मराठा-दलित एकीचे प्रयत्न
By admin | Published: September 14, 2016 10:57 PM2016-09-14T22:57:59+5:302016-09-14T23:06:20+5:30
कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती
कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती; परंतु आरोपीची ‘डीएनए’ तपासणी व इतर अनेक पुरावे जमा केले जात असल्याने विलंब लागला. अर्थात, मुख्य आरोपीला फाशीच होईल, एवढे सबळ पुरावे आम्हाला मिळत असल्याचा दावा पोलीस करीत आहेत.
कायद्याच्या पातळीवर हे प्रकरण पुढे सुरु राहील. पण, या निमित्ताने मराठा-दलित या दोन समाजात निर्माण होणारा विसंवाद संपणार कसा, हा प्रश्न आहे. मराठा समाजात प्रचंड असंतोष दिसतो आहे. येत्या २३ तारखेस नगरलाही मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. कोपर्डी घटनेमुळे मोर्चांची सुरुवात झाल्याने राज्यातील सर्वाधिक गर्दी येथील मोर्चाला जमेल, अशा पद्धतीने नियोजन सुरु आहे. मोर्चांचे वैशिष्ट्य हे की त्यांना कुणीही एक नेता नाही. सामूहिक नेतृत्व आहे. शिवाय हे ‘मूक’ मोर्चे आहेत. गत आठवड्यात नगरला झालेल्या बैठकीत सर्व आमदार देखील व्यासपीठाच्या खाली बसले होते. कुठल्याही प्रसिद्धी पत्रकात नेत्यांची नावे टाकली जात नाहीत. नेत्यांनी स्वत:चा बॅनर लावायचा नाही, स्वत:चे नाव वापरायचे नाही, अशी अचारसंहिता ठरली आहे. शेकडो व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाले आहेत. महिला, डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या घटकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या निमित्ताने मराठा समाज प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे तंत्र म्हणूनही हा मोर्चा एक अभ्यासाचा विषय आहे.
मोर्चाचे नियोजन आज तरी शांततेत सुरु आहे. मात्र, याच दिवशी दलित संघटनांनी सद्भावना रॅली काढण्याची घोषणा केल्याने प्रशासनासमोर पेच आहे. दोन समाजघटक एकाच दिवशी रस्त्यावर आले तर तणाव वाढू शकतो. अर्थात काही दलित नेत्यांनी याबाबत समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आपल्या प्रश्नांवर मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्या विरोधात दलितांनी प्रतिमोर्चा काढणे गैर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. काही स्थानिक दलित नेतेही याच मताचे आहेत. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, हा एक विषय वगळता आम्हीही मराठा समाजासोबत आहोत, असेही दलित नेत्यांनी जाहीर केले आहे. मराठा संघटनांनीही अॅट्रॉसिटी रद्द करण्याची नव्हे तर या कायद्याचा गैरवापर रोखण्याची आमची मागणी असल्याचा खुलासा केला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकाचा आदर करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. रामदास आठवले यांनी शिर्डीत सात आॅक्टोबरला ‘मराठा-ऐक्य’ दलित परिषद घेण्याचे ठरविले आहे. या परिषदेत मराठा नेत्यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे नगरपासून दुभंगलेली मने पुन्हा सांधायला येथूनच सुरुवात होईल, अशी आशा अनेकांना आहे.
सर्व जाती संघटीत होत असताना मराठा समाजात आजपर्यंत एकी दिसत नव्हती. ती या निमित्ताने दिसली. मराठा समाजातही प्रचंड विषमता आहे. ठराविक लोकांकडेच राजकीय सत्ता आहे. ते नात्यागोत्याचे पाहातात. सर्वसामान्य मराठा वर्गासमोर शेतीपासून मुलांच्या शिक्षणापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. शेतमालाला भाव नाही, नोकऱ्या नाहीत. ती खदखद तरुणांत आहे. कोपर्डीच्या निमित्ताने हा सगळा असंतोष उफाळून आला आहे. ही अस्वस्थता आता मराठा नेत्यांसह सर्वांनाच समजून घ्यावी लागेल. मराठा समाजाच्या एकीकरणाने खुद्द मराठा नेतेही हादरलेले दिसतात. त्यामुळेच ते संघटनांच्या बैठकांत सामील होत आहेत. मोर्चांसाठी देणग्या देण्याची त्यांची तयारी आहे. आजपर्यंत या नेत्यांनीही समाजाला गृहीत धरले. या मोर्चांतून कदाचित नवीन नेतेही उभे राहतील. हा दलित-मराठा असा वाद नाही, त्याला अनेक पदर आहेत.
- सुधीर लंके