधीच नव्हतो, पण आपण व्यवस्थेत नाडल्या जाणाऱ्या लोकांच्या मागे उभं असलं पाहिजे, आपले हात त्यांच्या हातात असले पाहिजेत असं मानणारे खूप लोक होते. मात्र कधीतरी आपण या लोकांचा हात सोडला. आपण फक्त आपल्यासारख्या आणि आपल्यासारखा विचार करणाऱ्या लोकांचे गट करून सेलिब्रेशन केलं. आपण अखिल जगाचे रहिवासी झालो होतो, पण त्याचवेळी आपण आपापल्या कुंपणाच्या तारा पिळून अधिक घट्ट केल्या.
काळाचा हा फटका राज्यव्यवस्थांचा चेहरामोहरा बदलेल असं वाटतं का?
मोठ्या आपत्तीनंतर, पडझडीनंतर, भीषण संहारानंतर त्यातून वाचलेल्यांंना स्वतःला सावरताना जगणं नव्याने सुरू करावं लागतं. यात अनेक जुन्या गोष्टी नाहीशा होतात आणि जगण्याचं शहाणपण काही नव्या गोष्टी घेऊन येतं. हे न्यू नॉर्मल आजचंच नाही. मानवी जीवन व्यवहार यातूनच पुढे जात आला आहे. कोरोनाने शिकवलेल्या नव्या जगण्याने मानवी स्वार्थ अधिक टोकदार झाला, त्यामुळे राज्य व्यवस्थेचाच नव्हे तर ज्यांच्या हातात सत्ता आहेत अशा सर्वच व्यवस्थांचा चेहरामोहरा बदलणार आहे. तो अधिक क्रूर होणार आहे.
मला भारताच्या संदर्भातलं न्यू नॉर्मल अधिक भीषण वाटतं. गेल्या काही काळात आपण एकमेकांचा द्वेष करायला लागलो आहोत, धडधडीत असत्य बोलणं हे मूल्य म्हणून आपण स्वीकारलं आहे, माणूसपणाच्या सगळ्या कसोट्या पायदळी तुडवून आपल्याहून वेगळं मत मांडणाऱ्यांच्या जीवावर उठलो आहोत आणि हे सर्व आपल्याला गौरवास्पद वाटतंय. हे आपलं न्यू नॉर्मल आहे.
जगण्याचाच झगडा मोठा झाल्यावर नीती, मूल्यं अशा गोेष्टींचं असणं किती उरेल असं वाटतं?
ज्यांचा जगण्याचा झगडा मोठा आहे त्यांनी पराकोटीच्या संघर्षात टिकून राहण्यासाठी नीती मूल्य पायदळी तुडवली तर मला त्यात गैर वाटणार नाही. पण अनेकदा अशीच माणसं त्यांची म्हणून काही नीती मूल्य जपताना दिसतात. उलट ज्यांना जगण्याची भ्रांत नाही, ज्यांची पोटं तुडुंब भरलेली आहेत असे लोक मात्र सगळी मूल्य धुडकावून अनैतिक होत असतात आणि गौरवले जातात, अशांचं काय करायचं? सगळ्या व्यवस्थाही त्यांच्याच पक्षपाती असतात. चिं.त्र्यं. खानोलकरांच्या ‘चाफा’ कथेतला विष्णू मास्तर म्हणतो, ‘गावातल्या लोकांची दोंदे सुटतात, पण माझ्या काशीचं लग्न होत नाही. असं का?’ - विष्णू मास्तराचा हा प्रश्न आभाळाइतका मोठा झालाय.
pawarjayant6001@gmail.com
मुलाखत : सोनाली नवांगुळ